त्यांचा बदल प्रत्येक वयात, प्रत्येक टप्प्यावर वेगळा असतो.
आईच्या कुशीतून बाहेर आलेलं लेकरू सुरुवातीला फक्त ती कूस ओळखतं…पहिले सहा–आठ महिने तर ती कूसच त्याचं सुरक्षिततेचं, हक्काचं जग असतं.
मग मूल मोठं होतं… शाळेत जायला लागतं.त्याचं जग थोडं विस्तारतं… पण तरीही “आई” हाच त्याचा निवारा असतो.
पुढे शाळा, कॉलेज…
विविध आकर्षणांनी, प्रलोभनांनी भरलेल्या जगात ते पहिलं पाऊल टाकतं.
सुरुवातीला थोडं अडखळतं, थोडं बिचकतं…
पण हळूहळू त्याच जगाचा सराईत भाग बनून जातं.
नंतर येतो नोकरी, करिअर, स्वतःची ओळख निर्माण करण्याचा टप्पा.
इथेही मूल स्वतःचे पाय घट्ट रोवून उभं राहतं.
आई-वडील मुलाची प्रगती बघून फक्त आनंदी होत नाहीत…
ते कृतकृत्य होतात.
एक निस्वार्थ समाधान त्यांच्या डोळ्यांत चमकत राहतं.
आणि मग…
मूल मुल राहत नाही.
तो एक परिपूर्ण पुरुष होतो.
मोठमोठे निर्णय सहज घेतो… अनेक नाती, अनेक जबाबदाऱ्या सांभाळतो.
पण कधी कधी…
तो हे विसरून जातो की त्याच्या पंखात उडायचं बळ नेमकं कुठून आलं होतं.
आई-वडील मात्र अजूनही तिथेच असतात…
त्याची वाट बघत.
फक्त…
आता त्यांच्या आणि मुलाच्या मध्ये एक न संपणारं अंतर उभं राहिलेलं असतं.
ते अंतर त्या वृद्ध आई-वडिलांना कधीच नीट समजत नाही.
आणि मग…
डोळ्यांतले प्राण शेवटपर्यंत मुलाची वाट बघत राहतात…
एक दिवस हळूहळू ती नजर निस्तेज होत जाते.पण दाराकडे लागलेली सवय मात्र शेवटच्या श्वासापर्यंत तशीच राहते….
डॉ मधुरिमा कुलकर्णी