रक्षाबंधन… हो तो दिवस रक्षाबंधनाचा होता
रमेशने दहा-दहा रुपये साठवून रेवतीसाठी हिरव्या काचेच्या बांगड्या आणल्या होत्या.
“ताई…”
“काय रे?”
“डोळे बंद कर.”
रेवतीने डोळे बंद केले.
त्याने तिच्या हातात छोटंसं पाकीट ठेवलं.
“आता उघड.”
पाकीट उघडताच हिरव्या बांगड्या चमकल्या.
“अरे…!”
“महाग नाहीत बरं का… पण दुकानात मला या सगळ्यात जास्त आवडल्या.”
रेवतीने क्षणाचाही विलंब न करता त्या हातात घातल्या.
“माझ्यासाठी या सोन्यापेक्षा महाग आहेत.”
आपल्या गेलेल्या वडिलांची उणीव तेंव्हा रेवतीला कमी जाणवली कारण रमेश छोटा असला तरी पाठीशी नक्की असणार याची तिला खात्री होती…तिने हळूच डोळे टिपले
रमेश आनंदाने उड्या मारू लागला.
“आई… बघ ना, ताईला आवडल्या.”
आई दारात उभी होती.
तिच्या चेहऱ्यावर हसू होतं.
आणि डोळ्यांत पाणी.
तिने मनोमन देवाला म्हटलं…
“या दोघांचं प्रेम असंच राहू दे.”
…
देवाने बहुतेक पहिलाच भाग ऐकला.
दुसरा नाही.
काळ पुढे सरकत गेला.
रेवतीने पदवी पूर्ण केली.
नोकरी लागली.
पहिल्या पगाराचा लिफाफा घेऊन ती थेट आईसमोर उभी राहिली.
“हे घे.”
आईने लिफाफा तिच्या हातात परत ठेवला.
“पहिल्या पगारात स्वतःसाठी काहीतरी घे.”
“मला काही नको.”
“अगं, चप्पल बघ तुझ्या. शिवून शिवून किती दिवस वापरणार?”
रेवती हसली.
“माझ्या चपला अजून चालतात.”
“पण…”
“आई…”
ती तिचा हात हातात घेत म्हणाली,
“तू इतकी वर्षं आमच्यासाठी जगलीस.
आता माझी पाळी.”
आईने काहीच बोललं नाही.
लिफाफा देवासमोर ठेवला.
तिच्या डोळ्यांत अभिमान होता.
रेवतीचे लग्न शरदबरोबर घरच्याच्या संमतीने पार पडलं. आधीच समजूतदार असणारी रेवती मनापासून संसार करत होती
रमेशचं शिक्षण मात्र तसं मन लावून झालं नाही.
नोकरी बदलत राहिला.
कधी व्यवसाय करायचा हट्ट.
कधी मित्रांसोबत काहीतरी नवीन.
आई त्याच्याकडे पाहून म्हणायची,
“अजून लहान आहे.”
रेवती हसायची.
“आई, आता पंचवीस वर्षांचा झाला.”
“मुलगे उशिरा शहाणे होतात.”
हे वाक्य आई सहज म्हणायची.
रेवतीही सहज ऐकायची.
त्या वाक्याचं ओझं पुढे आयुष्यभर वाहावं लागेल, हे दोघींनाही माहीत नव्हतं.
रमेशचं लग्न झालं.
लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सगळं ठीक होतं.
रविवारी तो आईकडे यायचा.
चहा व्हायचा.
गप्पा व्हायच्या.
रेवती आली की तो म्हणायचा,
“ताई, तुझ्या हातची पोहे कर ना.”
“आता मी आली म्हणजे काम लावणार?”
“तू करतेस छान.”
“आई, बघ तुझा लाडका.”
घरभर हशा पिकायचा.
आई दोघांकडे पाहून सुखावून जायची.
हळूहळू भेटी कमी झाल्या.
कारणं वाढली.
“आज वेळ नाही.”
“आज पाहुणे आहेत.”
“उद्या येतो.”
“पुढच्या आठवड्यात येतो.”
तो पुढचा आठवडा कधीच आला नाही.
एक संध्याकाळ.
आईचा फोन आला.
“रेवा…”
“हं आई.”
“प्रेशरच्या गोळ्या संपल्या गं.”
“सकाळी सांगायचं ना.”
“विसरले.”
“ठीक आहे. घेऊन येते.”
ऑफिसमधून घरी जाताना ती औषधं घेऊन आईकडे गेली.
आईने औषधांचा पुडा हातात घेतला.
“रमेशला फोन केला होता.”
रेवती शांत झाली.
“मग?”
“म्हणाला… उद्या आणतो.”
“मग माझ्याकडे का फोन केला?”
आई काही बोलली नाही.
तिच्या शांततेत उत्तर होतं.
कारण रेवती ‘उद्या’ म्हणत नसे.
ती ‘येते’ म्हणायची.
अशा छोट्या छोट्या गोष्टी वाढत गेल्या.
गॅस संपला.
रेवती.
लाईट बिल भरायचं.
रेवती.
डॉक्टरांकडे जायचं.
रेवती.
बँकेचं काम.
रेवती.
घरात पंखा बंद पडला.
रेवती.
एका दिवशी शरदने डायरी उघडली.
“हे बघ.”
“काय?”
त्याने तारखा दाखवल्या.
“या महिन्यात तू आईकडे चौदा वेळा गेलीस.”
रेवती सहज म्हणाली,
“जावंच लागलं.”
“आणि रमेश?”
ती शांत झाली.
शरद पुढे म्हणाला,
“मी तुला आईकडे जाऊ नको म्हणत नाही.”
“मग?”
“एक प्रश्न आहे.”
“विचार.”
“तुझ्या आईला दोन मुलं आहेत…
की एकच?”
रेवतीच्या हातातला कप थरथरला.
तिला राग आला.
“तुला माझ्या भावाबद्दल काही बोलायचं नाही.”
शरद शांतपणे म्हणाला,
“मला त्याच्याबद्दल काही बोलायचंच नाही.
मला फक्त तुझ्याबद्दल बोलायचं आहे.”
“माझ्याबद्दल?”
“हो.”
“काय?”
“तू इतकी दमलेली का दिसतेस, रेवती?”
पहिल्यांदाच…
कोणीतरी तिच्या चेहऱ्याकडे पाहून हा प्रश्न विचारला होता.
ती उत्तर देऊ शकली नाही.
फक्त एवढंच म्हणाली…
“माहित नाही…”
आणि अनेक महिन्यांनी तिचे डोळे भरून आले.
रेवतीच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पाहून शरद तिच्याजवळ आला.
“रड… मनसोक्त रड.”
“काही नाही…”
“रेवा, ‘काही नाही’ म्हणताना माणूस सगळ्यात जास्त तुटलेला असतो.”
ती खुर्चीत बसली.
दोन्ही हातांनी चेहरा झाकून बराच वेळ रडत राहिली.
रडू थांबल्यावर ती हळूच म्हणाली,
“मी एवढी का थकतेय माहितेय?”
“का?”
“आईमुळे नाही…”
ती थांबली.
“…रमेशमुळेही नाही.”
शरद शांतपणे ऐकत होता.
“मग?”
“कारण रोज मला स्वतःलाच समजवावं लागतं… ‘काही हरकत नाही… मी आहे ना.’
आणि आता… आता माझ्यातली ‘मी’च उरलेली नाही.”
शरदने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
“माणूस इतरांना आधार देत राहतो… एक दिवस त्यालाही आधार हवा असतो.”
दोन दिवसांनी सकाळी आईचा पुन्हा फोन आला.
“रेवा…”
“काय गं?”
“डोळ्यांनी धूसर दिसतंय.”
“कधीपासून?”
“दोन-तीन दिवस.”
“मग आधी का नाही सांगितलंस?”
आई लाजल्यासारखी हसली.
“तू आधीच किती धावपळ करतेस…”
रेवतीने लगेच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली.
मग रमेशला फोन लावला.
“रमेश, उद्या सकाळी अकराची अपॉइंटमेंट आहे.”
“मग?”
“तू आईला घेऊन जाशील?”
“मी?”
“हो.”
“रेवा, मला उद्या वेळ नाही.”
“दोन तासांचाच प्रश्न आहे.”
“दोन तास म्हणजे दोन तासच असतात का ?”
“आईच्या डोळ्यांचा प्रश्न आहे.”
रमेशचा आवाज चिडला.
“तू का एवढं टेन्शन घेतेस? दोन दिवसांनी जाईल.”
“डॉक्टरांनी उद्याच बोलावलंय.”
“तू घेऊन जा ना.”
“माझ्या ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे.”
“मग रजा घे.”
रेवती काही क्षण गप्प राहिली.
“दरवेळी मीच का?”
पलीकडून लगेच उत्तर आलं.
“कारण तुला जमतं.”
फोन कट झाला.
रेवती बराच वेळ मोबाईलकडे पाहत राहिली.
“कारण तुला जमतं…”
हे वाक्य तिने पहिल्यांदाच ऐकलं नव्हतं.
पण त्या दिवशी ते मनात खोलवर घुसलं.
त्या रात्री ती आईकडे गेली.
आई अंगणात बसली होती.
“अपॉइंटमेंट घेतलीस?”
“हो.”
“रमेश येणार?”
रेवतीने उत्तर दिलं नाही.
आईने तिच्याकडे पाहिलं.
“नाही येणार ना?”
“काम आहे म्हणाला.”
आईने खोल श्वास घेतला.
“रेवा…”
“हं?”
“त्याच्यावर रागावू नको.”
“मी रागावले नाही.”
“खोटं.”
रेवती पहिल्यांदाच थोडी चिडली.
“आई, मी माणूस आहे.”
आई शांत झाली.
“माहितीय.”
“मग मला राग येणार नाही?”
“येईल.”
“दुःख होणार नाही?”
“होईल.”
“मग प्रत्येक वेळी मीच समजून का घ्यायचं?”
आईकडे उत्तर नव्हतं.
खूप वेळ दोघी शांत बसल्या.
शेवटी आई म्हणाली,
“तुला एक गोष्ट सांगू?”
“सांग.”
“तुझ्या बाबांना नेहमी वाटायचं… रेवती खूप समजूतदार आहे.”
“त्यात काय चूक होती?”
आईच्या डोळ्यात पाणी आलं.
“चूक नव्हती…
पण आम्ही एक चूक केली.”
“कुठली?”
“समजूतदार मुलांकडून जास्त अपेक्षा ठेवायला लागलो.”
दुसऱ्या दिवशी रेवतीने ऑफिसमध्ये जाऊन वरिष्ठांना विचारलं,
“सर… मला अर्धा दिवस सुट्टी मिळेल का?”
सरांनी तिच्याकडे पाहिलं.
“आईसाठी?”
ती आश्चर्याने म्हणाली,
“तुम्हाला कसं कळलं?”
ते हसले.
“गेल्या पाच वर्षांत तू फक्त दोन कारणांसाठी रजा घेतली आहेस.”
“कोणती?”
“आई… आणि ताप.”
रेवतीही नकळत हसली.
“मग?”
“जा. आणि एक गोष्ट…”
“हो?”
“तुझ्यासारखी माणसं ऑफिसमध्ये कमी असतात.”
ती निघायला लागली.
सर पुन्हा म्हणाले,
“पण अशी माणसं स्वतःची काळजी सगळ्यात कमी घेतात.”
त्या वाक्याने तिचे पाय क्षणभर थबकले.
तिला जाणवलं…
हे फक्त शरद म्हणत नव्हता.
आता जगही तेच सांगत होतं.
दवाखान्यात तपासणी झाल्यावर डॉक्टर म्हणाले,
“मोतीबिंदू पूर्ण पिकला आहे.”
आई घाबरली.
“ऑपरेशन?”
“हो. जितक्या लवकर, तितकं चांगलं.”
डॉक्टरांनी तारीख लिहून दिली.
रेवतीने ती चिठ्ठी हातात घेतली.
तिला डॉक्टरांचं पुढचं वाक्य स्पष्ट ऐकू आलं.
“ऑपरेशनच्या दिवशी रुग्णासोबत घरातलं एखादं माणूस पूर्ण वेळ असू द्या.”
तिने नकळत मनात विचार केला…
“घरातलं माणूस…? मीच आहे ना.”
आणि त्या विचारानेच तिच्या छातीत पुन्हा एकदा न बोलता येणारं ओझं दाटून आलं.
डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडल्यावर आईने चिठ्ठी पुन्हा पुन्हा वाचली.
“सोमवार… सकाळी आठ.”
ती पुटपुटली.
रेवतीने चिठ्ठी तिच्या हातातून घेतली.
“मी सगळं बघते.”
आईने तिच्याकडे पाहिलं.
“हेच तर…”
“काय?”
“तू कायम म्हणतेस… ‘मी बघते.'”
रेवतीने विषय बदलला.
“चल. आधी काहीतरी खाऊ.”
घरी येताच तिने रमेशला फोन लावला.
“हो.”
“रमेश, ऑपरेशन सोमवारी आहे.”
“हं.”
“तू येशील?”
“किती वाजता?”
“सकाळी आठ.”
“अगं, आठ वाजता कसं शक्य आहे? दुकान उघडायचं असतं.”
“दुकान अर्धा दिवस उशिरा उघड.”
“तुला बोलायला सोपं आहे.”
“रमेश…”
“काय?”
“आईचं ऑपरेशन आहे.”
“मग?”
“ती तुझीही आई आहे.”
पलीकडे काही क्षण शांतता होती.
मग रमेशचा आवाज आला.
“रेवा, पुन्हा तोच विषय नको.”
“कोणता विषय?”
“जबाबदारीचा.”
“तो विषय नाही रमेश… ते नातं आहे.”
रमेशचा संयम सुटला.
“तू प्रत्येक वेळी मला अपराधी वाटेल असंच बोलतेस.”
“मी?”
“हो.”
“मी फक्त एवढंच विचारलं की तू येशील का.”
“मला जमणार नाही.”
“एक तासही?”
“नाही.”
“का?”
“कारण माझी कामं आहेत.”
रेवती बराच वेळ काही बोलली नाही.
मग अगदी शांत आवाजात म्हणाली,
“ठीक आहे.”
फोन ठेवला.
आई तिच्याकडे पाहत होती.
“काय म्हणाला?”
रेवतीने ओठांवर हसू आणलं.
“काम आहे.”
आईने मान खाली घातली.
“माझ्यामुळे तुमच्यात भांडणं होतात.”
“आई…”
“नको गं.”
ती पुढे म्हणाली,
“तुम्ही दोघं लहान होता ना… एक चॉकलेट आणलं तरी तू त्याच्यासाठी अर्धं ठेवायचीस.”
रेवती हलकंसं हसली.
“तो रडायचा.”
“आणि तू?”
“मी मोठी होते.”
आईने तिचा हात हातात घेतला.
“रेवा…”
“हं?”
“मोठी मुलंही थकतात.”
ऑपरेशनच्या आदल्या दिवशी शरदने विचारलं,
“उद्या किती वाजता निघायचं?”
“साडेसहा.”
“मी येतो.”
“नको.”
“का?”
“तुझी ऑफिसची मीटिंग आहे.”
“रेवा…”
“हं?”
“तुला सगळ्यांच्या मीटिंग आठवतात.”
ती त्याच्याकडे पाहत राहिली.
तो पुढे म्हणाला,
“माझीही. रमेशचीही. आईचीही.”
“मग?”
“तुझी स्वतःची कधी आठवणार?”
ती काही बोलली नाही.
शरदने तिचा हात हातात घेतला.
“मी येणार.”
सोमवारी पहाटेच दोघं आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
रिसेप्शन.
कागदपत्रं.
सहमतीपत्र.
बिल.
रेवती एका काउंटरवरून दुसऱ्यावर धावत होती.
आई शांत बसली होती.
समोरच्या बाकावर एक वृद्ध महिला बसली होती.
त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि सून.
मुलगा आईच्या खांद्यावर हात ठेवून म्हणत होता,
“घाबरू नकोस आई.”
आई हसली.
“तू आहेस ना.”
ते शब्द रेवतीच्या कानावर पडले.
ती नकळत स्वतःच्या आईकडे पाहू लागली.
आईही त्यांच्याकडेच पाहत होती.
काही क्षणांनी आई हळूच म्हणाली,
“रेवा…”
“हं?”
“तू बाहेर जाऊन चहा पिऊन ये.”
“आत्ता?”
“हो.”
“नको.”
“जा ना.”
“मी इथेच आहे.”
आई हसली.
“तू कायम इथेच असतेस.”
रेवतीने उत्तर दिलं नाही.
ऑपरेशन थिएटरचा दरवाजा बंद झाला.
लाल दिवा लागला.
कॉरिडॉरमध्ये अचानक शांतता पसरली.
रेवती खुर्चीवर बसली.
पहिल्यांदाच तिला जाणवलं…
ती खूप थकली आहे.
इतक्यात शरदने तिच्या हातात चहाचा कप दिला.
“घे.”
“नको.”
“सकाळपासून काही खाल्लं नाहीस.”
तिने कप घेतला.
पहिला घोट घेताना तिचे डोळे पाणावले.
“काय झालं?”
शरदने विचारलं.
ती हळूच म्हणाली,
“माहितीय… आज मला आईची भीती नाही वाटत.”
“मग?”
“मला माझी भीती वाटते.”
“कशाची?”
“जर उद्या मीच अशी आजारी पडले तर…”
वाक्य अर्धवट राहिलं.
शरदने तिच्याकडे पाहिलं.
दोघांनाही पुढचं वाक्य बोलायची गरज नव्हती.
उत्तर दोघांनाही माहित होतं.
ते उत्तरच रेवतीच्या मनात अनेक वर्षांपासून न बोललेलं दुःख बनून राहत होतं.
ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा अजूनही सुरू होता.
कॉरिडॉरमध्ये बसलेली माणसं आपापल्या विचारात हरवली होती.
कोणी देवाचा जप करत होतं.
कोणी डॉक्टर कधी बाहेर येतात याकडे डोळे लावून बसलं होतं.
रेवतीच्या हातातला चहाचा कप थंड झाला होता.
ती समोरच्या भिंतीकडे पाहत बसली होती.
“काय विचार करतेस?”
शरदने हळूच विचारलं.
ती बराच वेळ काही बोलली नाही.
मग मंद आवाजात म्हणाली,
“तुला माहिती आहे… मला आईची काळजी नाही वाटत.”
“मग?”
“मला एकच भीती वाटते…”
“कोणती?”
“आई गेल्यावर मी रिकामी होईन.”
शरद तिच्याकडे पाहत राहिला.
“रिकामी?”
“हो.”
“म्हणजे?”
“मी इतकी वर्षं फक्त धावत आले…
आईसाठी…
घरासाठी…
सगळ्यांसाठी…
की माझं स्वतःचं आयुष्य कुठे संपलं तेच कळलं नाही.”
शरद काही बोलला नाही.
त्याने फक्त तिचा हात हातात घेतला.
थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले.
“ऑपरेशन व्यवस्थित झालं.”
रेवतीने खोल श्वास घेतला.
जणू अनेक दिवसांनी फुफ्फुसात हवा भरली.
“दोन तासांनी भेटू शकता.”
आईला वॉर्डमध्ये आणलं तेव्हा तिच्या डोळ्यावर पट्टी होती.
ती आवाजावरून म्हणाली,
“रेवा…”
“हं आई.”
“तू आहेस?”
“हो.”
आईने तिचा हात घट्ट धरला.
“मग मला काही भीती नाही.”
हे वाक्य ऐकताच रेवतीच्या मनात एक विचार चमकून गेला.
‘माझ्या भीतीचं काय?’
तो विचार क्षणभर आला…
आणि पुन्हा मनात खोल दडून बसला.
दुसऱ्या दिवशी आईला डिस्चार्ज मिळाला.
सगळी औषधं, सूचना, पुढच्या तपासणीची तारीख…
सगळं रेवतीने वहीत लिहून घेतलं.
घरी आल्यावर आईला झोपवलं.
औषधं वेळेवर दिली.
डोळ्यात ड्रॉप्स टाकले.
रात्री अकरा वाजले.
ती पहिल्यांदाच सोफ्यावर बसली.
घरभर शांतता होती.
तेवढ्यात फोन वाजला.
रमेश.
तिने फोन उचलला.
“हॅलो.”
“ऑपरेशन झालं?”
रेवती काही क्षण गप्प राहिली.
“हो.”
“सगळं ठीक?”
“हो.”
“बरं.”
पुन्हा शांतता.
मग तो म्हणाला,
“मी उद्या येतो.”
रेवतीने शांतपणे विचारलं,
“कशासाठी?”
“आईला भेटायला.”
“ये.”
“तू आहेस ना?”
हे शब्द ऐकताच…
पहिल्यांदाच रेवतीने डोळे मिटले.
ती शांत आवाजात म्हणाली,
“नाही.”
रमेश दचकला.
“काय?”
“उद्या मी नाही.”
“म्हणजे?”
“मी ऑफिसला असेन.”
“मग आई?”
“तू असशील.”
पलीकडे बराच वेळ शांतता होती.
“रेवा… मला जमेल की नाही माहीत नाही.”
“मलाही पहिल्यांदा जमलं नव्हतं रमेश.”
ती पुढे म्हणाली,
“पण मी शिकले.”
फोनच्या दुसऱ्या टोकाला श्वासाचा आवाज येत होता.
रेवती पुढे काही बोलली नाही.
पहिल्यांदाच…
तिने शांततेला बोलू दिलं.
दुसऱ्या दिवशी दुपारी ऑफिसमध्ये असताना आईचा फोन आला.
“रेवा…”
“काय गं?”
आईच्या आवाजात हसू होतं.
“रमेश आला होता.”
रेवती काही बोलली नाही.
“त्याने मला जेवण वाढलं.”
“…”
“औषधही दिलं.”
“…”
“ड्रॉप्स टाकताना मात्र दोनदा चुकला.”
दोघी हसल्या.
आई पुढे म्हणाली,
“जाताना म्हणाला…
‘आई, उद्याही येतो.'”
रेवतीच्या डोळ्यांत पाणी आलं.
ती खिडकीतून बाहेर पाहत राहिली.
कधी कधी…
माणसं बदलत नाहीत.
त्यांना फक्त…
पहिल्यांदा जबाबदारी जगू दिली जाते.
त्या संध्याकाळी घरी आल्यावर शरदने विचारलं,
“आज तू वेगळी दिसते आहेस.”
“का?”
“हलकी.”
रेवती हसली.
“आज मला एक गोष्ट समजली.”
“काय?”
“मी तीस वर्षं एक चूक करत होते.”
“कोणती?”
“लोकांना जबाबदारी शिकायची संधीच देत नव्हते.”
शरद हसला.
“आणि आता?”
“आता…”
ती खिडकीबाहेर पाहत म्हणाली,
“आईची साथ मी शेवटपर्यंत सोडणार नाही.
पण…
आईची प्रत्येक जबाबदारी फक्त माझीच आहे…
हा समज मात्र आज सोडून दिला.”
त्या क्षणी बाहेर हलका पाऊस सुरू झाला.
रेवतीने हात पुढे केला.
पावसाचे दोन थेंब तिच्या तळहातावर पडले.
कित्येक वर्षांनी…
तिला ते थेंब फक्त पावसाचे वाटले.
ओझ्याचे नाही.
डॉ मधुरिमा कुलकर्णी
41 Responses
खूप छान लिहिले आहे….
Thank u💗
Very nice
Thank u💗
शेवट छान आहे!!
मला पण आवडला Thank u💗
खूप छान लिहिलं आहे
Keep responding like this. Thank u💗
खूप छान लेख
खूप सुंदर लिखान अशीच लिहीत रहा मधू
Keep responding like this. Thank u💗
Keep responding like this. Thank u💗
खूप छान लेख , 👌👌
Keep responding like this. Thank u💗
एकदम खरे आहे.
Thank u 💗
Keep responding like this. Thank u💗
छान लिहिले आहे. Keep it up!!!
Keep responding like this. Thank u💗
गोष्ट आवडली.
आपला अभिप्राय हीच माझ्या लिखाणाची संपत्ती …thank u 💗
सुंदर लिखाण 👌
धन्यवाद 🙏
Very nice
धन्यवाद 🙏
Khup Chan lihile ahe
धन्यवाद 🙏
Khup sunder 👌🏻👌🏻👌🏻 manala bhidnari katha
धन्यवाद 🙏आपला अभिप्राय हीच लिखाणासाठीची संपत्ती..
अनुभवातून शिकणे ,
शहाणे होणे आणि
पुढे अधिक चांगलं
आयुष्य जगणे हेच माणूस पण आहे…
धन्यवाद 🙏आपला अभिप्राय हीच लिखाणासाठीची संपत्ती..
उत्तम कथा. या मिडीयाच्या रीलच्या जगात सहजी लक्षात न येणाऱ्या या परस्पर संबंधांची कहाणी.
आमच्या जवळच्या नात्यात अशीच घटना घडली त्याचा मी गेली तीस वर्षे अनुभव घेतला. ती माता वयोमाने निवर्तली, ताई उदास झाली आणि भाऊ पश्चात बुद्धी दुःखी झाला. असो.
आपल्या आजूबाजूला..कधीकधी आपल्या बाबतीत पण काहीतरी घडत असतेच…धन्यवाद 🙏
एखाद्याला गृहीत धरणे हा प्रकार खूप असतो .. गृहीत धरले जातो त्या माणसाला ही स्वतःचे आयुष्य असते हा विचारच नसतो…हे म्हणजे माती मऊ लागतोय तर ढोपराने खणण्या सारखे आहे….जबाबदारी वाटून घेणे यात शहाणं पण असते…
इथे प्रत्येकालाच आपण धनाने हे समजणे दिलेले देणे आहे..तिथे तात्विक विचार कुठला? त्यामुळे गृहीत धरणे ओघानेच आले….
अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
मस्त
Thank u💗
Very nice
Thank u💗
Nice story. Worth my time!
Thank u💗