शेवटचा पेग

रात्रीचे साडेदहा वाजले होते.

दरवाज्यावरची बेल सलग तीनदा वाजली.

स्मिताने दार उघडलं. समोर अमोल उभा होता. डोळे लाल, अंगातून दारूचा तीव्र वास, पाय लटपटत होते.

“जेवण वाढू?” स्मिताने शांतपणे विचारलं.

“तुझं ते रोजचं सुरू करू नकोस…” तो मोठ्याने ओरडला.

हॉलमध्ये अभ्यास करत बसलेला दहा वर्षांचा अथर्व दचकला. सात वर्षांची अन्वी आईच्या मागे येऊन उभी राहिली.

“आई… बाबा पुन्हा प्यायलेत का?”

स्मिताने काहीच उत्तर दिलं नाही. तिने फक्त मुलांना आतल्या खोलीत नेलं.

अशी रात्र त्या घरासाठी नवीन नव्हती…

पण अमोल असा नव्हता.

तो एका नामांकित कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता. उत्तम पगार, स्वतःचं घर, चारचौघांत मान, प्रेमळ आई-वडील, समजूतदार पत्नी आणि दोन गोड मुलं…

जीवनात काहीच कमी नव्हतं.

स्मिताही पदवीधर होती. लग्नानंतर काही वर्षे तिने एका खासगी कंपनीत नोकरी केली होती.

एके दिवशी अमोलने तिचा हात हातात घेतला.

“स्मिता… आता आपलं सगळं छान चाललंय. माझा पगार पुरेसा आहे. तू नोकरी सोड. घर, मुलं, आई-बाबा… हे सगळं तू मन लावून सांभाळ. घराबाहेरचं मी बघतो.”

स्मिता हसली.

“पुढे काही अडचण आली तर?”

अमोलने आत्मविश्वासाने उत्तर दिलं,

“जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत तुला कशाचीच काळजी करायची गरज नाही.”

त्या विश्वासावर तिने नोकरीचा राजीनामा दिला.

तिने स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवली. मुलांचं संगोपन, त्यांचा अभ्यास, सासू-सासऱ्यांची सेवा, घराची प्रत्येक जबाबदारी… हेच तिचं जग बनलं.

ऑफिसमधल्या पार्टीत घेतलेला “फक्त एक पेग” हळूहळू रोजच्या सवयीमध्ये बदलला.

मग आनंद असो किंवा दुःख…

यश असो किंवा ताण…

प्रत्येक कारणासाठी दारू हवीच.

आणि शेवटी…

कारणाचीही गरज उरली नाही.

“अमोल, एवढी का पितोस रे?” आई अनेकदा विचारायची.

“माझ्या पैशाची पितो. तुम्हाला काय?”

त्याच्या त्या एका वाक्याने आईच्या डोळ्यांत पाणी यायचं.

वडील शांतपणे बाहेर निघून जायचे.

महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार यायचा.

पाच तारखेपर्यंत अर्धा संपायचा.

मुलांची फी पुढे ढकलली जायची.

वीज बिल थांबायचं.

घराचा हप्ता उशिरा भरला जायचा.

पण दारूवरचा खर्च…

तो कधीच थांबला नाही.

ऑफिसमध्येही बदल दिसू लागला.

उशिरा पोहोचणं…

कामात चुका…

महत्त्वाच्या मिटिंग विसरणं…

एकदा तर नशेत कंपनीची गाडी धडकवली.

मॅनेजरने शेवटची संधी दिली.

पण व्यसनाला संधीची भाषा समजत नाही.

काही महिन्यांत अमोलची नोकरी गेली.

घरातलं वातावरण पूर्ण बदललं.

आईचा रक्तदाब वाढला.

वडिलांनी लोकांत जाणं कमी केलं.

“तुझा मुलगा काल रस्त्यावर पडला होता…”

असं कोणी सांगितलं की त्यांची मान नकळत खाली जायची.

स्मिता बाहेरून हसायची…

पण रात्री उशी भिजेपर्यंत रडायची.

शारीरिक मारहाण रोज नव्हती.

पण दारूच्या नशेत बोललेले शब्द तिच्या मनावर खोल जखमा करून जायचे.

अथर्वने मित्रांना घरी बोलावणं बंद केलं.

एकदा शाळेत एका मुलाने विचारलं,

“तुझा बाबा रोज दारू पितो ना?”

त्या दिवशी अथर्व घरी आला आणि बाबांचा फोटो कपाटात उलटा ठेवला.

अन्वीला दरवाज्याची बेल वाजली की भीती वाटायची.

“आज बाबा पुन्हा ओरडतील का?”

हा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर कायम असायचा.

घरातील दागिने विकले गेले.

मग स्कूटर.

मग बचतीची एफडी.

पण बाटली मात्र रोज घरी यायची.

नातेवाईक दूर गेले.

मित्रांनी फोन करणं बंद केलं.

समाजातला मान संपला.

एक दिवस अमोलला रक्ताची उलटी झाली.

रुग्णालयात डॉक्टरांनी अहवाल हातात घेतला.

“यकृत पूर्णपणे निकामी झालं आहे. आम्ही प्रयत्न करतोय… पण तयारी ठेवा.”

स्मिताने त्याचा हात हातात घेतला.

अमोलने अथर्वकडे पाहिलं.

त्याला काहीतरी बोलायचं होतं…

कदाचित “माफ कर.”

पण शब्द बाहेर आले नाहीत.

काही तासांत सगळं संपलं.

अमोल गेला…

पण त्याच्यासोबत दुःख गेलं नाही.

ते कायमचं त्या घरात राहायला आलं.

काही महिन्यांनी स्मिताने कपाटातून स्वतःची प्रमाणपत्रं बाहेर काढली.

कागद पिवळे पडले होते…

पण जबाबदाऱ्या नव्याच होत्या.

अनेक वर्षांच्या खंडानंतर तिला एका छोट्याशा कार्यालयात नोकरी मिळाली.

सकाळी पाच वाजता उठून ती घरचं सगळं आवरायची.

मुलांचे डबे…

शाळा…

ऑफिस…

संध्याकाळी परत आल्यावर पुन्हा स्वयंपाक, अभ्यास, घर.

महिन्याच्या शेवटी प्रत्येक रुपयाचा हिशोब करावा लागायचा.

अथर्वची फी…

अन्वीची पुस्तकं…

घरखर्च…

औषधं…

सगळं भागवताना स्वतःसाठी मात्र ती काहीच घेत नसे.

अन्वीला शाळेच्या सहलीला जायचं होतं.

फॉर्म भरलाच गेला नाही.

अथर्वला महागड्या क्लासला जायचं होतं.

त्याने शांतपणे लायब्ररीचा रस्ता धरला.

नवीन कपडे सणालाच.

हॉटेलमध्ये जेवण वर्षातून एखाद्यावेळी.

स्मिताला मुलांचं मन मारून जगणं पाहवत नव्हतं.

रात्री दिवे बंद झाल्यावर ती शांतपणे रडायची.

स्वतःच्या अपुऱ्या राहिलेल्या स्वप्नांसाठी नाही…

तर परिस्थितीने तिच्या मुलांना त्यांच्या वयाच्या आधीच मोठं व्हायला भाग पाडलं होतं म्हणून.

पण दुसऱ्या दिवशी ती पुन्हा उभी राहायची.

कारण तिच्यासमोर एकच ध्येय होतं…

“माझी मुलं शिकलीच पाहिजेत.”

अथर्व मोठा होत गेला.

त्याच्या मनात वडिलांविषयी प्रेम नव्हतं.

फक्त एक खोल राग होता.

तो अनेकदा स्वतःशीच म्हणायचा,

“माझे बाबा दारूमुळे मेले नाहीत…

त्यांनी आम्हाला जगता-जगता मारलं.”

आईच्या कष्टांनी…

स्वतःच्या जिद्दीने…

शिष्यवृत्ती मिळवत…

रात्रभर अभ्यास करत…

तो मोठा झाला.

एक दिवस तो एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाला.

पहिल्याच मोठ्या बिझनेस मिटिंगमध्ये सर्वांच्या हातात ग्लास आले.

त्याच्यासमोरही एक पेग ठेवण्यात आला.

“Come on, Atharv… Just one peg!”

क्षणभर त्याची नजर त्या काचेच्या ग्लासवर स्थिरावली.

त्या दारूत त्याला फक्त मद्य दिसलं नाही…

त्याला आईच्या हातावरचे घट्टे दिसले.

बहिणीची रद्द झालेली सहल दिसली.

आजोबांची खाली गेलेली मान दिसली.

आणि हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले वडील दिसले.

त्याने शांतपणे तो ग्लास बाजूला सरकवला.

हसत म्हणाला,

“तुमच्यासाठी हा एक पेग असेल…

पण माझ्यासाठी तो एका उद्ध्वस्त झालेल्या घराची सुरुवात आहे.”

सभागृहात काही क्षण शांतता पसरली.

अथर्वच्या चेहऱ्यावर समाधान होतं.

कारण त्या दिवशी त्याने फक्त दारू नाकारली नव्हती…

त्याने आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणाऱ्या चक्रालाच कायमचं नाकारलं होतं.

 

डॉ मधुरिमा कुलकर्णी

8 Responses

  1. As usual खूप सुंदर कथा.संपूच नये अशी वाटणारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Related Posts

IMG-20260703-WA0004
WhatsApp Image 2026-06-18 at 9.25

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you