भीती असतेच… पण जगणं थांबत नाही

आज सकाळी योगा क्लासवरून येताना तिची भेट झाली…
रोज दिसणारी तीच १२–१३ वर्षांची मुलगी…रस्त्याच्या कडेला तिचं छोटंसं फुलांचं दुकान मांडताना.

मी नेहमी तिच्याकडून फुले घेते.
वेगवेगळ्या रंगांची, तऱ्हेतऱ्हेची फुलं नीटनेटकी लावत असताना एकीकडे गिऱ्हाईकांवरही तिचं बारकाईने लक्ष असतं.

सकाळची वेळ… सगळ्यांची घाई…
आणि ते इवलेसे हात मात्र झपाझप काम करत असतात.

काहीजण वैतागून म्हणतात,
“ए, दहा रुपयांची फुलं द्यायला किती वेळ लावतेस?”

काहीजण तक्रार करतात,
“अगं, चांगली फुलं टाक… सगळा शिळा माल आहे!”

काहीजण तर फारच चिकित्सक —
“ही नको… ती दे… अजून ताजी दे…”
पण ती?

न चिडता, न कुरकुरता… चेहऱ्यावर हसू ठेवून सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करत असते.

आज थोडं कुतूहल वाटलं.
मी थांबले. गर्दी कमी झाल्यावर तिच्याशी बोलायला सुरुवात केली.

“काय गं, शाळेत जातेस का? की दिवसभर इथेच असतेस?”

ती म्हणाली,
“ताई, सध्या सुट्टी आहे… पण जाते की शाळेत! इथच मनपाच्या…यंदा सातवीत गेले… पहिला नंबर आलाय माझा.”

“अरे वा! मग पुढे काय करायचं?” मी

“माहित नाही अजून… पण खूप शिकायचं आहे.”

हे सगळं बोलतानाही तिचा हात कामात गुंतलेलाच होता.

मी सहज विचारलं,
“अगं… तो शेजारचा फुलवाला तुझ्याकडे फारशा चांगल्या नजरेने बघत नाहीये… तुझ्या लक्षात येत नाहीये का?”

ती अगदी सहज म्हणाली,
“सगळं समजतंय ताई… पण मूर्खांकडे लक्ष द्यायला वेळ कुणाकडे आहे? हे तर नेहमीचं आहे.”

मी थोडी अस्वस्थ झाले.

“हे बरोबर नाही गं… कुणाचा काय भरवसा? कुठे गाठतील, काय करतील…”

माझ्यातली ‘सभ्य, काळजी करणारी, थोडी घाबरलेली बाई’ जागी झाली होती.

ती मात्र शांतपणे म्हणाली,
“ताई, तुमची काळजी कळतेय मला.”

“मग आई-वडिलांना माहिती आहे का हे सगळं?”

“अहो ताई, या मुदड्याला सोडा… परवाच चपलीचा चांगला इंगा दाखवलाय! पण असे कितीतरी भेटतात रोज… कुठे कुठे लक्ष द्यायचं?”

“भीती नाही वाटत?”

ती क्षणभर थांबली.
“वाटते की… पण किती दिवस भ्यायचं? दोन-चार थोबाडीत दिल्या की यांचा माज उतरतो.”

बारा वर्षांच्या मुलीचं हे तत्वज्ञान ऐकून मी अक्षरशः थबकले.

मी म्हणाले,
“अगं, सध्या दिवस किती वाईट आहेत, माहिती आहे ना तुला?”

ती हसली.
“सगळं माहितीये… पण म्हणून जगणं सोडून नाही ना चालणार? आणि ताई, एक गंमत सांगू?”

पुढचं गिऱ्हाईक उरकून ती जरा जवळ येत म्हणाली,
“अशा लोकांचा माज वरवरचा असतो. आपण घाबरलो की त्यांचं काम होतं. त्यापेक्षा थोडा मोठा आवाज काढला, जरा ठाम उभं राहिलो… की यांचीच फाटते! त्यामुळे अजिबात भ्यायचं नाही… काय?”

ती मिस्कील हसली आणि पुन्हा तिच्या गर्दीत हरवून गेली.

मी फुलं घेऊन तिथून निघाले…
पण तिचे शब्द मात्र डोक्यात रेंगाळत राहिले.
“आपण घाबरलो की समोरच्याचं फावतं…”
किती साधं लॉजिक आहे!
पण आपण अनेकदा विसरून जातो.
रोज सोशल मीडियावर मुलींवरील अत्याचारांच्या बातम्या झळकत असतात. चर्चा होतात, संताप व्यक्त होतो… पण उपाय? आत्मविश्वास? स्वतःला कसं सांभाळायचं? मानसिक तयारी? ,याबद्दल फारसं बोललं जात नाही.
आज मात्र एका १२ वर्षांच्या छोट्या फुलवालीने मला बरंच काही शिकवलं…

“भीती असतेच… पण भीतीपुढे उभं राहण्याची हिंमतही शिकवावी लागते.”

डॉ मधुरिमा कुलकर्णी

14 Responses

  1. छान मांडलं आहे तुम्ही . सुंदर विचार समोर आलाय “आपण घाबरलो की समोरच्याचं फावतं…” खरंय ते सध्या ची परिस्थिति फार वाईट आहेच कोणीही उठत आणि काहीही करत त्यात सोशल मीडिया मुळे सारख काही ना काही ऐकायला येतंय . प्रत्येकाने विशेषतः मुलीनी स्वतःला बदलण आणि आत्मविश्वास आणण गरजेचं आहे. परिस्थिति बदलणार नाही आपण बदलायला हवं.

  2. शेवटचं वाक्य अगदी खरंच आहे. आणि प्रत्येकाला त्याची गरज आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Related Posts

मुलं बदलतात…
मोगरा…

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you