गायत्रीने मोठा सुस्कारा सोडला , डोळ्यातलं पाणी हळूच टिपलं आणि ती बाहेर पडली. अस पाणी टिपण्याची किंवा त्या पाण्याची खबर इतरांना लागू न देण्याची तिला आता सवयच झाली होती. पण आज मात्र तिला ते जमलं नाही. बाहेर पडल्यावर शेजारच्या आठ वर्षांच्या शरूने तिला विचारलच
” काय झालं ग आजी? का रडते आहेस?”
” मी, कुठे ? नाही ग..डोळ्यात कचरा गेला वाटतं” गायत्रीनं चटकन मान फिरवली आणि डोळ्यातलं पाणी टिपलं.
शरू लहान होती, खेळण्यात मग्न होती. त्यामुळे तिला ते चटकन पटलं . पण गायत्रीला आज काहीच पटत नव्हतं. पुन्हा पुन्हा भरून येणारे डोळे पुसताना तिची तारांबळ उडत होती.
गेले कित्येक वर्ष जे घडलं तेच तर आज घडलं होतं मग आज एवढ काय लागलं आपल्या मनाला? विचार करता करता गायत्री सोसायटीच्या गार्डन मध्ये येऊन बसली.
तशी गायत्री फार वयस्क नव्हती. असेल पन्नास पंचावन्न. अलीकडेच ती तिच्या जबाबदाऱ्यांमधून थोडी मोकळी झाली होती. मुलगी लग्न होऊन परदेशी सेटल झाली होती. मुलाचही लग्न झालं होत. सून तशी समजदार होती. विश्वास , तिचा नवरा व्यक्ती म्हणून खूप चांगला होता. त्याचं nature खूप helping होत. शांत स्वभाव, अनेक गोष्टींची हौस असलेला असा होता.
तिचा संसारही चारर्चौंघींसखा झाला. आयुष्यात अनेक चढउतार आले. ताणतणाव आले अगदी इतके की नको आयुष्य, नको संसार इतके. पण तशा या गोष्टी कुणाला चुकल्या आहेत?
विश्वासला खूप खंबीर साथ देत तिनं आतापर्यंतची मजल मारली होती. दोन गोंडस मुलं.. हुशार शिकून शहाणी झाली आणि आपल्या आपल्या आयुष्यात सेटल पण झाली.
बाहेरून कोणी बघितलं तर गायत्रीचा संसार अगदी दृष्ट लागेल असा होता. तरीही गायत्री एक खंत घेऊन आयुष्यभर जगली. विश्वासावर तिचं खूप प्रेम होत. त्याचही असावं कदाचित कारण त्यानं तिच्या सर्व गरजा विनातक्रार पूर्ण केल्या होत्या.
मग प्रोब्लेम कुठे होता? गायत्री पहिल्यापासून एक स्वाभिमानी स्त्री होती. लग्नानंतर घर संसार चालवण्यासाठी घराबाहेर पडणं आवश्यक आहे हे तिच्या लक्षात आल्याबरोबर एका छोट्या कंपनीमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून ती नोकरीला लागली. यथावकाश झालेली दोन मुले, घर काम, सासू सासऱ्यांची मर्जी आणि नोकरी हे सर्व करताना तारुण्य कुठे निघून गेले समजले नाहीच. बरोबर मनातल्या अनेक इच्छा मनातच राहिल्या.
बऱ्याचदा तीचं मन बंड करून उठायचं. पण त्याचा काहीच उपयोग नव्हता.
विश्वास एक चांगला बाप होता, अतिशय आज्ञाधारक मुलगा होता पण नवरा म्हणून तो आपला रिस्पेक्ट करत नाही अशी गायत्रीची तक्रार होती. त्याच्या खांद्याला खांदा लावून अतिशय कष्टानं तिनं तिचा संसार उभा केला होता. पण घरात एखादी गोष्ट ठरवायची असेल तर तीचं मत घ्यावं असं कोणाला वाटायचंच नाही. कुटुंबात घडणाऱ्या गोष्टींमध्ये आपण सामील असायला हवं हा तिचा हट्ट होता आणि तिचा संघर्ष याच गोष्टीसाठी होता. एखाद्या बाईचा नवरा जेव्हा तिचा रिस्पेक्ट करत नाही तेव्हा इतर लोकांकडून ती अपेक्षाही करणे चूक आहे.
सुरवातीला तीनं अडवून सुचवून पाहिल, नंतर त्रागा केला, कधीकधी तर कडेलोट होतील इतकी भांडणेही झाली . पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आणि काय कारण असेल ते असेल ती स्वतःच्याच फॅमिलीपासून कायम अलिप्त राहिली. ती आणि विश्वास केवळ सवयीनं एकत्र राहिले.
अगदी गेल्या चार पाच वर्षांपर्यंत ती याच चक्रात अडकली होती. आता मात्र या सगळ्याचा तिला अतिशय कंटाळा यायचा. वाद, भांडण याची भीती वाटायची. आपला नवरा आपला असावा, त्यानं चार लोकांमध्ये आपलं कौतुक नाही पण किमान थोडा रिस्पेक्ट द्यावा एवढीच अपेक्षा असलेली गायत्री आता थोडी बदलली.
तिच्या नोकरीमध्ये आता ती बऱ्यापैकी वरच्या पोस्टला गेली होती. पगारही भरपूर होता. घरातून आनंद मिळत नाही, मानसिक समाधान मिळत नाही तर तिनं तिचा आनंद स्वतः शोधला. ती तिच्या मैत्रिणींमध्ये रमायला लागली. आत्मविश्वासाने स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली. लोक काय म्हणतील याला फाटा देऊन तिनं स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप बदल केला. वेळ न मिळाल्यामुळे जे करायचं राहून गेल होतं आता ते सगळ ती करत होती.
हे सर्व करताना तिनं तिच्या घराच्या मर्यादा कधीच ओलांडल्या नाहीत मात्र स्वतःच अस्तित्व ती सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ लागली.
याचा परिणाम घरात नाही म्हटलं तरी झाला. विश्वास तिच्या बदललेल्या व्यक्तिमत्वाने दुखावला गेला. त्यांच्यामध्ये वाद, भांडणे सुरू झाली. दुरावा वाढायला लागला. गायत्री मधून मधून अस्वस्थ होत होती. काही गोष्टी विश्वासाला समजावण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. आता तर विश्वास तिच्या प्रत्येक गोष्टीत मुद्दामून चुका हुडकून काढू लागला, टोमणे तर नित्याचेच झाले होते. तरीही गायत्री या सगळ्याकडे दुर्लक्ष करून तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली.
डोळ्यातून येणाऱ्या पाण्याला थोपवण्याचे प्रयत्न जमायला लागले. कधी कधी रात्री आसवांनी भिजून उशी ओली व्हायची मात्र सकाळ प्रसन्न असायची
मग आज असं काय झालं होत? अशाच एका कुरबुरीमधे विश्वास बोलून गेला
” आता तू काय स्वावलंबी झालीस. तुला आमची काय गरज? आमचे प्रॉब्लेम्स आम्ही सोडवू.”
” आम्ही सोडवू? म्हणजे मी तुमच्यात नाही? तुला कळतंय का तू काय बोलतो आहेस ते? अरे प्रश्न आपल्या मुलाचा आहे. मी आई आहे त्याची”
” असशील पण मला तुझी गरज नाही”
” ती तर तुला तशी कधी नव्हतीच. तुझे आई वडील आणि तू त्यात मी होतेच कुठे? पण आता मी गप्प बसणार नाही. तू मला अडवू शकत नाहीस” ती जवळजवळ किंचाळली
मुलगा आणि सून या रोजच्या वादाला कंटाळले होते. त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता आणि विश्वासाने नेहमीप्रमाणे सगळ खापर गायत्रीच्या डोक्यावर फोडलं होत.
आज गायत्री कोसळली जेंव्हा मुलाने सुद्धा “कंटाळलो आहे आई मी” असे सुतोवाच केले तेंव्हा तिला वाटलं हेच तो त्याच्या वडिलांना का नाही बोलला? तीनच उभ्या केलेल्या घरातील तीचं शून्य अस्तित्व तिला वाकुल्या दाखवत होतं.
बागेतल्या बाकावर बसून गायत्री मनसोक्त रडत होती. आता तिनं मुळीच तिचे वाहणारे अश्रू लपवले नाहीत किंवा थांबवले सुद्धा नाहीत. थोड्या वेळाने शांत झाल्यावर गायत्रीने मोबाईलवरून एक नंबर डायल केला… आणि नाव आलं अभय…
पुढे काय झालं… किंवा होणार… अभय कोण?.. यासाठी भाग 2 वाचायला विसरू नका…
आणि..
कथेला लाईक, कमेंट आणि शेअर करा
डॉ मधुरिमा कुलकर्णी
13 Responses
खूप छान लिहिले आहे
तुमच्या कमेंट्स मुळे मला motivation मिळते. असाच फीडबॅक देत रहा…thank u💗
तुमच्या कमेंट्स मुळे मला motivation मिळते. असाच feedback देत रहा..thank u💗
खूपच छान मॅडम. सत्य परिस्थिती आहे.
आपल्या अभिप्रायांनी माझे लेखन अजून सुधारेल..so thank u for support🌹
खूप च छान आहे.खरी परिस्थिती आहे.
आपल्या Response बद्दल खूप आभारी आहे 💗
Apratim
Thank u💗
वाचता वाचता डोळे पाणावले.. अगदी वास्तववादी लेख ma’am..
Thanks parul ….Your feedback means a lot to me.💗
आजकालच्या प्रत्येक नोकरदार स्त्रीची कहाणी वाटते. पण तरीही स्वच्छंदी आयुष्य जगणार्या स्त्रिया आहेत.
I always read your short stories; I like them very much.