मोगरा…

अगदी अलीकडेच मी माझ्या छोट्याशा टेरेसचा makeover करून घेतला आहे… अजूनही थोडंसं काम सुरूच आहे. त्या जागेत एक छोटीशी, सुंदर परसबाग फुलवण्याचा माझा मनोदय आहे. सध्या मात्र झाडं आपापल्या जागेवर थोडी दाटीवाटीने उभी आहेत… जणू अजून आपली मांडणी ठरत आहे..अस काहीतरी त्यांच्या मनात असाव, तर…

आज सकाळी मी माझ्या आवडत्या झोक्यावर बसून निवांतपणे कॉफीचा आस्वाद घेत होते. इतक्यात एका ओळखीच्या, मनाला भुरळ घालणाऱ्या सुगंधाने माझं लक्ष वेधून घेतलं…

“हा कसला सुवास?”
असं मनात म्हणत मी त्याचा मागोवा घ्यायला लागले… आणि झाडांच्या त्या गर्दीत उभं असलेलं मोगऱ्याचं झाड नजरेस पडलं.

अरे बापरे…!

कमीत कमी वीस-पंचवीस कळ्यांनी ते झाड अगदी लगडून गेलं होतं… आणि त्यातली दोन गोंडस, पांढरीशुभ्र फुलं, जणू स्वतःचा सुगंध पसरवत हसत होती…

क्षणात माझं मन चाळीस वर्ष मागे, भूतकाळात जाऊन पोहोचलं…
लहानपणी आमच्या घरी खूप मोठी बाग होती. फळांची, फुलांची, शोभेची झाडं… भाज्यांची लागवड… किमान शंभर ते दीडशे झाडं तरी असतील. त्या सगळ्या बागेची जन्मदात्री होती, माझी आई.

तिला झाडांची विलक्षण आवड… जिथे जाईल तिथून एखादं रोप आणायचंच. तिच्या बागेत प्रत्येक झाडाला प्रेमाने जागा मिळायची.
पण त्या सगळ्या बागेतला माझा आवडता कोपरा एकच—मांडवावर चढलेला मोगरा…

उन्हाळा सुरू झाला की तो कोपरा अक्षरशः सुगंधाने न्हाऊन निघायचा. कितीही फुलं काढली तरी झाडावर तितकीच पुन्हा उमललेली असायची… आणि दुसऱ्या दिवसांच्या कळ्या वाऱ्यावर अलगद डोलत असायच्या.
मी रोज ताज्या मोगऱ्याचा भरगच्च गजरा घालून शाळेत जायचे…
आणि आई? ती तर माठात मोगऱ्याची फुलं टाकायची… संपूर्ण घर त्या सुगंधाने दरवळून जायचं… अगदी वेड लावणारा तो सुगंध!

आज तोच सुगंध पुन्हा एकदा माझ्या बालपणाच्या कितीतरी आठवणी अलगद जाग्या करून गेला…
मी हळूच त्या झाडाजवळ गेले… त्या कोवळ्या फुलांवरून मायेने हात फिरवला…
डोळे मिटून, एक दीर्घ श्वास घेत मोगऱ्याचा सुगंध मनात साठवला…
आणि मग… शांतपणे, समाधानाने… माझ्या रोजच्या कामाला लागले…

डॉ मधुरिमा कुलकर्णी

11 Responses

  1. खूप सुंदर लिहिले आहे सहज आणि अचूक शब्दात वर्णन केले आहे वाचताना मोगरा आणि फुले डोळयासमोर उभी राहिली आणि योगायोगाने आज माझ्या झाडाला फुले आली.

  2. It’s very nice and sweet memorable Right up, Congratulations 🎉, All the Best 👍🍁

  3. खूप छान लिहिले आहे. मी आठवी नववी पासून साताऱ्यात असेपर्यंत हे मधुरिमा च्या घरी अनुभवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Related Posts

GondavalekarMaharaj
45269

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you