“अस्तित्व” भाग 1 वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…
मोबाईलच्या स्क्रीनवर “अभय” हे नाव चमकत होतं.
गायत्री बराच वेळ त्या नावाकडे बघत राहिली. बागेतली गर्दी कमी झाली होती. संध्याकाळचे रंग हळूहळू गडद होत चालले होते. मुलांचा गोंगाटही आता विरळ झाला होता. पण तिच्या मनातला गोंधळ काही कमी होत नव्हता.
कॉल करावा की नाही?
आजवर कितीतरी वेळा तिने स्वतःला सावरलं होतं. कितीतरी रात्री उशीत तोंड खुपसून रडली होती. कितीतरी वेळा स्वतःच स्वतःची समजूत काढली होती. पण आज काहीतरी तुटलं होतं.
आज पहिल्यांदाच तिला स्वतःच्याच घरात परक असल्यासारखं वाटलं होतं.
थरथरणाऱ्या बोटांनी तिने कॉल लावला.
“हॅलो…”
पलीकडून शांत आवाज आला.
“अभय…”
तिचा भरून आलेला आवाज ऐकताच तो सावध झाला.
“गायत्री? सगळं ठीक आहे ना?”
इतकंच.
आणि तिचा बांध फुटला.सुमारे अर्धा तास ती बोलत होती.
कधी रडत.
कधी रागाने.
कधी निराश होऊन.
तर कधी स्वतःलाच दोष देत.
अभय मध्ये एकदाही बोलला नाही.
फक्त ऐकत राहिला.
गायत्रीच्या लक्षात आलं, आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिला मध्ये न तोडता, न सल्ले देता, न्याय न करता फक्त ऐकत होतं.
सगळं बोलून झाल्यावर बराच वेळ शांतता पसरली.
मग अभय म्हणाला,
“आता बरं वाटतंय?”
“माहित नाही.”
“रडून घे. काही वेळा अश्रू हेच औषध असतं.”
गायत्री नकळत हसली.
“तू अजूनही तसाच आहेस.”
“आणि तू अजूनही सगळ्यांचं ओझं स्वतःच्या डोक्यावर घेतेस.”
अभय तिचा कॉलेजमधला मित्र होता.
कॉलेजमध्ये ते एकाच ग्रुपमध्ये होते. दोघांनाही वाचनाची आवड होती. नाटकं, वादविवाद, कविता यांत दोघं रमायचे.पण त्या मैत्रीच्या पुढे काहीच नव्हतं.
कॉलेज संपलं.लग्नं झाली.संसार सुरू झाले.आणि दोघांचे आयुष्य वेगवेगळ्या दिशांना वाहत गेलं.
जवळपास तीस वर्षांनी एका माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते पुन्हा भेटले. सुरुवातीला औपचारिक बोलणं.नंतर अधूनमधून मेसेज.
कधीतरी फोन.कधीतरी एखाद्या पुस्तकावर चर्चा.
बस्स एवढंच….
कारण त्या मैत्रीत एक गोष्ट होती.
“निर्भेळ आदर.”
“गायत्री, एक प्रश्न विचारू?”
अभयने विचारलं.
“हं.”
“तुला नक्की काय हवं आहे?”
गायत्री गप्प झाली.
तिला उत्तरच सापडत नव्हतं.
पैसा?नाही…..
घर?नाही…..
सुखसोयी?नाही….
कारण अर्थात हे सगळं तिच्याकडे होतंच.
तिला फक्त…
मान हवा होता.
स्वीकार हवा होता.
आपण या कुटुंबाचा भाग आहोत ही जाणीव हवी होती.
तिला हवं होतं “अस्तित्व” जे तिनं घरासाठी, घरातल्या माणसांसाठी निर्माण केलं होतं..
“मला असं वाटतं की मी या घरात आहेच नाही. माझ्या असण्या नसण्याने कोणाला काही फरक पडत नाही”
ती हळूच म्हणाली.
“आहेस…तू तिथेच आहेस….उलट तुझ्या असण्याने घराला आकार आणि आधार आहे”
“नाही अभय. मी फक्त जबाबदाऱ्या पार पाडणारी व्यक्ती आहे. बाकी तिथे माझी काही गरज आहे असं नाही वाटत मला” ती लांब श्वास घेत एका दमात बोलली.
आपलच अस्तित्व अशा पद्धतीने अमान्य करताना तिला विलक्षण वेदना होत होत्या.
“हे तू तुझं स्वतःच केलेलं मूल्यमापन आहे असं नाही वाटत तुला?” मृदु तरीही थोड्या ठाम स्वरात अभय बोलला
गायत्री गप्प झाली.
खरंच…
ती स्वतः कोण होती?
अभय शांतपणे म्हणाला,
“तुला माहिती आहे का? आयुष्यभर तू एक चूक केलीस.”
“चूक? कुठली?” तिनं थोड्या अविश्वासान विचारलं
“स्वतःची किंमत ठरवायचा अधिकार कायम तू इतरांना दिलास. मला वाटतंय तू स्वतःचा जरा विचार करावास”..
फोन ठेवल्यानंतर सुद्धा बराच वेळ गायत्री तशीच बसून राहिली.अभयचं ते एक वाक्य सतत तिच्या मनात घुमत होतं.
“स्वतःची किंमत ठरवायचा अधिकार तू इतरांना दिलास…”
त्या रात्री ती घरी परतली तेव्हा घरात नेहमीसारखीच शांतता होती.विश्वास टीव्ही बघत होता.त्याने तिच्याकडे पाहिलंही नाही.
पूर्वी असं झालं असतं तर ती भडकली असती. कदाचित त्रागा केला असता. छोट्याश्या गोष्टीवरून भांडणही केलं असतं….
पण आज नाही.
ती शांतपणे आत गेली.
आरशासमोर उभी राहिली.
आणि अनेक वर्षांनी स्वतःकडे नीट पाहिलं.
केसांत आलेली पांढरी झाक.
डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या.
कष्टांच्या खुणा.
त्यागाच्या खुणा.
आणि तरीही एक वेगळं तेज.
अचानक तिला जाणवलं…
आपण इतक्या वर्षांत स्वतःकडे पाहिलंच नाही.
पुढचे काही दिवस तिने कुणाशी वाद घातला नाही.स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही. कुणाकडून मान मिळवण्याचा हट्ट केला नाही.
ती फक्त तिचं आयुष्य जगू लागली.
जुन्या मैत्रिणींना भेटू लागली.
पुस्तकं वाचू लागली.
चित्रकला शिकू लागली.
तिला आवडणाऱ्या गोष्टींसाठी वेळ काढू लागली.
एके दिवशी तिच्या एका मैत्रिणीने तिला महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेत नेलं.
सुरुवातीला ती तिथे फक्त जायची. कुठल्याही उद्देश्याशिवाय….
तिथे तिला सुधा भेटली, निशा भेटली, जानकी भेटली…आणि अशा कितीतरिजणी भेटल्या ज्या कुठले ना कुठलेतरी दुःख घेऊन आयुष्य जगत होत्या..काहीजणी पर्याय नाही म्हणून तर काहीजणी स्वतःच्या शोधात…
जसजसा वेळ गेला तसतसं गायत्री तिथे रमली. ती त्या बायकांशी बोलायला लागली. त्यांचा त्रास, त्यांची दुःख समजून घ्यायला लागली
आणि मग तिच्या लक्षात आलं की जे तिला हवं होतं ते तिथं, त्या आश्रमातच होत. आयुष्यात ज्या ज्या गोष्टींसाठी तिने तडजोडी केल्या होत्या, कितीतरी भोगलं होतं, त्या सगळ्याचा उपयोग इतर महिलांना मदत करण्यासाठी होणार होता.
एका महिलेनं तिला विचारलं,
“ताई, तुम्ही एवढ्या आत्मविश्वासाने कसं बोलता?”
गायत्रीला हसू आलं.
जर हिला माझं आयुष्य माहित असतं तर?
हळूहळू ती संस्थेच्या कामात रमू लागली.समुपदेशन करू लागली.
कार्यक्रम आयोजित करू लागली.
लोक तिचा सल्ला घेऊ लागले.
तिची ओळख वाढू लागली.
मग गायत्री थांबली नाही. तिने त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि सर्वात शेवटी त्यांना समाजात त्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी होईल ती सगळी मदत केली…करतच राहिली.
घरात मात्र फारसा फरक नव्हता.
विश्वास अजूनही तसाच होता.
पण एक फरक होता.
पूर्वी त्याच्या प्रत्येक शब्दाने गायत्री जखमी व्हायची.
आता तसं होत नव्हतं.
कारण तिने स्वतःला स्वतःच्या नजरेत उभं करायला सुरुवात केली होती.
एका दिवशी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गायत्रीला प्रमुख वक्ता म्हणून बोलावलं गेलं.
सभागृह खचाखच भरलं होतं.
मंचावर उभी राहिल्यावर क्षणभर तिचे हात थरथरले.
मग तिने बोलायला सुरुवात केली.
“स्त्रीला नेहमी प्रेमाची गरज असते असं नाही…
कधी कधी तिला फक्त आदराची गरज असते.
तिला घर हवं असतं, पण त्या घरात स्वतःची जागाही हवी असते.
ती जेव्हा स्वतःचं अस्तित्व विसरते, तेव्हा ती जगासाठी जगते…
पण जेव्हा स्वतःला शोधते, तेव्हा ती खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करते…” कितीतरी वेळ गायत्री बोलत होती. एका अर्थाने तिचाच जीवनप्रवास तिने उलघडून दाखविला होता.
सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. लोक उभे राहून टाळ्या वाजवत होते.
गायत्रीच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं.
भाषण संपवून ती खाली उतरली.
आणि तिची नजर शेवटच्या रांगेत गेली.
तिथे विश्वास बसला होता.
तो कार्यक्रमाला कसा आला होता, तिला माहिती नव्हतं.
कदाचित कोणीतरी निमंत्रण दिलं असेल.
कदाचित उत्सुकतेपोटी आला असेल.
कदाचित नकळत.
घरी परतल्यावर दोघं बराच वेळ शांत होते.
मग विश्वास म्हणाला,
“आजचं भाषण छान झालं.”
गायत्री थबकली.
इतक्या वर्षांत त्याने तिचं कौतुक फार क्वचित केलं होतं.
“धन्यवाद.”
ती एवढंच म्हणाली.
बराच वेळ शांतता होती.
मग विश्वास हळूच म्हणाला,
“गायत्री…”
“हं?”
“कदाचित मी चुकलो.”
तिच्या हातातला कप थरथरला.
“माझ्या आई-वडिलांच्या, घराच्या, जबाबदाऱ्यांच्या नादात मी तुला गृहीत धरलं.”
त्याचा आवाज भरून आला होता.
“तू कायम होतीस म्हणून तुझी किंमत कधी लक्षातच आली नाही.”
गायत्री काही बोलली नाही.
कारण हे शब्द ऐकण्यासाठी तिने आयुष्याची कित्येक वर्ष वाट पाहिली होती.
विश्वास पुढे म्हणाला,
“माफ करशील?”
गायत्रीच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं.
पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं. ते आत्मसन्मानाच होतं…
ती हसली.
“मी तुला केव्हाच माफ केलं आहे विश्वास.”
त्या रात्री झोपण्यापूर्वी ती गॅलरीत उभी राहिली.
आकाशात चंद्र होता.
हातात मोबाईल होता.
तिने अभयला एक छोटासा मेसेज पाठवला.
“Thank you…”
दोन मिनिटांनी उत्तर आलं.
“माझे आभार मानू नकोस. स्वतःला शोधणारी तू स्वतःच आहेस.”
गायत्री हसली.
आणि अनेक वर्षांनी तिला जाणवलं…
तिचं अस्तित्व कुणाच्या मान्यतेवर अवलंबून नव्हतं.
ते तिच्या आत कायम होतं.
फक्त ते शोधायचं बाकी होतं.
डॉ मधुरिमा कुलकर्णी
तुम्हाला गायत्रीचे अस्तित्व कसे वाटले ते कमेंट करून सांगा…लाईक आणि शेअर करा
42 Responses
सुंदर आहे गायत्री च्या आत्मासन्मानाचा प्रवास…
Thank u🙏
बऱ्याच गृहिणींचे असेच असतें, त्यांना गृहीत धरलं जात. प्रत्येकीला ही अशी संधी मिळत नाही.
छान लेख झाला आहे. लिहीत रहा. 👍
जरूर…आपले अभिप्राय हेच inspiration आहे 🙏
खूपच छान कथा
Thank u❤️
खूप छान.
बहुतांश स्त्रियांच्या बाबतीत खर तर हे वास्तव आहे.
तुम्ही ते छान मांडल आहे.
प्रत्येकानं जरूर वाचावे.
Thank u🙏
खूप छान लिहिलं आहेस , तुला पुढील लिखाण साठी शुभेच्छा 👍👌
धन्यवाद.. 🙏
मनाची आंदोलने , स्त्री सुलभ अवलोकन करण्याची क्षमता आणि घडणारी स्थित्यंतरे अचूक मांडली आहेत. तुमच्या लिखाणातील सहजता आणि बोलके शब्द मनाला भावतात
धन्यवाद ….असेच मार्गदर्शन असू द्यावे 🙏
छान लिहिलं आहेस .तुझी वाक्यरचना ,संवाद यामध्ये ओघवता भाव आहे .कथा छान पुढे जाते आहे .
आणि त्यातून निघालेला निष्कर्ष तर खूपच महत्त्वाचा आहे
मला आवडलं …लिहीत राहा
नक्की …thank u🙏
Your writing changed the way I looked at this
Thank u🙏
Very touching
धन्यवाद🙏
Mast katha 👍🏻👌🏻💐
Thank u❤️
खूपच छान 👌
कदाचित प्रत्येक स्त्रिच्या मनात हीच सुप्त भावना असते..
फक्त प्रेम नव्हे तर आदर, तिच्या अस्तित्वाची दखल..👍🙏
खरय…एका स्त्रीची व्यथा एक स्त्रीच जाणु शकते..
धन्यवाद ❤️
स्त्रीच्या मनाची व्यथा छान शब्दबद्ध केली आहे.
खरय…एका स्त्रीची व्यथा एक स्त्रीच जाणु शकते..
धन्यवाद ❤️
सुंदर लेख
धन्यवाद🙏
सुंदर लेखन
धन्यवाद🙏
खुप छान लेख
धन्यवाद🙏
Nice end 👍👌
Thank u 🙏 मलाही हाच शेवट आवडला
सहज सुंदर लिहिलंयस मधु!
Very nice story
Thanks yoge… मार्गदर्शन करत रहा 🙏
Very nice story
Thank u 🙏🙏
अप्रतिम आणि मनाला भिडणार लेखन……
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद….लेखनात काही आवडले नाही तर तसेही mension करा…आपल्या मताचे कायमच स्वागत आहे 🙏
मी यापूर्वी तुमचे लेखन कधी वाचलेलं नव्हतं.
खूप छान लिहिता तुम्ही.
हृदयस्पर्शी आहे ही कथा.
कथेचा शेवट आम्हा वाचकांना जसा अपेक्षित असतो अगदी तसाच आहे. याचे खूप समाधान वाटले.
खूप शुभेच्छा..
जसा वेळ मिळेल तसे सगळ्या कथा वाचून घेईन..
प्रथम धन्यवाद….आपले अभिप्राय 🙏हेच inspiration आहे….
Khup chan lihlay! Masta