“शमा, देवापुढे दिवा लाव ग तेवढा… जरा कमी दिसायला लागलंय आजकाल… शिवाय हात पण थरथरतो.”
मनुताईंनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या शमाला सांगितलं. ती आता घरीच निघाली होती. सकाळी नऊ-दहाच्या दरम्यान ती यायची आणि मग दिवसभर इथेच असायची. शमा असेल तीस वर्षांची. जवळच्याच झोपडपट्टीमध्ये रहायची. पळून जाऊन केलेल्या लग्नाची जबरदस्त शिक्षा ती भोगत होती. दहा वर्षांची पोरगी तिच्या पदरात होती. अशा शमाची कहाणीच वेगळी…
पण त्या आधी थोडं मनुताईंबद्दल.
मनुताई…
वय वर्षे पंच्याहत्तर.
गुटगुटीत, गोऱ्यापान, दिसायला सुंदर या प्रकारात मोडणाऱ्या. तरुणपणी कॉलेजमध्ये असताना मनूने आपल्याकडे बघावं म्हणून मुलांमध्ये स्पर्धा लागायची. ग्रॅज्युएशननंतर मनु बँकेत नोकरीला लागली आणि इंजिनियर असलेल्या विक्रांतबरोबर प्रेमविवाह करून मोकळी झाली.
मनु आपल्या सौंदर्याची चांगलीच जाणीव ठेवून होती. पहिल्यापासून या गोष्टीचा तिला गर्व होता आणि त्यामुळे स्वभावात अहमपणा होता. लग्नानंतर तर त्यात भरच पडली. नातेवाईक, शेजारीपाजारी यांच्याशी फारसा कॉन्टॅक्ट न ठेवता ती स्वतःमध्येच मग्न असे. तिच्या एकंदरीत स्वभावाला पारखून फारसं कोणी तिच्याजवळ जाण्याचं धाडस करत नसे.
विक्रांत उच्च पदावर नोकरीला असल्याने जास्तीतजास्त बिझी असायचा. त्याचे लाड मात्र मनु व्यवस्थित करायची, त्यामुळे तो कधीच तिच्या शब्दाबाहेर नव्हता. लग्नानंतर दोन-तीन वर्षांत वरदचा जन्म झाला. खाण तशी माती या म्हणीप्रमाणे वरद जसजसा मोठा होत गेला तसतसं त्याचं व्यक्तिमत्त्व खुलत गेलं. अगदी मॉडेल वाटावा इतका तो हँडसम होता आणि स्वभावाने अगदी दुसरी मनुच…
त्याला तर आपला देश म्हणजे दरिद्री वाटायचा. त्यामुळे संधी मिळताच त्याने अमेरिका गाठली. तिकडेच अरुणाबरोबर लग्न करून कायमचा सेटल झाला.
इकडे विक्रांतराव आणि मनुताईंचा संसार मस्त चालू होता. देशात, देशाबाहेर अनेक ट्रिप्स, हॉटेलिंग अशा पद्धतीने आयुष्य सुरू होतं. आणि दहा वर्षांपूर्वी अचानक हार्ट अटॅकने विक्रांतरावांचं निधन झालं.
एकट्या पडलेल्या मनुताईंना वरद काही काळासाठी अमेरिकेला घेऊन गेला. पण माणूसघाण्या असलेल्या मनुताईंचं अरुणाशी अजिबात पटेना. खरंतर अरुणा समजदार होती, पण स्वभावाला काय औषध? अवघ्या चार महिन्यांत मनुताई आपल्या प्रशस्त फ्लॅटमध्ये परतल्या.
काही दिवस त्यांना विक्रांतरावांची कमतरता जाणवली. पण अमेरिकेत जसं कैदेत असल्यासारखं वाटायचं, त्यामुळे परत येऊन सुटका झाली या भावनेने त्या मनातून खुश झाल्या होत्या.
आता तर काय — एकटा जीव सदाशिव.
रतन सकाळी येऊन सगळी कामं करून जायची. त्यानंतर सगळं राज्य एकट्या मनुताईंचं. खालच्या पार्कमध्ये एखादी चक्कर त्या मारायच्या. बाकी गरज पडली तरच बाहेर पडायच्या. वर्षानुवर्षे कोणाशी फारसे संबंध नसल्याने येणेजाणंही नव्हतं.
यातच पाच वर्षं निघून गेली. सत्तरी ओलांडलेल्या मनुताईंचे काहीनाकाही प्रॉब्लेम्स सुरू झालेच. झोप कमी झाली होती. वयानुसार येणारी insecurity जाणवायला लागली होती. अलीकडे कधी कधी एकटेपणा अजिबात सहन व्हायचा नाही — पण काय इलाज?
त्या रोज सकाळी चातकासारखी रतनची वाट बघायच्या. तेवढे दोन तास बरे जायचे. पण काही कारणाने रतन कामावर येणं बंद झालं. मात्र तिने आपल्या बदल्यात शमाला कामावर लावलं.
मनुताईंनी शमाला पूर्ण दिवसासाठी ठेवलं. आयुष्यभर माणसांना किंमत न देणाऱ्या मनुताईंना या वयात मात्र एका गरीब, उपऱ्या मुलीवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नव्हता.
शमा…
पाळण्यातलं तिचं नाव कुमुद होत. शाळेतही तेच. घरात सगळे “कुमे, कुमे” करायचे. कळत नव्हतं तोपर्यंत ठीक होतं. पण जशी कुमुद वयात आली, तेव्हापासून तिला तिचं नाव आवडेनासं झालं. ती काही फार सुंदर नव्हती, पण उफाड्या अंगाची होती. वयापेक्षा मोठी दिसायची.
बेदरकार, मुळीच कुणाची पर्वा नसायची तिला. पण पैसा आणि श्रीमंती याचं प्रचंड आकर्षण होतं. शिवाय सिनेमा — त्यातले हिरो-हिरॉईन म्हणजे तिचे देवच जणू.
कुमुदला तिची आई नेहमी सांगायची —
0″कुमे, लै उड्या मारत जाऊ नगस… एखादा दिस धापकन आपटशील तवा कळन… अग पोरी, ह्ये आभाळ म्हंजे आपलं छत हाय… कुठ फाटलं तर टाकं बी घालता यायचं न्हाईत गं… वंगाळ वागन बंद कर. आनि साळा का ग बंद केलीस?”
आईच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं असतं, हे तर झोपडपट्टीत कोणी शिकलंच नव्हतं.
कुमुद पंधरा वर्षांची असेल. नीटनेटका आदमी छान दिसण्यासाठी जितकं शक्य असेल ते सगळं ती करायची. पावडर, लाली, टिकल्या आणि काय काय ते सगळं. बाकी सगळं तिचं तरुण शरीर निभावून नेत होतंच म्हणा.
कोपऱ्यावरच्या पानपट्टीवरून तिच्या फेऱ्या आजकाल खूप वाढल्या होत्या. बरेच अघळ-पघळ पुरुष तिथेच पडलेले असायचे. तरुण, म्हातारे, प्रौढ म्हणावे असे आदमी, काही वयात येऊ घातलेली मुलं सुद्धा. कुमी शरीराला योग्य ठिकाणी हेलकावे देत तिथून जायची की पाठोपाठ शिट्ट्यांचा पाऊस पडायचा.
कुमुद आणि दत्तूची लाइन जुळली होती. दत्तू जवळजवळ तीन वर्ष तिच्यावर नजर ठेवून होता. जशी ती त्याला पटली, तेंव्हा त्यांच्या रोमान्सला बहरच आला. दत्तू एक फालतू मेकॅनिक होता. कामापेक्षा बारा भानगडी जास्त करायचा. तुरुंगातही जाऊन आला होता.
त्याला जे हवं ते कुमुद देत होती. त्या बदल्यात तो तिला स्वस्तातल्या सगळ्या गोष्टी देत होता.
आता ती झोपडपट्टी होती. अशा गोष्टी घडणं म्हणजे तिथे काही नाविन्य नव्हतं. पण कुमुदच्या आईला वाटायचं — आपल्या पोरीचं थोडंतरी भलं व्हावं… पण नशीब.
दत्तून कुमुदचं नाव बदलून शमा ठेवलं. आणि मग तेच नाव कायम झालं.
अशी शमा एके दिवशी दत्तूबरोबर पळून गेली आणि आठ दिवसांनी लग्न करून परत त्याच झोपडपट्टीत राहायला आली.
पुरुषाला बाईचं आकर्षण तोपर्यंतच, जोपर्यंत ती त्याच्या हक्काची होत नाही. या बाबतीत हे एक टक्काही खोट ठरलं नाही. दत्तूचे बाहेरचे सगळे धंदे तसेच चालू होते. शमा चार घरची धुणी-भांडी करायची. त्यात ती राहिली पोटूशी आणि दत्ताचा तिच्यातला इंटरेस्ट संपूनच गेला. नऊ महिने पूर्ण होण्याच्या आधीच त्यानं कुठंतरी तोंड काळं केलं.
शमाचं बाळंतपण तिच्या आईनं अगदी नाईलाजास्तव केलं. काय करणार ती तरी बिचारी? तिचंही पोट तिच्या हातावरच चालत होतं. अगदी ओली बाळंतीण असताना शमाला सुद्धा कामासाठी बाहेर पडावं लागलं.
तेंव्हापासून समाजानं तिचे अनेक लचके तोडले. श्रीमंतापासून ते अगदी रस्त्यावरचा कोणीही असेल. एकटी, गरीब आणि नवऱ्यानं टाकलेली बाई म्हणजे — “आओ जाओ, घर तुम्हारा.”
शमा सतत दत्तुला शिव्या घालायची. म्हणायची, “माझं आयुष्य बरबाद करून मुडदा कुठ गेला काय की?” त्याच्या नावानं कडाकडा बोटं मोडायची. पण तीच तिच्या मुलीवर — सीतावर — खूप प्रेम होतं. सीताला सुरक्षित आणि चांगलं आयुष्य मिळावं म्हणून ती काय वाटेल ते करायला तयार होती.
आणि अशातच तिला मनुताईंच्या घरची नोकरी चालून आली.
दोघी…
सुरुवातीला दोघींचं नातं म्हणजे फक्त व्यवहार होतं.
मनुताईंच्या आवाजात अजूनही हुकूमशाही होती —
“शमा, चहा गार झालाय.”
“शमा, मीठ जरा जास्त पडलंय.”
“शमा, कप नीट धुतले नाहीस का?”
शमा ओठ चावून गप्प राहायची.
तिला पैसे हवे होते. सीताचं पोट भरायचं होतं. बाकी काही महत्त्वाचं नव्हतं.
पण घरात दिवसभर शांतता असायची. इतकी शांतता, की कधी कधी शमालाच घुसमट व्हायची.
मनुताई दिवाणखान्यात बसलेल्या असायच्या. टीव्ही चालू असायचा, पण त्यांचं लक्ष नसायचं.
कधी अचानक विचारायच्या —
“तुझी मुलगी कितवीत आहे गं?”
पहिल्यांदा शमाला आश्चर्य वाटलं होतं.
“तिसरीत…”
“चांगलं शिकव तिला. मुलगी शिकली की आयुष्य बदलतं.”
त्या दिवशी पहिल्यांदाच शमाला मनुताई फक्त ‘मालकीण’ वाटल्या नाहीत.
एक दिवस मनुताई बाथरूममध्ये घसरल्या. मोठी दुखापत नव्हती, पण त्या प्रचंड घाबरल्या होत्या. पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात भीती दिसली.
शमाने त्यांना उचललं. डॉक्टरकडे घेऊन गेली. रात्री त्यांच्या पलंगाजवळ गादी टाकून झोपली.
“मी आहे इथे…”
तिनं सहज म्हणून टाकलं.
त्या तीन शब्दांनी मनुताईंच्या आत काहीतरी विरघळलं.
त्या दिवसानंतर आवाज बदलला.
“शमा, जरा माझ्याजवळ बसशील?”
“शमा, तुझ्या हातचे पोहे छान होतात गं.”
हळूहळू दुपारच्या वेळी शमा आपली कहाणी सांगू लागली. दत्तू, शिव्या, संघर्ष, समाजाचे लचके…
सगळं ऐकताना मनुताई पहिल्यांदाच गप्प बसायच्या. त्यांना उमगलं — आयुष्य फक्त परदेशी ट्रिप्स आणि हॉटेलिंग नसतं.
एका दिवशी त्यांनी कपाटातून एक सोन्याची साखळी काढली.
“हे घे… सीतासाठी ठेव. तिच्या लग्नासाठी नाही… तिच्या शिक्षणासाठी.”
शमाच्या डोळ्यात पाणी आलं.
“माझ्यासाठी कोणी कधी असं केलं नव्हतं…”
सीता आता संध्याकाळी कधी कधी मनुताईंकडे अभ्यास करायला बसू लागली. मनुताई तिला इंग्रजी शब्द शिकवायच्या. सीता त्यांना मोबाईलवर फोटो काढून दाखवायची.
फ्लॅटमध्ये पुन्हा हसू ऐकू येऊ लागलं.
आणि त्या दिवशी…
“शमा, देवापुढे दिवा लाव गं… हात थरथरतो आता.”
शमाने दिवा लावला.
पण आज तो दिवा वेगळा होता.
तो फक्त देवापुढे नव्हता…
तो दोन स्त्रियांच्या मनातही पेटला होता.
एकीने आयुष्यभर माणसं दूर ठेवली होती.
दुसरीला आयुष्यभर माणसांनी दूर ढकललं होतं.
पण शेवटी…
दोघींनाही कळलं —
माणूस शेवटी माणसाशिवाय अपूर्णच असतो.
मनुताई आता एकट्या नव्हत्या.
शमा आता असहाय नव्हती.
दिवा रोज लावला जायचा.
आणि त्या ज्योतीत दोन वेगळ्या जगांची सावली एकत्र दिसायची.
🌿
डॉ मधुरिमा कुलकर्णी
12 Responses
Well said👍
Thank u💗
Khoop chan लिहितेस Tai keep it up
Thank u💗
Sundar aahe gosta avadli khup…
कथा आवडली.
Thank u💗
It’s heart touching story very nice mam
Thank u💗
Very nice mam it’s a heart touching story
खुप छान,
खर आहे हे, सर्व नाती काही रक्ताची नसतात परंतू त्यात आपलेपणा असतो जो रक्ताच्या नात्यात सहसा पहायलाही मिळत नाही.
आजकाल हे जगात फार कमी प्रमाणात पहायला मिळते.
🙏
Thank u💗