ती लहानखुरी, ठेंगणी, गोरीपान… दिसायला अगदी देखणीच. त्या दिवशी तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस होता लग्नाचा दिवस. वय अवघं एकोणीस. छोट्याशा खेड्यात वाढलेली स्वाती अभ्यासात खूप हुशार होती. पुढे शिकायची तिची मनापासून इच्छा होती. पण त्या काळात आणि त्या वातावरणात मुलींच्या शिक्षणापेक्षा लग्नालाच जास्त महत्त्व होतं. शेतकरी असलेल्या आप्पांनी रीतिरिवाजाप्रमाणे तिच्या लग्नाचा निर्णय घेतला.
जवळच्या तालुक्यातील केशवचं स्थळ आलं. शाळेत शिक्षक असलेला केशव स्वभावाने अतिशय शांत, पापभीरू आणि अबोल. चार भाऊ आणि एक बहीण असलेल्या मोठ्या कुटुंबातील तो सर्वात मोठा मुलगा.
केशवचे वडील पंचक्रोशीत नावाजलेले डॉक्टर होते. आसपासच्या खेड्यापाड्यांतून रुग्ण उपचारासाठी त्यांच्याकडे येत. डॉक्टरीतून त्यांनी भरपूर पैसा कमावला, पण त्याहून अधिक समाजसेवा केली. गावात सगळे त्यांना प्रेमाने “दादा” म्हणत.
दादांची पत्नी,केशवची आई,जरा तोऱ्यातच वावरणारी. जरीकाठाची नऊवारी साडी, अंगभर दागिने आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व. दादांच्या प्रतिष्ठेची झाक त्यांच्याही वागण्यात होती. बाहेर दादांचा शब्द अंतिम, तर घरात वहिनींचा.
स्वातीला पाहताच केशवने होकार दिला. लाजरीबुजरी स्वातीनेही चोरट्या नजरेने केशवकडे पाहिलं आणि तो तिलाही मनापासून आवडला.
आप्पाही आनंदी होते. आपल्या सर्वसाधारण परिस्थितीत वाढलेल्या मुलीचं लग्न एका प्रतिष्ठित आणि सधन घरात होत होतं.
“शुभमंगल सावधान…”
भटजींच्या मंत्रोच्चारात ताशा-वाजंत्री दुमदुमली. अंतरपाट दूर झाला आणि स्वाती-केशवच्या संसाराला सुरुवात झाली.
लग्नाला महिना होत नाही तोच स्वातीला घरातलं वास्तव दिसायला लागलं.
घराच्या बाहेर दादांचा शब्द चालायचा, पण घराच्या आत सासूबाईंचाच. मोठा मुलगा असूनही केशवच्या मताला फारसं महत्त्व नव्हतं. तोही शांतपणे आई-वडिलांच्या प्रत्येक निर्णयाला होकार देत राहायचा. स्वाती तर कोणाच्याच शब्दाबाहेर नव्हती.
काळ पुढे सरकत गेला. त्यांच्या संसारवेलीवर एक सुंदर फूल उमललं. त्यानंतर एकामागून एक दीरांची लग्नं झाली. वेगवेगळ्या शहरांतून आलेल्या जावा घरात रुळू लागल्या.
हळूहळू घरातील सगळी जबाबदारी स्वातीच्या खांद्यावर आली. घरकाम, पाहुणचार, सण-वार, सासू-सासऱ्यांची सेवा… सर्व काही ती मनापासून करायची. तरीही टोमणे तिचा रोजचा सोबती झाले होते.
केशवला हे सगळं दिसायचं, समजायचंही. पण त्याचा स्वभावच असा होता की, तो अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करायचा. “आपण बरं, आपली नोकरी बरी,” एवढंच त्याचं जग.
स्वाती मात्र रोज आतून होरपळत होती.
पण या सगळ्या होरपळीत तिच्यासाठी एक गारवा होता…
तो म्हणजे तिची नणंद,मीरा.
मीराचं आपल्या स्वाती वहिनीवर विलक्षण प्रेम होतं. बाकीच्या वहिन्यांपेक्षा ही वहिनी वेगळी आहे, प्रेमळ, जिव्हाळ्याची आणि मनाने मोठी, हे तिने केव्हाच ओळखलं होतं.
लग्नानंतरही मीराचं माहेरपण स्वाती तितक्याच मायेने जपायची. तिच्या आवडी-निवडी, तिचं हसणं, तिची काळजी… सगळं स्वातीच्या लक्षात असायचं.
आणि स्वातीसाठी?
घरात मन मोकळं करण्याची, सुखदुःख सांगण्याची एकमेव हक्काची जागा म्हणजे…
“मीरा वन्स.”
दिवस सरत गेले…
वर्षं उलटत गेली…
एकामागून एक भाऊ वेगळे झाले. कोणी शहरात स्थायिक झाले, तर कोणी गावातच स्वतंत्र घर करून राहू लागले.
पण केशव आणि स्वाती मात्र आई-वडिलांना सोडून कधीच गेले नाहीत.
इतक्या वर्षांत स्वातीचा दिनक्रम बदलला नाही, पण तिचा स्वभावही बदलला नाही.
आपल्या गोड, संयमी आणि प्रेमळ स्वभावाने तिने अनेक माणसं जोडली. अनेक वादळं झेलली. अनेकदा अन्याय गिळून टाकला. पण कधी कटुता मनात साठवली नाही.
कालांतराने वृद्ध झालेल्या दादा आणि वहिनींचाही तिने विश्वास जिंकला.
हा प्रवास मात्र अजिबात सोपा नव्हता.
अडचणींचे डोंगर पार करत, स्वतःचं अस्तित्व जपत स्वाती आज सत्तरीत पोहोचली होती. या संपूर्ण प्रवासात तिची निःशब्द साक्षीदार आणि कायमची सोबती होती,तिची मीरा.
आता दोघीही आजी झाल्या होत्या.
फ्रेंडशिप डेच्या सकाळी स्वातीच्या मोबाईलवर एक संदेश आला.
“आज मैत्रीदिन…
नात्याने आपण नणंद-भावजय आहोत. पण त्याहीपेक्षा आपलं नातं मैत्रीचं आहे.
माझ्या आयुष्यातल्या अनेक रिकाम्या जागा केवळ तुमच्यामुळे भरून निघाल्या.
माझी मैत्रीण असल्याबद्दल धन्यवाद…
मैत्रीदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
– मीरा
मेसेज वाचून स्वाती बराच वेळ निःशब्द बसून राहिली.
आयुष्यभर न बोलता केलेल्या प्रेमाची, जपलेल्या नात्यांची, सहन केलेल्या वेदनांची… जणू एका छोट्याशा संदेशाने पोचपावतीच मिळाली होती.
तिच्या सुरकुतलेल्या गालांवरून अलगद दोन आनंदाश्रू ओघळले…
आणि तिला जाणवलं…
रक्ताची नाती जन्माला येतात… पण मैत्रीची नाती आयुष्यभर कमवावी लागतात.
डॉ मधुरिमा कुलकर्णी
7 Responses
कथा आवडली.
सर्वांनी अगदी जवळून अनुभली असेल ही गोष्ट
मेन म्हणजे positive end आहे
So touching🙏🌹
खूप छान!!
अगदी खरं…
मैत्रीच नातं हे सर्वांपेक्षा वेगळं आणि सुंदर असतं
खूप छान
Nice👌 Keep it up👍