अधुरं स्वप्न आणि शेवटचा पाऊस

सप्टेंबरचा तो पावसाळी दिवस. कोल्हापूरच्या रंकाळा तलावावर धुके पसरलेलं, हवेत ओलसर गारवा, पाण्यावर पावसाच्या थेंबांचं मंद नृत्य… आणि तलावाच्या काठावर एक जुना लाकडी बाक. त्या बाकावर बसलेली होती अन्विता. केसांच्या बटा वाऱ्याने उडत होत्या, डोळ्यांत पाण्याच्या निळाईसारखी खोली, हातात कॅनव्हास व ब्रश. तिच्या रंगांत निसर्ग जिवंत होत होता.

तेव्हाच मागून एक शांत, मृदू आवाज आला

“तुम्ही जे चित्र काढताय, त्यात माझ्यासाठी थोडी जागा आहे का?”

ती थोडी दचकली, मागे वळली. उंच, सडपातळ, चेहऱ्यावर हलकंसं स्मित, डोळ्यांत एक वेगळच तेज. तो होता समीर. हातात वही आणि पेन.

“चित्रात लोक काढत नाही मी,” ती हसत म्हणाली, “पण हवं असेल तर प्रयत्न करते.”

तो बाकावर तिच्या शेजारी बसला. “मी शब्दांनी चित्र काढतो… कदाचित आपण एकमेकांना मदत करू शकू.”

त्या क्षणापासून, पावसात, उन्हात, संध्याकाळच्या वाऱ्यात, ते दोघं ह्याच बाकावर भेटू लागले.

अन्विता चित्रकार, समीर लेखक. ती त्याला रंग शिकवायची, तो तिला शब्दांची जादू दाखवायचा. दिवसेंदिवस त्यांच्या नजरा जास्त बोलू लागल्या. एका संध्याकाळी, पाऊस पडत असताना समीर म्हणाला “अन्वी, कधी असं वाटतं का तुला… की आपण आधीपासूनच ओळखीचे आहोत? जणू मागच्या जन्मापासून?”

ती हसून म्हणाली “वाटतं… आणि कधी कधी भीतीही वाटते… कारण जे आपल्याजवळ असतं, ते दूर गेलं तर?”

त्याने तिचा हात अलगद धरला “दूर गेलो तरी परत येऊ… वचन दे मला.”

तिने त्याच्या छातीवर डोके टेकले आणि त्याचा हात घट्ट धरून ती हलक्या आवाजात बोलली
” मी वचन देते, आयुष्याच्या शेवटपर्यंत मी तुझी इथे वाट पाहीन “

काही महिन्यांनी समीरच्या आयुष्यात वादळ आलं. घरच्यांनी त्याचं लग्न दुसरीकडे ठरवलं. त्याने विरोध केला, पण आई-वडिलांच्या अपेक्षा, समाजाची भीती, आणि कुटुंबाच्या बंधनांनी त्याला जखडून टाकलं. एका पावसाळी संध्याकाळी तो तलावावर आला. त्याच्या डोळ्यांत वेदना होत्या, आवाज एक प्रकारची थरथरत होती

“अन्वी… मला माफ करशील. माझ्या घरच्यांनी माझे लग्न ठरवले आहे. विरोध करणं माझ्या हातात नाही ग…पण मी तुला कधीच विसरू शकत नाही. तू सुद्धा तुझ्या आयुष्यात पुढे जा. लग्न कर पण इथून पुढे आयुष्यभर याच दिवशी याच वेळेला आपण इथेच आपल्या या बाकावर भेटायचं. भले जमान्यासाठी आपण आपल्या प्रेमाचा त्याग केला असेल पण आपल्यासाठी ते कधीच संपणार नाही “

तिच्या डोळ्यांतून अश्रू गळाले . अगदी मृदु आवाजात ती म्हणाली ” समीर , लग्नाचं मला माहित नाही, पण या दिवशी दर वर्षी मी इथेच असेन… “

पहिल्या वर्षी ती आली. पावसात भिजत, डोळ्यांत अपेक्षा, बाकावर बसून वाट तिनं पाहिली. तो आला नाही. दुसऱ्या वर्षीही नाही. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या वर्षीही ती येत राहिली पण तो आला नाही. प्रत्येक वेळी तिच्या मनात एकच विचार यायचा “कदाचित यावेळी तो येईल.”

तिला माहिती नव्हतं की समीर पहिल्याच वर्षी एका अपघातात गेला होता. तो कायमचा निघून गेला, पण ही गोष्ट तिच्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही.
अन्विने कधी लग्न केलेच नाही. समीरशिवाय दुसऱ्या कोणाची ती आता आयुष्यात कल्पनाच करू शकतं नव्हती.

वर्षं सरत गेली. तिचे केस रुपेरी झाले, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या, पण डोळ्यांतली तीच चमक कायम राहिली. आता ती ऐंशीच्या पुढे होती. आजारी झाल्याने तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. डॉक्टर म्हणाले “कदाचित फार वेळ नाही.”

त्या रात्री ती एकटीच पडली होती. खिडकीतून पावसाचा आवाज येत होता. मनात एकच भीती – “जर माझ्या मरणानंतर तो आलाच तर? मी त्याला भेटायचं वचन दिलंय.”

थरथरणाऱ्या हातांनी तिने एक चिठ्ठी लिहिली
“प्रिय समीर,
मला माफ कर.
मी वाट पाहिली… दरवर्षी, त्या वेळेला, त्या बाकावर.
पण आता मी थकले आहे.
जर तू आलास आणि मी त्या ठिकाणी नसले तर समज माझा शेवट जवळ आलाय. पण ही चिठ्ठी तुला साक्ष देईल की मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम केलं.”

ती चिठ्ठी तिने बाकाखालच्या दगडाखाली ठेवली. दुसऱ्याच दिवशी ती शांतपणे निघून गेली. बाहेर पाऊस कोसळत होता, जणू आकाशही तिच्या अपूर्ण प्रेमावर रडत होतं. काही वर्षांनी, तलावाच्या काठावर काम करणाऱ्या एका मुलाला ती चिठ्ठी सापडली. त्याने ती वाचली, आणि त्याच्या मनात जड शांतता पसरली. बाक तिथेच होता .शांत, पण दोन अपूर्ण आत्म्यांच्या वचनाचा साक्षीदार. पाऊस पडला की आजही लोक म्हणतात कुठेतरी, दोन आत्मे अजूनही एकमेकांची वाट पाहत आहेत.

डॉ मधुरिमा कुलकर्णी

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Related Posts

WhatsApp Image 2026-01-25 at 5.36
Screenshot_20250810_230832_WhatsApp

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you