एक गरीब म्हातारा आणि म्हातारी होते. मुलाबाळांना खूप कष्टानं वाढवून त्यांनी मोठे केले. त्यांची लग्न लावून दिली. मुलेही त्यांच्या आयुष्यात settle झाली.
सगळ्या घरात असतात तसे प्रॉब्लेम्स त्यांच्याही घरात होते. भांड्याला भांड लागत होतच…पण तरीही म्हातारा – म्हातारी होता होईल तेवढं सांभाळून घेत होते. अजून मुलांना जगाचा अनुभव नाही…शिकतील हळूहळू म्हणून अनेक गोष्टी कानाआड टाकत होते. फारच झालं तर थोड्याफार शाब्दिक चकमकी उडत होत्या . पण घरातलं भांडण चव्हाट्यावर आणायचं नसत हे त्या दोघांना चांगलच समजत होत.
पण याचा परिणाम असा झाला की दोन्ही मुलं आणि सुना त्या दोघांना गृहीत धरायला लागले. गावात त्या घराची प्रतिमा फार चांगली होती इतकी की लोक “घर असावं तर असं ” अशी एकमेकांना ग्वाही द्यायचे.
मात्र आता काहीही केलं , काहीही बोललं तरी चालतंय असा घरात नियमच झाला आणि तो मात्र म्हातारा म्हातारीला जाचक वाटू लागला.
आयुष्यभर कोणाकडून कसली अपेक्षा न करता राहिलेले ते आता मात्र मुलांकडून ,सुनांकडून अपेक्षा करत होते. कसल्या अपेक्षा ? तर घराला घरपण राहू दे याच्या. त्यांनी ते घर उभं करण्यासाठी आतोनात मेहनत घेतली होती, खूप कष्ट केले होते. आणि आता घराच्या भिंतींना पडणाऱ्या भेगा बघून त्यांचं मन कळवळून उठायचं.
म्हातारीला आता गप्प बसवेना. मान देऊ नका पण अपमान करू नका एवढंच तिचं म्हणणं होतं. अर्थात म्हाताऱ्याची याला मूकसंमती होती.
त्या दिवशी संध्याकाळी असाच काहीसा वाद झाला. मुलांनी आणि सुनांनी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं. म्हातारी बडबड करेल आणि बसेल गप्प हे त्यांना माहीत होत. पण त्या दिवशी खूपच चमत्कार झाला. जेंव्हा वादाचा विषय सुरू झाला तेंव्हा म्हातारी बराच वेळ काहीच बोलली नाही आणि अचानक उठून आतल्या खोलीत गेली. आतल्या खोलीतून एक छोटी पेटी घेऊन आली. दोन्ही मुलांना आणि सुनांना कळेना की म्हातारी काय करते आहे? म्हातारा पण अचंबित होऊन बायकोच्या कृतीकडे बघत होता.
म्हातारीनं पेटीतून एक किल्ल्यांचा जुडगा काढला. त्यातली एक किल्ली सुटी करून तीनं ती सगळ्यांच्या मधे ठेवली.
‘ हे काय?’ असाच भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता. आता ही काय बोलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
” पोरांनो, बरेच दिवस झाले तुम्हाला काहीतरी द्यायचं होत. पण त्या आधी माझे दोन शब्द जरा ऐकून घ्या.”
सुनांच्या चेहऱ्यावर कटु भाव होते. आता ही उगाच पाल्हाळ लावणार हे त्यांच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्ट दिसत होतं. मुलंही तीच बोलण ऐकण्याच्या फारसे मूड मधे नव्हते. पण म्हातारी आता मागे हटणार नव्हतीच मुळी….
” बाळांनो, काय आहे ना हे घर उभं करायला फार कष्ट पडले पण त्याच काही नाही हो…. आनंदाचं झाड लावताना कष्ट जरा जास्तच घ्यावे लागतात तेंव्हाच त्याची गोड फळ खायला मिळतात. त्यामुळे आम्ही कष्ट केले त्याच काहीही विशेष नाही. पण आता या वयात आल्यावर ती गोड फळ मात्र खावी वाटतायत हं…पण फळ नुसतीच दिसून उपयोगाची नाहीत ना…हातात आली पाहिजेत. तर मी काय म्हणत होते आता आम्ही आमच्या या घरात अगदी आनंदाने रहायचे ठरवले आहे अगदी गोड गोड फळ चाखत…काय ऐकता आहात ना?”
म्हातारीनं शेजारच्या गडुतल थोड पाणी पिलं आणि किल्ली हातात घेऊन ती पुढं बोलली…
” ही घ्या शेतातल्या घराची किल्ली. आजपासून तुम्ही सगळ्यांनी तिकडे जायचं राहायला. उगाच आम्हाला कुणाची अडचण नको”
मुलं आणि सुना तोंडाचा ” आ ” करून म्हातारीकडे बघतच राहिले. ती असा काही निर्णय घेईल हे त्यांना स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.
तशी गोष्ट इथे संपत नाही. पण मूळ सांगण्याचा उद्देश हा की
” कुणीतरी आपल्याला अडचण समजेपर्यंत आपण स्वतः आपली अडचण दूर करावी. ” मुलं, मुली, नातवंड यांच्या प्रेमात, मायेत बुडून जाऊन स्वतःच अस्तित्व पुसून टाकण्याची वेळ येऊच का द्यायची? आता आनंदाची भाकरी सगळ्यांसोबत खाण्यात जरी खर सुख असलं तरी ते तसं असलच पाहिजे असं मात्र अजिबात नाही. आपला आनंद कशात आहे ते शोधून त्याचा उपभोग घेता आला तरी जीवन सार्थकी लागलं असं म्हणता येईल.
डॉ मधुरिमा कुलकर्णी