तसा तर खूप चघळला गेलेला विषय आहे…कितीही ठरवलं तरी काय काय नव्यान लिहू शकणारे ना? अर्थात खरच आहे पण तरीही मी आज बोलणारे तुमच्याशी…तुमच्या सर्वांशी माझ्याबद्दल आणि ….बरोबर ओळखलत माझ्या सुनेबद्दल🌹
तर मंडळी मी व्यवसायाने डॉक्टर आणि घरातले बाकी सगळे म्हणजे नवरा मुलगा, सून…सगळे IT related.
एक कोव्हीड काय आला सगळ्या जगाला पार उलटपालट करून गेला. कोणी अगदी कोणी सुद्धा यातून सुटले नाही. याच दरम्यान ” वर्क फ्रॉम होम” ही संकल्पना उदयाला आली. सुरवातीला सगळ खूप छान वाटलं …छान काय अगदी मस्त म्हणलं तरी चालेल.
तर या कोव्हिड मधेच माझ्या मुलाचं लग्न झालं आणि सुनबाईंनी आमच्या घरात आणि आयुष्यातही प्रवेश केला. तेंव्हा प्रोब्लेम असा होता की मी डॉक्टर असल्याने माझ्या रूटीन मधे तिळमात्र फरक पडलेला नव्हता. उलट कामाच्या वेळा आणि स्ट्रेस दोनही वाढलेलं होत. बाकी सगळे घरात बसून काम करायचे आणि मी मात्र दिवस दिवस बाहेर असायचे. त्यामुळे माझे घर जे आत्तापर्यंत माझा comfort zone होते ते कुठेतरी हरवत चालले होते. आणि त्यामुळे माझी चिडचिड पण काही प्रमाणात वाढली होती. अशातच नव्यान घरात आलेल्या सुनबाई पण ” वर्क फ्रॉम होम” या कॅटेगरीतल्याच होत्या. त्यामुळे सगळीच संभ्रमावस्था होती 🤔
खर सांगते एक गुपित तुम्हाला, जेव्हा हे मुलाचं लग्न वगैरे सगळ चालू होत ना तेव्हा मी मात्र जाम टेन्शन मधे होते. आतापर्यंत एकहाती कारभार करायची सवय…नव्यान घरात येणारी अनोळखी स्त्री ( सून) कशी असेल आणि तिच्या येण्याने कायकाय उलथापालथ होईल आयुष्यात याचं विचारात मी असायचे.
शिवाय आजूबाजूला सल्ले देणारे ( बहुतेक वेळा विरुद्ध) अनेकजण होतेच. 😟
म्हणजे बघा नवीन माणूस घरात येणार याच्या आनंदापेक्षा त्याच टेन्शन यावं इतक बदनाम आहे हे सासू सुनेच नात..🤦🏻♀
यथास्थित सगळे विधी, पूजा वगैरे पार पडून सुनबाई थोड्या घरात रुळायला लागल्या. सुरवातीचे दिवस कौतुकाचे, नव्या नव्हाळीचे भुर्रकन उडून जातात. त्यात आम्हाला एकच मुलगा त्यामुळे कितीही केले तरी सुनेचे कौतुक अपुरेच पडायचे.
त्यात सासरेबुवा आणि सुनबाईंची गट्टी खूपच पटकन जमली. पण का कोण जाणे मी मात्र हळूहळू कोशात जात होते. कदाचित आपला प्रांत बळकावला जातोय ही भावना असेल त्या मागे. हो…..मला कळत होत की काहीतरी चुकतंय आणि ते ही माझच… पण नेमकं काय …???
लोकांना सल्ले देणं खरच खूप सोपं आहे. सुनेला मुलीसारखं वागवा म्हणजे ती तुम्हाला आईसारखं प्रेम देईल. आता इथे मला मुलगीच नाही तर मुलीसारखं म्हणजे नेमकं कस? मोठा मजेशीर प्रश्न आहे ना…🤗
मग मी यातून एक idea काढली. भले मला स्वतःला मुलगी नसेल पण मी तर कुणाची तरी मुलगी आहेच की… झालं तर मग..जशी माझी आई माझ्याशी वागली असती तसं आपण सुनेशी वागायचं. मी तर खूपच खुश झाले. अगदी स्वतःची पाठ वगैरे थोपटून घेतली. इतक सोप्प solution असताना मी मात्र उगाच विचारांच्या आवर्तनात अडकले होते.
मग माझा नवा अभ्यास सुरू झाला आणि माझ्या हळूहळू लक्षात येऊ लागलं की आई म्हणून वागणं आणि आईसारखं वागणं यात काहीच साम्य नाहीये. 😞
आई ही आईच असते. तिची जागा या जगात दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. म्हणजे पुन्हा प्रश्न आलाच …थोपटून घेतलेली पाठ थोड्याच दिवसात नवीन विचारांनी दुखायला लागली. 😷
तशी माझी सून खरच स्वभावाने खूप चांगली..म्हणजे आत बाहेर असं काही नाही. जे वाटेल ते बोलून मोकळी होणारी. वयान, विचारांनी आणि अनुभवान अपरिपक्व असल्याने सुरवातीला नाही कळायचे काय बोलाव? काय बोलू नये? आणि मग normal सासू सुनेमधे असणारे शीतयुद्ध आमच्याही घरात सुरू झाले. 👊🏻
मी त्या दिवसांमध्ये फार अस्वस्थ असायचे. वरून सगळ छान असताना आतून काहीतरी कमतरता जाणवायचीच. हे आई मुलगी काही केल्या जमेना.
एकदा दुपारी कुठलासा सिनेमा बघत असताना मनात विचार आला की जे नातं बनणार नाहीचे त्याच्या मागे का लागायचं? तिचा स्वभाव मला इथपर्यंत नक्की कळला होता की आमच्यात एक नवीन नात नक्की निर्माण होऊ शकत आणि ते होत मैत्रीचं.🤝
विचार करताना लक्षात आलं की ती माझ्यापेक्षा लहान असूनही अनेक गोष्टी माझ्याच नकळत मला शिकवत होती. मी शिकत होते. आणि आता मला ते आवडायला लागलं होत. 😍
छोट उदाहरण द्यायचं तर “तिला स्वयंपाक करायला आवडतो पण तीच म्हणण अस की माझा मी एकटी करेन मला नाही जमत दुसऱ्या कोणाबरोबर.”…सुरवातीला माझा ego hurt झालाच. पण जेंव्हा हे “मैत्री” नावाच्या अमूल्य नात्याचा मला शोध लागला तेंव्हा कळलं की मलाही कुणीतरी ऐत करून खायला घालते आहे…आणि मग तिचा किचन मधला आणि एकंदरीत माझ्या आयुष्यातला वावर इतका सहज होत गेला की कळलच नाही आम्ही कधी मैत्रिणी झालो…🥰
अर्थात हा प्रवासही काही सोपा नव्हता. तिच्यापेक्षा जबाबदारी माझ्यावर जास्त होती. तिला समजून घेऊन, काहीवेळा चुका पोटात घालून हळूहळू गाडी एकदाची रस्त्यावर आली. आमच्यातला संवाद वाढला. स्वभाव कळायला लागले. वाद झाले किंवा गोष्टी आवडल्या नाहीत तर त्याची solution जागेवर निघायला लागली. आणि तेंव्हाच कधीतरी प्रेमाची बी रुजली गेली.❤
एक गोष्ट मी ठामपणे नक्की सांगेन तुम्ही जितक द्याल ना त्यापेक्षा जास्तच पटीत तुम्हाला परत मिळेल..
“सुन” कुणाचीतरी मुलगीच ना? वयाची 25/26 वर्ष स्वतःच्या हक्काच्या घरात काढून अचानक नवीन आयुष्यात प्रवेश करते. सगळे पाश, माया, प्रेम सोडून येते ती… सोप तर अजिबात नाही. मग तिला थोडा वेळ द्या. घेऊ देत समजून तुमचे स्वभाव, तुमच्या आवडी निवडी, रिती परंपरा …पण बरोबरीन तुम्हीही तिला समजून घ्या. काय आवडत तिला? तिखट का गोड? गप्पा मारायला का फक्त ऐकायला? माणसांची सवय आहे का नाही? अनेकानेक गोष्टी आहेत की ज्या आधी सासूने समजून घ्याव्यात. स्वतःकडे थोडा कमीपणा घेऊन प्रसंगी तिची ढाल व्हावे. नसेल आवडत तिची एखादी सवय तर समजून घ्या आणि त्याचवेळी तुमचीही एखादी सवय तिला आवडत नसेल हेही लक्षात घ्या. खुशाल काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि प्रेमासाठी आसुसलेल्या त्या जीवाला तुमच्या कुशीत स्थान द्या अगदी तुमच्या मुलाच्या बरोबरीने…💞
मला आज सांगायला अतिशय अभिमान आणि आनंद वाटतो की माझी सून “जुई” माझी इतकी घट्ट मैत्रीण बनली आहे की आमच्यातली “खुसपूस” जेंव्हा सुरू होते तेंव्हा घरातले दोन्ही पुरुष ( मुलगा आणि नवरा) आपोआप backfoot वर जातात……💃🏻
डॉ मधुरिमा कुलकर्णी