आनंदाचं झाड…

एक गरीब म्हातारा आणि म्हातारी होते. मुलाबाळांना खूप कष्टानं वाढवून त्यांनी मोठं केलं. त्यांची लग्नं लावून दिली. मुलंही त्यांच्या आयुष्यात स्थिरस्थावर झाली.

 

सगळ्या घरात असतात तसे प्रॉब्लेम्स त्यांच्याही घरात होते. भांड्याला भांडं लागत होतंच… पण तरीही म्हातारा-म्हातारी होता होईल तेवढं सांभाळून घेत होते. अजून मुलांना जगाचा अनुभव नाही… शिकतील हळूहळू, म्हणून अनेक गोष्टी कानाआड टाकत होते. फारच झालं तर थोड्याफार शाब्दिक चकमकी उडत होत्या. पण घरातलं भांडण चव्हाट्यावर आणायचं नसतं, हे त्या दोघांना चांगलंच समजत होतं.

 

पण याचा परिणाम असा झाला की दोन्ही मुलं आणि सुना त्या दोघांना गृहीत धरायला लागले. गावात त्या घराची प्रतिमा फार चांगली होती. इतकी की लोक, “घर असावं तर असं!” अशी एकमेकांना ग्वाही द्यायचे.

 

मात्र आता काहीही केलं, काहीही बोललं तरी चालतंय, असा घरात नियमच झाला होता आणि तो मात्र म्हातारा-म्हातारीला जाचक वाटू लागला.

 

आयुष्यभर कोणाकडून कसलीही अपेक्षा न करता राहिलेले ते दोघे आता मात्र मुलांकडून, सुनांकडून अपेक्षा करत होते. कसल्या अपेक्षा?

 

तर घराला घरपण राहू दे, एवढीच!

 

त्यांनी ते घर उभं करण्यासाठी आतोनात मेहनत घेतली होती, खूप कष्ट केले होते. आणि आता घराच्या भिंतींना पडणाऱ्या भेगा बघून त्यांचं मन कळवळून उठायचं.

 

म्हातारीला आता गप्प बसवेना. मान देऊ नका, पण अपमान करू नका, एवढंच तिचं म्हणणं होतं. अर्थात, म्हाताऱ्याची याला मूकसंमती होती.

 

त्या दिवशी संध्याकाळी असाच काहीसा वाद झाला. मुलांनी आणि सुनांनी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं. म्हातारी बडबड करेल आणि बसेल गप्प, हे त्यांना माहीत होतं.

 

पण त्या दिवशी एक वेगळाच चमत्कार झाला.

 

जेंव्हा वादाचा विषय सुरू झाला, तेंव्हा म्हातारी बराच वेळ काहीच बोलली नाही आणि अचानक उठून आतल्या खोलीत गेली.

 

आतल्या खोलीतून एक छोटी पेटी घेऊन ती बाहेर आली. दोन्ही मुलांना आणि सुनांना कळेना की म्हातारी काय करते आहे. म्हातारा पण अचंबित होऊन बायकोच्या कृतीकडे बघत होता.

 

म्हातारीनं पेटीतून एक किल्ल्यांचा जुडगा काढला. त्यातली एक किल्ली सुटी करून तिनं ती सगळ्यांच्या मध्ये ठेवली.

 

‘हे काय?’ असाच भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता.

 

आता ही काय बोलते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

 

“पोरांनो, बरेच दिवस झाले तुम्हाला काहीतरी द्यायचं होतं. पण त्या आधी माझे दोन शब्द जरा ऐकून घ्या.”

 

सुनांच्या चेहऱ्यावर कटू भाव होते. आता ही उगाच पाल्हाळ लावणार, हे त्यांच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्ट दिसत होतं. मुलंही तिचं तेच बोलणं ऐकण्याच्या फारशा मनस्थितीमधे नव्हती.

 

पण म्हातारी आता मागे हटणार नव्हतीच मुळी…

 

“बाळांनो, काय आहे ना, हे घर उभं करायला फार कष्ट पडले. पण त्याचं काही नाही हो… आनंदाचं झाड लावताना कष्ट जरा जास्तच घ्यावे लागतात. तेंव्हाच त्याची गोड फळं खायला मिळतात. त्यामुळे आम्ही कष्ट केले, त्याचं काहीही विशेष नाही.

 

पण आता या वयात आल्यावर ती गोड फळं मात्र खावी वाटतायत हं… पण फळं नुसतीच दिसून उपयोगाची नाहीत ना… हातात आली पाहिजेत.

तर मी काय म्हणत होते… आता आम्ही आमच्या या घरात अगदी आनंदाने राहायचं ठरवलं आहे. अगदी गोड गोड फळं चाखत… काय, ऐकता आहात ना?”

 

म्हातारीनं शेजारच्या गडूतलं थोडं पाणी प्यालं आणि किल्ली हातात घेऊन ती पुढे बोलली…

 

“ही घ्या शेतातल्या घराची किल्ली. आजपासून तुम्ही सगळ्यांनी तिकडे जाऊन राहायचं. उगाच आम्हाला कुणाची अडचण नको.”

 

मुलं आणि सुना तोंडाचा “आ” करून म्हातारीकडे बघतच राहिले. ती असा काही निर्णय घेईल, हे त्यांना स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते.

 

तशी गोष्ट इथे संपत नाही.

 

पण मूळ सांगण्याचा उद्देश हा की,

” कुणीतरी आपल्याला अडचण समजेपर्यंत आपण स्वतः आपली * अडचण दूर करावी.”

 

मुलं, मुली, नातवंडं यांच्या प्रेमात, मायेत बुडून जाऊन स्वतःचं अस्तित्व पुसून टाकण्याची वेळ येऊच का द्यायची?

 

आता आनंदाची भाकरी सगळ्यांसोबत खाण्यात जरी खरं सुख असलं, तरी ते तसं असलंच पाहिजे, असं मात्र अजिबात नाही.

आपला आनंद कशात आहे, ते शोधून त्याचा उपभोग घेता आला, तरी जीवन सार्थकी लागलं, असं म्हणता येईल.

 

डॉ. मधुरिमा कुलकर्णी

 

14 Responses

  1. ” कुणीतरी आपल्याला अडचण समजेपर्यंत आपण स्वतः आपली * अडचण दूर करावी.”
    He line speechless 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  2. जिवंत असे पर्यन्त कोणाला काही देऊ नये हेच खरे 👍

  3. कधीकधी मुलांना त्यांची जागा दाखवावी लागते

  4. आजीनं जे केलं ते योग्यच होते. अगदी कळत नकळत ही सध्याची वास्तविक ता आहे , अलिकडे मुलींचे प्रमाण कमी आहे,व ज्या आहेत त्या शिकलेल्या त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे राहू पहातात मग सासु सासरे यांनी कोठे जावे ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Related Posts

परतीची वाट
मैत्री..

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you