माझ्या रूटीनमध्ये घडणाऱ्या गंमतीजमती…

मनुष्याचा स्वभाव हा असा आहे की वाईट गोष्टींचा विचार जास्त केला जातो. अनुभवांमुळे झालेल्या त्रासाला कुरवाळत बसत स्वतःच्याच मनाला दुःखी करण्याचं काम आपण नेहमी करत असतो.

मात्र आपल्याच आजूबाजूला आणि अगदी आपल्याच बाबतीत रोजच्या रोज कितीतरी गोष्टी अशा घडत असतात की त्याबद्दल थोडं थांबून विचार केला, तर त्यातून निर्माण होणारे विनोद किंवा फजिती आपल्या लक्षात येतात. त्याचा आनंद घेतला तर दुःखी मनाला कधीतरी थोडी सुखाची झुळूकही मिळू शकते.

तर आज थोडं माझ्याबद्दल असंच काही सांगणार आहे…

मला छोट्या छोट्या गोष्टी विसरण्याची सवय आहे आणि त्यात आता वयोमानाप्रमाणे बऱ्यापैकी वाढ झाली आहे.

“मोबाईल” हे असं आयुध आहे की ज्याच्याशिवाय जगणंच जणूकाही मुश्किल झालंय. बऱ्याचदा काहीही काम नसताना मोबाईल बघण्याचा मला चाळा आहे… आणि तो कुठे ठेवला आहे हे नेमकं त्यावेळी माझ्या मुळीच लक्षात येत नाही.

बरं, तो तिथेच असतो… अगदी माझ्या डोळ्यासमोर!

पण मला त्या वेळी मोबाईल सोडून इतर सगळ्या गोष्टी दिसतात.

मग घरातल्या मेंबर्सच्या मागे माझी भुणभुण सुरू होते,

“माझा मोबाईल डायल करा ना!”

त्या वेळी मोबाईल हातात आला नाही तर जसं काही प्रलयच येणार असतो!

माझा नवरा बिचारा नंबर डायल करतो. अगदी माझ्यासमोरून मोबाईलची रिंग वाजते… आणि त्या छोट्याशा चौकोनी तुकड्याला अतीव मायेने जवळ घेत मी माझ्या पुढच्या कामाला लागते.

नवऱ्याला काहीच कळत नाही…

“एवढं काय महत्त्वाचं काम होतं?” 🤗

अजून या मोबाईलच्या संदर्भातीलच एक गोष्ट…

मोबाईल काही कारणाने सुरू केला की तो ऑफ करायला मी नेहमी विसरते. तसाच मोबाईल बॅगमध्ये ठेवताना नकळत कुठलातरी नंबर डायल होतो. असं काही झालं आहे हे माझ्या गावीही नसतं.

समोरची व्यक्ती,

“हॅलो… हॅलो…”

करून स्वतःच मोबाईल ऑफ करते.

थोड्या वेळाने पुन्हा त्या व्यक्तीचा कॉल येतो,

“का बरं हिने फोन केला असेल?”

मी मोठ्या जोमात फोन उचलते,

“बोला!”

समोरून उत्तर,

“नाही, तुझाच आत्ता कॉल आला होता.”

मी,

“सॉरी… सॉरी… चुकून लागला असेल!”

या बाबतीत माझा मुलगा नेहमी माझा कान धरतो,

“अगं आई, मोबाईल बंद करत जा!”

पण त्याचं म्हणणं माझ्या लक्षात राहतं… फक्त पुढच्या वेळेपर्यंत! 😄

अशीच माझी अजून एक गमतीशीर सवय आहे.

कुठेही गर्दीत, सिनेमाला, एखाद्या कार्यक्रमात गेले असताना आजूबाजूच्या माणसांकडे निरखून बघण्याची मला खूपच सवय आहे.

माणसांचा, त्यांच्या चेहऱ्यांचा, त्यांच्या वागण्याचा, त्यांच्या मनाचा अभ्यास करायला मला आवडतो.

पण ती त्यासाठीची वेळ नसते!

समोरचा माणूस माझ्याकडे बघून अगदी “ही बाई मला का बघतेय?” अशा विचारात पडलेला असतो आणि मी मात्र माझं निरीक्षणाचं काम अगदी नेटाने सुरू ठेवलेलं असतं.

मग कोणीतरी फॅमिली मेंबर मला हलवत सांगतं,

“अगं, आपण कुठे आहोत याचं जरा भान ठेव!”

आणि मग माझी तंद्री भंग पावते.🤔

मला बोलण्याचा अत्यंत शौक आहे.

खरं सांगायचं तर “बोलणं” हा माझा श्वास आहे.

स्वतःशी बोलण्याची तर मला खूपच सवय आहे.

एखादी गोष्ट करण्याचं ठरवलं की मी स्वतःला आणि इतरांनाही सतत बजावत असते,

“हे करायचं आहे हं…”

“हे विसरायचं नाही…”

“आज हे करूनच टाकायचं…”

इतकं सांगून सांगून शेवटी माझ्या मनात एक विचित्र प्रकार घडतो.

काही काळाने ठरवलेली गोष्ट करून झाली आहे, असा भाव माझ्या मनात पक्का रुजतो…

आणि प्रत्यक्षात ती गोष्ट करण्याचं मात्र मी पक्कं विसरून जाते!

म्हणजे माझ्या मेंदूला सूचना देण्याची पद्धतच थोडी धोकादायक आहे. 😃

कुठल्याही पत्त्यावर जायचं असेल तर रस्ता कितीही नेहमीचा असला तरी तो माझ्या लक्षात राहत नाही.

अनेक खाणाखुणा पाहून ठेवलेल्या असतात. पण वेळ आली की त्या सगळ्या खाणाखुणा माझ्या स्मरणशक्तीला रामराम करून निघून गेलेल्या असतात.

मग माझी गाडी विरुद्ध दिशेला, आजूबाजूला अनेक वळणं घेत, शेवटी ठरलेल्या ठिकाणी पोहोचते.

यावरून तर नेहमीच माझी घरात चेष्टा होते.

आणि या बाबतीत तर गुगल मॅपसुद्धा काही करू शकत नाही!

तो बिचारा शांतपणे सांगत असतो,

“Take a U-turn.”

आणि मी मनात म्हणत असते,

“अरे बाबा, मला माहीत आहे… पण कुठे घ्यायचा तेच कळत नाही!” 😂

बाकी अशा अनेक गमतीजमती माझ्या व्यवसायाच्या ठिकाणीही घडत असतात.

पेशंटची नावं तर माझ्या मुळीच लक्षात राहत नाहीत.

मग अगदी ओळखीच्या पेशंटचं सुद्धा वेगळ्याच नावाने बारसं होतं.

कधी कधी पेशंट स्वतःच म्हणतो,

“मॅडम, मी तो नाही… माझं नाव अमुकतमुक आहे!”

आणि मला क्षणभर वाटतं,

“अरे हो! हे नाव तर बरोबर आहे…”

पण पुढच्या क्षणी पुन्हा गोंधळ!

माझ्या क्लिनिकमध्ये पेशंटपेक्षा माझ्या स्मरणशक्तीचीच तपासणी जास्त चालू असते असं कधी कधी वाटतं. 😄

आणि गंमत म्हणजे मी स्वतः डॉक्टर आहे!

म्हणजे इतरांच्या छोट्या छोट्या विसरभोळेपणाचं विश्लेषण करणारी मी, स्वतःच्या बाबतीत मात्र “हे वयाचं आहे… काही नाही!” म्हणून अगदी सहज पुढे निघून जाते.

खरं तर या सगळ्या गोष्टींकडे आपण दोन प्रकारे पाहू शकतो.

एकतर,

“अरे देवा, माझं काय होत चाललंय!”

असं म्हणत काळजी करत बसायचं.

किंवा,

“अरे वा! माझ्याकडेही अजून किती मनोरंजक गोष्टी घडत आहेत!”

असं म्हणत त्यावर हसायचं.

मी दुसरा पर्याय निवडते.

कारण आयुष्याच्या या टप्प्यावर एक गोष्ट कळली आहे,

आपल्या आयुष्यात मोठ्या आनंदाचे प्रसंग रोज येत नाहीत.

पण छोट्या छोट्या गंमती रोज येतात.

फक्त त्यांना ओळखण्याची नजर हवी.

कधी मोबाईल आपल्या डोळ्यासमोर असूनही तो सापडत नाही…

कधी रस्ता माहीत असूनही आपण भरकटतो…

कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या चेहऱ्यात आपल्याला संपूर्ण कथा दिसते…

कधी आपण स्वतःलाच एखादी गोष्ट इतक्या वेळा सांगतो की ती करून झाली असं आपल्याला वाटतं…

आणि कधी पेशंटच आपल्याला आपली ओळख करून देतो!

हे सगळं आयुष्याचाच भाग आहे.

आणि कदाचित याच छोट्या छोट्या फजितींमध्ये आयुष्याचं खरं सौंदर्य लपलेलं असतं.

कारण शेवटी,

आपण किती मोठ्या गोष्टी मिळवल्या यापेक्षा,

आपण रोजच्या साध्या आयुष्यात किती वेळा मनापासून हसलो, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

म्हणून आता माझा मोबाईल हरवला तर मी आधी थोडं हसणार…

मग तो शोधणार…

आणि सापडला की त्याला जवळ घेऊन म्हणणार,

“चल बाबा, आज पुन्हा एकदा तू आणि मी भेटलो!” 😄❤️

 

डॉ मधुरिमा कुलकर्णी

12 Responses

  1. Very practical about most of the people
    It is very relatable with me but the way you are keeping the situation is very appreciable

  2. मॅडम तुम्ही सांगीतलेल्या सर्व गोष्टी माझ्या ही बरोबर अगदी तंतोतंत माझ्या ही बरोबर घडतात आपण अगदी तरूण असताना,वय झाले का म्हणता असो हेच जीवन आहे.

  3. खरचं आपल्या सर्वांच्याच आयुष्यात देखिल अशाच छोट्या छोट्या घटना घडत असतात. त्यातून आनंद शोधता आला पाहिजे. छान आहे लेख.

  4. खूप छान माधुरीमा 👌👌
    तु तुझ्या बाबतीतल्या गमती जमती पण किती मोकळेपणाने share करतेस..
    मजा येते वाचताना…

  5. छान, स्वतःलाच परीक्षण खिडकीतून पाहिलेले ओघवते लेखन.

  6. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणे छानच

  7. आयुष्यात आनंदाच्या गोष्टी रोज घडत नाही….पण छोट्या छोट्या गंमती रोज घडतात

    हे वाक्य मला खूपच भावल….सही पकडे है

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Related Posts

मी आणि माझा रविवार (1)
माझ्या एका शब्दानं काय झालं असतं

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you