मातीतले हात…मनातले अंकुर 🌿

अगदी मागच्या आठवड्यातली गोष्ट…

आमच्या टेरेसचा makeover हा विषय गेले तीन-चार महिने सुरूच होता. आधी टेरेस close केली. मग POP, सुंदर लाईट्सची योजना, एक छोटासा झोपाळा… वर्षानुवर्षे अडगळीत पडलेलं सामान काढून टाकल्यावर प्रथमच आमची टेरेस इतकी मोठी आहे, याचं जणू नव्याने दर्शन झालं.

आता उरली होती शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट—झाडं!

आधीही काही कुंड्या होत्याच, पण त्यांच्यात तो जिवंतपणा जाणवत नव्हता. सुंदर फुलझाडं, विविध रंगांची पानं आणि त्यांची नीटनेटकी मांडणी झाली की मग टेरेस पूर्ण झाल्यासारखी वाटणार होती.

खरं सांगायचं तर मला झाडांची आवड नाही, असं नाही. हिरवंगार निसर्ग, बागा, फुलांनी डवरलेली झाडं पाहायला मला खूप आवडतात…

पण ती माती…!

हो… इथेच खरी गोची होती.

मातीत हात घालणं, चिखल, धूळ… या सगळ्यापासून मी नेहमीच चार हात लांब राहिले होते.

पण आयुष्यात एखादा दिवस असा उगवतो, जो स्वतःबद्दलची अनेक वर्षांची समज एका क्षणात बदलून टाकतो…

तो रविवार असाच होता.

काही कारणाने माझा मूड अगदीच off होता. काही करावंसं वाटत नव्हतं. मन कुठेतरी हरवल्यासारखं झालं होतं.

नवरा सहज म्हणाला, “शेजारच्या नर्सरीमध्ये काही छान छोटी रोपं पाहिली आहेत… चल, घेऊन येऊया.”

खरं तर त्या वेळी त्याचा हा प्रस्ताव मला फारसा आवडलाच नव्हता. पण तरीही मी त्याच्यासोबत गेले.

नर्सरीत पाऊल टाकलं… आणि काहीतरी जादूच झाली.

आजूबाजूला डोलणारी फुलं… हिरव्यागार पानांचे असंख्य आकार… प्रत्येक रोपाचं वेगळं सौंदर्य… नकळत मी त्या जगात हरवून गेले.

दोन-तीन रोपं घ्यायला गेलेलो आम्ही, तब्बल आठ-नऊ वेगवेगळ्या रोपांसह घरी परतलो!

आता त्यांना कुंड्यांमध्ये लावणं आवश्यक होतं.

त्या दिवशी मला काय झालं होतं, देवच जाणे…

मी भराभर कुंड्या, माती, खत सगळं जवळ ओढून घेतलं. पुढे काय करायचं, ते मात्र मला माहीत नव्हतं.

माझी ती लगबग पाहून नवरा मिश्कील हसला आणि म्हणाला, “थांब… शिकवतो.”

पुढचे दोन तास त्याने मला झाड कसं लावायचं, माती किती भरायची, खत कसं घालायचं, रोपाची काळजी कशी घ्यायची याचं अगदी मनापासून प्रशिक्षण दिलं.

आणि मी…

मी पूर्णपणे मातीत रंगून गेले होते.

हात खराब झाले, कपड्यांवर माती लागली, नखांमध्ये चिखल भरला… पण त्या क्षणी त्याचं मला किंचितही भान नव्हतं.

सगळी रोपं लावून झाल्यावर मी बराच वेळ त्यांच्याकडे फक्त बघत राहिले.

केशरी, लाल, पिवळी, पांढरी फुलं…

कलाकुसर केल्यासारखी नक्षीदार पानं…

त्या छोट्या रोपांवरून हात फिरवताना क्षणभर असं वाटलं, जणू मी माझ्याच बाळांना अलगद स्पर्श करते आहे.

आणि आश्चर्य म्हणजे…

सकाळपासून मनावर दाटून बसलेलं सगळं मळभ नकळत दूर झालं होतं.

त्या दिवशी मला एक गोष्ट नव्याने समजली…

माती फक्त झाडांना जन्म देत नाही… ती मनालाही नव्याने रुजवते.

कधी कधी आपल्या हातांना लागलेली थोडीशी माती, मनावर साचलेली खूप सारी धूळ शांतपणे झटकून टाकते…

आणि मग नकळत आपल्या आतही एक नवा अंकुर फुटतो… नव्या आनंदाचा, नव्या जगण्याचा…! 🌱

– डॉ मधुरिमा कुलकर्णी

9 Responses

  1. खुप सुंदर शांत मांडणी माती अन् अंकुर ची केली आहे.

  2. किती छान लिहिलंयस, हा अनुभव घेतला आहे मी, आणि सांगू का माधुरीमा तु बोलू शकतेस झाडांशी, ती ऐकत असतात

  3. लहान पण आठवले…
    आम्ही बंगल्या भो व ती अशीच झाडे लावायचो…
    खूप मज्जा यायची…

  4. बागेत मन खूप प्रसन्न होत. वेगवेगळी फूल त्यांचे रंग, वास वाह सुंदर..👌❤️

  5. तुझ्या सोबत मीही तुझे टेरेस फिरुन आले इतक्या समर्पक शब्दांत टेरेसचे वर्णन केले आहेस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Related Posts

परतीची वाट
श्रावण — निसर्ग, सण आणि संस्कृतीचा हिरवा उत्सव

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you