काल माझी एक पेशंट ओपीडीमध्ये आली होती. रत्ना कोळी म्हणून…
तिच्या घरात मेजर प्रॉब्लेम आहेत. पंचविशी पूर्ण झालेली मुलगी आहे. तिला बरेच मानसिक प्रश्न आहेत. रत्नाचा नवरा खूप दारू पितो. तिच्या मुलाला घरातल्या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे. तो आईला जपतो; पण घरातील वातावरण आणि आईची अवस्था बघून कोवळ्या वयातला तोसुद्धा बऱ्याचदा बिथरून जातो.
रत्नाने मात्र घर सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मुलं लहान असल्यापासून मी तिचा संघर्ष बघत आले आहे. घरोघरी जाऊन खाद्यपदार्थ विकणे, साबण, शॅम्पू आणि अशा गृहपयोगी वस्तू विकणे… मिळेल ते काम करून तीने कायमच आपल्या संसाराला टेकू दिला .
आणि एवढं सगळं असूनही, मी तिला कायम हसतमुखच पाहिलंय.
त्या दिवशी ओपीडीमध्ये आली होती. अंग दुखतंय म्हणाली.
“किती काम करशील? जरा विश्रांती घेत जा गं…” मी आपलेपणाने बोलले.
नेहमीप्रमाणे तिने डोळ्यांच्या कडेला आलेले पाणी पुसले आणि हसून म्हणाली,
“ठीक आहे, मॅडम… चालायचंच.”
मी म्हटलं,
“रत्ना, मला तुझ्या धीराचं कौतुक वाटतं.”
ती म्हणाली,
“मॅडम, सगळं काही आपल्या मनाप्रमाणे नाहीच होत… काही भोग आधी भोगावे लागतात, काही आयुष्याच्या उत्तरार्धात… पण भोगावे मात्र लागतातच. मग रडून काय करायचं? आपल्याजवळ काय नाही हे बघण्यापेक्षा काय आहे हे पाहिलं ना, की नसलेल्या गोष्टींची खंत बरीच कमी होते… बरं, येते.”
आणि ती निघून गेली.
जाता जाता मात्र बरंच मोठं तत्त्वज्ञान देऊन गेली असं वाटलं.
खरंच…
आपल्याकडे काय नाही, याचा हिशेब आपण किती सहज ठेवतो!
नातं हवं तसं नाही.
पैसा पुरेसा नाही.
नोकरी मनासारखी नाही.
घर मनासारखं नाही.
मुलं अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत.
आणि कधी कधी तर आयुष्यच आपल्या मनासारखं नाही.
या ‘नसलेल्या’ गोष्टींचा विचार करताना आपल्या जवळ असलेल्या कितीतरी गोष्टी नकळत नजरेआड होतात.
एखादं चांगलं नातं असतं, पण त्यात एक गोष्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते… आणि मग आपण त्या एका गोष्टीभोवतीच सगळं नातं मोजायला लागतो.
एखाद्या घरात भरपूर प्रेम असतं, पण आर्थिक परिस्थिती तशी नसते… आणि त्या कमतरतेमुळे घरातलं प्रेमही कमी वाटायला लागतं.
अगदी छोट्या गोष्टींचंही असंच.
सण साजरा करताना सगळं अगदी विशिष्ट पद्धतीनेच झालं पाहिजे, विशिष्ट पदार्थच झाले पाहिजेत, घर तसंच सजलं पाहिजे, सगळे आपल्याला हव्या त्या वेळी आणि हव्या त्या पद्धतीने एकत्र आले पाहिजेत… असा हट्ट धरला की सणाचा आनंद घेण्यापेक्षा ‘हे असं का झालं नाही?’ याचीच खंत मनात राहते.
त्यापेक्षा जे उपलब्ध आहे, जे जमू शकतंय, जे आपल्या हातात आहे… त्यातून आनंद शोधला तर?
कदाचित सण थोडा साधा असेल, पण मनापासून साजरा होईल.
कदाचित घरात सगळे नसतील, पण जे आहेत त्यांच्यासोबतचा वेळ सुंदर होईल.
कदाचित ताटात पदार्थ कमी असतील, पण त्यावरचं समाधान जास्त असेल.
आयुष्य नेहमी आपल्याला आपण मागतो ते देत नाही.
पण जरा थांबून विचार केला तर याच आयुष्याकडून आपण जे विसरतो ते मात्र बऱ्याचदा मिळत असतं.
आपल्याला माणसं मिळतात.
आपुलकी मिळते.
कुणाचं तरी प्रेम मिळतं.
कुणीतरी आपली काळजी घेत असतं.
आपल्या आयुष्यात अजून एक सकाळ उगवत असते.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपल्याकडे अजूनही “आहे” असं म्हणता येईल, असं बरंच काही असतं.
फक्त आपली नजर “नसलेल्या” गोष्टींवरून “असलेल्या” गोष्टींकडे वळायला हवी.
कदाचित सुखी राहण्याचं सगळ्यात मोठं तत्त्वज्ञान एवढंच असावं…
रत्नाच्या आयुष्यात सगळं काही तिच्या मनासारखं नाहीये तरीही ती उभी आहे.
तिच्या मुलांसाठी, तिच्या संसारासाठी… आणि कदाचित स्वतःसाठीही.
तिच्याकडे परिस्थिती बदलण्याचे सगळे पर्याय नसतील, पण परिस्थितीकडे पाहण्याची नजर मात्र तिने बदलली आहे.
आणि कदाचित आयुष्याकडून शिकण्यासारखं हेच आहे…
सगळं आपल्या मनासारखं घडणं म्हणजे सुख नाही.
जे आपल्या वाट्याला आलंय, त्यातलं सुख शोधता येणं… हेच खरं समाधान. 🥰
डॉ मधुरिमा कुलकर्णी
4 Responses
Psychology हेच सांगते.👌✅
very true
Thoughts are very positive
आहे रे या एका गोष्टीने आयुष्य बदलून जातं….
शिकण्यासारखं आहे रत्नाकडून