परतीची वाट

रात्रीचे जवळजवळ साडेबारा वाजले होते.
राजूने रिक्षा पार्क केली आणि तो आपल्या घराच्या दिशेने चालू लागला.

साधारण पाच वर्षांपूर्वी पंचविशीतला राजू उदरनिर्वाहासाठी त्याच्या गावाजवळच्या शहरात आला होता. डोळ्यांत अनेक स्वप्नं घेऊनच तो शहरात आला होता. तरुण वय होतं, त्यामुळे शहराच्या चकचकीत आयुष्याची ओढ होतीच. स्वच्छ, सुंदर रस्ते… मोठमोठी दुकानं… दिव्यांचा झगमगाट… टोलेजंग इमारती… सुगंधाने दरवळणारी हॉटेल्स…
सगळंच त्याला भुरळ घालत होतं.

राजूने तालुक्याच्या कॉलेजमधून B.Com.ची पदवी घेतली होती. आपल्या पदवी प्रमाणपत्राचा त्याला कमालीचा अभिमान होता.
लहानपणापासून त्याने वडिलांना शेती करताना पाहिलं होतं. कधी पाऊस नाही म्हणून शेतात धान्य पिकत नसे, तर कधी ओला दुष्काळ सगळं उध्वस्त करून जायचा. आणि कधी भरघोस पीक आलं तरी बाजारात योग्य किंमत मिळत नसे. त्यामुळे सुखवस्तू आयुष्य कधी त्याच्या वाट्याला आलंच नव्हतं. प्रत्येक गोष्टीत काही ना काही कमतरता असायचीच.
दोन जोड कपड्यांवर तो पदवीधर झाला होता.

नोकरी करून भरपूर पैसा कमवायचा, एवढंच त्याचं स्वप्न होतं.
वयही तसं स्वप्नाळू होतं. आयुष्यात काहीच सहजासहजी साध्य होत नाही, हा अनुभव अजून त्याच्या गाठीशी आला नव्हता.

पण आजच्या राजूमध्ये मात्र आमूलाग्र बदल झाला होता.
त्याची त्वचा काळवंडली होती. झोपेअभावी डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आली होती. बाहेरचं अर्धवट आणि अनियमित खाणं-पिणं यामुळे शरीराची रयाच गेली होती. ठिकठिकाणी हाडं दिसू लागली होती.
थोडक्यात, मोकळ्या हवेत वाढलेल्या राजूला शहराची हवा काही मानवली नव्हती.

सुरुवातीला त्याने नोकरीसाठी खूप प्रयत्न केले. पण ज्याचा त्याला एवढा अभिमान होता, त्या पदवी प्रमाणपत्राची बाजारातली किंमत त्याला फारच थोड्या दिवसांत समजली.
अगदी साधी शिपायाची नोकरी मिळवायची असेल तरी “छन्न… छन्न…” पैसा लागतो, एवढं समजल्यावर त्याचा सगळा हुरूपच निघून गेला.
शहरात राहण्याचा खर्च गावाकडच्या खर्चापेक्षा कितीतरी जास्त होता. राहण्यासाठीची खोली जेमतेम दहा बाय दहाची. त्यातही चार जणांची वाटणी.

सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं. नवा जोम होता. नोकरी नाही तर नाही… एखादा छोटासा व्यवसाय करू, असंही त्याच्या मनाने घेतलं.
रस्त्यावर भाजी विकण्यापासून ते वडा-पावची गाडी लावण्यापर्यंत बरेच प्रयोग करून झाले.
कधी बरे पैसे मिळायचे, तर कधी हातात काहीच उरायचं नाही.
आणि असं करता करता पाच वर्षं कधी निघून गेली, त्यालाही कळलं नाही.
“मुलगा शहरात पैसा कमवायला गेला आहे,” असं सांगितल्यावर आई-वडिलांचे डोळे पैशांच्या वाटेकडे लागून राहायचे. पण त्यांची नड भागवणं राजूला शक्य होत नव्हतं. अशावेळी त्याला खूप अपराधी वाटायचं. डोळे भरून यायचे.

त्याचा रूम पार्टनर नारायण होता. त्याच्या मामाची रिक्षा भाडेतत्त्वावर चालवण्याचं काम राजूने स्वीकारलं.
दिवसभरात ठरावीक रक्कम रिक्षा मालकाला द्यायची आणि त्यातून जे काही उरेल ते आपलं.
मग जास्त कमाई हवी असेल तर तासनतास गिऱ्हाईकाची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.
त्यात खाण्यापिण्याची आबाळ वेगळीच.

खरं तर राजू या आयुष्याला पुरता कंटाळून गेला होता.
आपल्या वयापेक्षा तो बराच मोठा दिसू लागला होता. लग्न वगैरे तर विचार करण्यापलीकडच्या गोष्टी होत्या.

पण प्रत्येकाची एक वेळ असते…
तर झालं असं—
राजू नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजता रिक्षा घेऊन आपल्या रूमकडे परतत होता. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला कोणीतरी रिक्षाला हात केला.
मनातून त्याला बरं वाटलं. पण लगेच मनात विचार आला—
‘आता हे भाडं कुठलं असेल?’
त्याने रिक्षा थांबवली.

“दादा, एखादं हॉटेल असेल का आत्ता उघडं?” त्यातल्या एकाने विचारलं.

“हो… हो… पण इथं जवळपास नाहीये. घोड लांब जावं लागेल.”

“ठीक आहे. चला.”

राजूने रिक्षाचा स्टँड ओढला आणि रिक्षा विरुद्ध दिशेला वळवली.
रिक्षात बसलेल्या दोघांपैकी एकजण दुसऱ्याशी बोलत होता.
“अरे तात्या, काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची! काय कमी आहे आपल्याला सांग बरं? अरे, जरा तुझ्या मुलांकडे तरी बघ. दारून शरीराचा पार विचका केलाय तुझ्या!”

“दादा, काय करू? काहीच जमत नाहीये. पार अडकून गेलोय सगळ्यात. घरात पाऊल टाकलं की रमाच्या तोंडाचा पट्टा जो सुरू होतो ना… काय सांगू? नको झालंय आयुष्य.”

“अरे, तीच तरी काय चुकतेय?”

“अरे, पण दादा, मी प्रयत्न करतोय ना… ते कुणासाठी? तिच्यासाठीच, मुलांसाठीच ना?”

“खरं सांगू तात्या… बघ लेका, मोठा भाऊ आहे मी तुझा. दुश्मन नाही. मान्य आहे, तू माझ्यापेक्षा जास्त शिकला आहेस. इंग्रजी बोलतोस. पण काय उपयोग त्याचा?”

“म्हणजे? दादा, तुला काय म्हणायचं आहे?”

राजूचं लक्ष नकळत त्यांच्या बोलण्याकडे लागलं.

“अरे, एवढी मोठी जमीन आहे आपली. नीट, पद्धतशीर पिकवली तर पुरून उरेल की!”

“दादा, तोच विषय किती वेळा बोलणार?”

“अरे बाबा, सांगतो आहे तर ऐक. गड्या, मला ते तंत्रज्ञान नाही जमत. पण तुला सगळं कळतंय. आता पार गावापर्यंत पक्की सडक झालीये. सगळ्या आधुनिक सोयी गावात पोहोचल्यात रे. तुझी-माझी जोडी कमाल करून दाखवेल. तुझं कर्ज असं फिटून जाईल.”

“म्हणजे?”

“म्हणजे माझा प्रत्यक्ष अनुभव आणि तुझं ते तंत्रज्ञानाचं ज्ञान एकत्र आलं तर… बघ बाबा, काय ठेवलंय या शहरात? चल आपल्या माणसांमध्ये. मस्त मोकळी हवा… भरपूर कष्ट करू. इथे करायचं ते तिथे कर!”

तेवढ्यात हॉटेल आलं.
ते दोघे उतरले आणि आत निघूनही गेले.
पण दादाचं एक वाक्य राजूच्या मनात मात्र पिंगा घालू लागलं—
“इथे करायचं ते तिथे कर!”
काहीतरी सापडल्याचा विलक्षण आनंद राजूच्या मनात दाटून आला.
आई…
बाप…
आणि जिच्या जीवावर आपण शिकलो, ती आपली जमीन…
सगळं काही त्याच्या डोळ्यांसमोर तरळू लागलं.
कदाचित उत्तर शहरात नव्हतंच.
कदाचित त्याचं स्वप्न त्याने मागेच कुठेतरी सोडून दिलं होतं…
आणि आता तेच स्वप्न त्याला पुन्हा हाक देत होतं.

डॉ मधुरिमा कुलकर्णी

5 Responses

  1. आजच्या पिढीतील गावात राहून शहराची स्वप्न बघणाऱ्या तरुण, युवक या साठी खरच प्रेरणादायी गोष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Related Posts

श्रावण — निसर्ग, सण आणि संस्कृतीचा हिरवा उत्सव
मैत्री..

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you