काल एक प्रसंग माझ्या OPD मध्ये घडला… तो तुम्हा सर्वांशी शेअर केल्याशिवाय राहवत नाहीये.
सकाळी नेहमीप्रमाणे एकामागोमाग एक पेशंट तपासणे सुरू होते. साधारण पाच-सहा पेशंट होऊन गेले असतील, तेवढ्यात दोन सुखवस्तू दिसणाऱ्या स्त्रियांनी माझ्या केबिनमध्ये प्रवेश केला.
एक साधारण साठीच्या आसपासची, बारकुळी, गोरीपान, मोठे काळेभोर डोळे असलेली स्त्री आणि दुसरी तिच्या मुलीच्या वयाची, साधारण पस्तिशीची.
त्या आत येताच माझी रिसेप्शनिस्ट संध्या जवळजवळ धावतच केबिनमध्ये आली.
“अहो, तुम्ही नाव नाही सांगितलंत!”
“अहो, आम्हाला फक्त मॅडमना भेटायचं आहे.”
मी संध्याला हातानेच त्यांना बसू देण्याची खूण केली. यातील साठीच्या स्त्रीचे नाव आपण तात्पुरते ‘सरिता’ ठेवूया. सरिता माझ्याकडे बघून हसत म्हणाली,
“नमस्कार मॅडम! ओळखलं का मला?”
तिच्या आवाजात इतका आत्मविश्वास होता की क्षणभर मीच गोंधळले. कारण मी तिला अजिबात ओळखले नव्हते.
“मला वाटलंच होतं, तुम्ही नाही ओळखणार! पाच वर्षांपूर्वी मी तुमच्याकडून इंजेक्शन घेतलं होतं. बरं मॅडम, त्या सखू मेढे (नाव बदलले आहे) तुमच्याकडे अजून येतात का हो?”
“कोण?”
“अहो, त्या ऐंशी वर्षांच्या आजी आहेत बघा!”
मी आठवण्याचा प्रयत्न केला, पण त्या नावाची कोणतीही पेशंट मला आठवेना. मी तसं तिला सांगितलं आणि विचारलं, “काय काम होतं त्यांच्याकडे?”
सरिताने सांगितलं की सखूबाई या तिच्या एका मैत्रिणीच्या सासूबाई आहेत. त्या पूर्वी राहत असलेल्या पत्त्यावर गेल्या वर्षभरापासून नव्हत्या. आता त्या कुठे आहेत, याचीही माहिती नव्हती. तिला त्यांना भेटायचं होतं.
मी विचारलं, “त्यांचा फोटो आहे का तुमच्याकडे? कदाचित पाहिल्यावर आठवतील.”
“नाही, फोटो नाहीये. पण तुम्ही जरा आठवून बघा ना!”
मी पुन्हा नकार दिला आणि तिला मैत्रिणीला फोन करून विचारण्याचा सल्ला दिला.
तेवढ्यात तिच्या शेजारी बसलेली दुसरी स्त्री अचानक म्हणाली,
“मॅडम, तुम्हाला लोक काही पर्सनल गोष्टी सांगतात का?”
या प्रश्नाने मी जरा चमकलेच!
“अहो, इथे येणारा प्रत्येकजण काही ना काही सांगत असतो. आजाराबरोबरच अनेकदा काही वैयक्तिक गोष्टीही सांगतात. पण तुम्ही असं का विचारताय?”
ती म्हणाली,
“नाही, म्हणजे… या आजी काही सांगत असतील तर…”
आता मात्र मला काहीतरी विचित्र असल्याची जाणीव झाली. आजींबद्दल चौकशी करण्यापेक्षा त्यांना माझ्याकडून काही वैयक्तिक माहिती मिळवण्यात अधिक रस आहे, असं वाटू लागलं.
मी स्पष्टपणे सांगितलं,
“माझ्याकडे येणारा प्रत्येक पेशंट विश्वासाने काही गोष्टी सांगत असतो. पण कोणत्याही पेशंटची वैयक्तिक माहिती मी दुसऱ्या कोणालाही सांगत नाही. ती माझी व्यावसायिक आणि नैतिक जबाबदारी आहे.”
माझं उत्तर ऐकल्यावर दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. त्यांच्या नजरेतून काहीतरी बोलणं झालं. अखेर सरिताने जे सांगितलं, ते ऐकून मला धक्काच बसला.
त्या ऐंशी वर्षांच्या आजी दुसऱ्या कोणी नसून सरिताच्या स्वतःच्या सासूबाई होत्या! त्यांच्याशी संबंधित काहीतरी कोर्ट मॅटर सुरू होतं. त्या प्रकरणासाठी आजींबद्दल माझ्याकडून काही माहिती मिळवता येते का, याची चाचपणी करण्यासाठी त्या दोघी माझ्याकडे आल्या होत्या. माझ्याकडून मिळालेली माहिती त्यांना त्यांच्या केससाठी वापरायची होती.
म्हणजे जुन्या ओळखीचा आधार घेत, आजींची काळजी असल्याचा आव आणत, माझ्याकडून माहिती काढण्याचा हा प्रयत्न होता!
माझ्यासाठी हा केवळ माहिती विचारण्याचा प्रकार नव्हता, तर माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होता.
मी त्यांना योग्य आणि ठाम शब्दांत सुनावले आणि निरोप दिला. पण त्या गेल्यानंतर मनात विचारांचं काहूर माजलं.
समजा, मला त्या आजी आठवल्या असत्या आणि सहज बोलताना माझ्याकडून एखादी गोष्ट निघाली असती तर? माझ्या नकळत बोललेल्या शब्दांचा कोर्टात वापर झाला असता तर? माझ्या एका सहज प्रतिक्रियेचे परिणाम कदाचित त्या आजींच्या आयुष्यावर झाले असते! आणि त्या आजी आता कुठे असतील? सुखरूप असतील ना? त्यांचं नेमकं काय प्रकरण असेल?
या प्रश्नांची उत्तरं कदाचित मला कधीच मिळणार नाहीत.
पण या प्रसंगाने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली…
काही माणसं आपल्याकडे फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही पातळीवर उतरू शकतात. स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी कधी काळजीचा, कधी जुन्या ओळखीचा, तर कधी भावनिक नात्यांचा आधार घेतात.
आपण डॉक्टर असो, समुपदेशक असो किंवा एखाद्याचे विश्वासू मित्र… अनेक जण आपल्याजवळ मन मोकळं करतात. घरातल्या गोष्टी, नात्यांमधले ताणतणाव विश्वासाने सांगतात. त्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जाणार नाही, ही अपेक्षा अर्थात त्यामागे असते. आणि एखाद्याच्या अपेक्षेच्या खरेपणाला उतरणे हीच मोठी कसोटी असते…
डॉ मधुरिमा कुलकर्णी
4 Responses
असा अनुभव येतो खरं..
Well done
🤔
स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं किती थराला जाऊ शकतात, वृद्ध सासूविषयी कोर्टात फायदा मिळावा म्हणून डॉक्टरांच्या विश्वासाशी खेळायलाही मागेपुढे पाहत नाहीत, हे पाहून मन सुन्न होतं.
पण तुम्ही ज्या खंबीरपणे सीमारेषा आखून दिली आणि पेशंटची गोपनीयता हीच पहिली जबाबदारी मानली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आपल्या नकळत बोललेल्या शब्दांचे परिणाम काय होऊ शकतात हा तुम्ही उपस्थित केलेला प्रश्न खरंच प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्याजोगा आहे. अतिशय समर्पक आणि वेळेवर दिलेला इशारा….
डॉक्टर ने पेशन्ट चा विश्वास सार्थ ठरवला पाहिजे
कोणी कुठल्याही क्लूपती वापरू शकतात स्वार्थासाठी…