कितीतरी पिढ्या आल्या आणि गेल्या…
मुलांची लग्नं झाली, आई सासू झाली… आणि तिचा मुलगा कोणाबरोबर तरी वाटला गेला.
हे असंच होणार, हे माहीत असूनही…
इतकी वर्षं आपल्या पोटाला चिकटून राहिलेलं लेकरू…
कधी काही दुखलं-खुपलं की आई म्हणून मोठ्याने हाक मारणारं लेकरू…
बाहेर कुणी काही खोडी काढली, कुणी वेडंवाकडं बोललं की आईच्या पदरात डोकं खुपसणारं लेकरू…
आणि यशाचं शिखर गाठल्यावर सगळ्यात आधी आईची आठवण काढणारं तेच लेकरू…
लग्नानंतर बदलतं का हो?
या प्रश्नाचं उत्तर काही प्रमाणात हो आणि काही प्रमाणात नाही असं आहे.
आयुष्याला अर्थ देणारी, चांगले संस्कार देणारी आई एका बाजूला…
आणि आयुष्यभराची साथ देणारी, आयुष्यातले खाचखळगे वाटून घेणारी बायको दुसऱ्या बाजूला…
दोघीही तितक्याच महत्त्वाच्या.
पण दोघीही स्वतंत्र व्यक्ती.
एकाच माणसावर आतोनात प्रेम करणाऱ्या दोन स्वतंत्र व्यक्ती.
त्यांचं प्रेम वेगळं… प्रेमाची भाषा वेगळी… आणि अपेक्षाही वेगळ्या.
असो…
आजचा विषय थोडा वेगळा आहे.
जी आपल्यापेक्षा किमान पंचवीस वर्षांनी मोठी आहे…
जिने मरणप्राय कळा सहन करून आपल्याला या जगात आणलं…
जिने वेळोवेळी असंख्य तडजोडी केल्या…
जिने आपलं अख्खं आयुष्य खर्ची घातलं, आपल्याला एक चांगला माणूस आणि चांगला नागरिक बनवण्यासाठी…
काय काय केलं असेल तिने आपल्या त्या पोटच्या गोळ्यासाठी?
कदाचित आपल्याला त्यातलं निम्मंसुद्धा माहीत नसेल.
अर्थात, हे काही आजच घडत नाही.
पिढ्यानपिढ्या हे असंच घडत आलंय.
आईचे पांग मुलं फेडतात.
त्यांना जाणीव असते की आईने आपल्यासाठी किती खस्ता खाल्ल्या असतील…
पण गंमत अशी आहे की त्या वाक्यातला “किती” हा शब्द मुलाला कधीच पूर्ण समजत नाही.
कारण त्या खस्ता आईने स्वतःच कधी मोजलेल्या नसतात.
तिने कधी हिशेब ठेवलेला नसतो.
“मी तुझ्यासाठी एवढं केलं…”
असं सांगत बसणं तिच्या स्वभावातच नसतं.
पण मुलांच्या नजरेत आई मात्र कायम परफेक्ट असली पाहिजे.
मित्रमैत्रिणी आले की ती अपडेटेड दिसली पाहिजे.
तिला इंग्रजी येत नसेल तर चार लोकांत ती फार बोलू नये.
तिची वेशभूषा आजच्या काळाला साजेशी असावी…
पण फार फॅशनेबलही नसावी.
गावंढळ वाटता कामा नये…
आणि अति मॉडर्नही होता कामा नये.
थोडक्यात…
“ही माझी आई आहे” असं सांगताना मुलाला कुठल्याही प्रकारची लाज वाटता कामा नये.
पण एक गोष्ट आपण विसरतो…
पन्नाशी-साठीशी आलेली आईसुद्धा एक माणूस आहे.
तिला तिची स्वतःची मतं आहेत.
तिला तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे.
ती चुका करेल… त्या सुधारेल…
कधी चुकांमधून नवीन काही शिकेल.
तिलाही स्वच्छंदपणे जगावंसं वाटतं.
तिलाही हसायचं असतं.
तिलाही मैत्रिणींसोबत फिरायचं असतं.
तिलाही नवीन कपडे घालायचे असतात.
तिलाही स्वतःचे निर्णय घ्यायचे असतात.
आणि सगळ्यात महत्त्वाचं…
तिला सतत कुणाच्या रोखठोक नजरेखाली जगायचं नसतं.
तिने तिची सगळी कर्तव्यं पार पाडलेली असतात.
हो…
ज्या क्षणी तिने एका मुलाला जन्म दिला, त्या क्षणी तिचाही आई म्हणून जन्म झाला.
पण याचा अर्थ असा अजिबात नाही की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिने फक्त आई म्हणूनच जगावं.
तिचं स्वतःचंही एक आयुष्य आहे.
आणि आता ते आयुष्य तिने स्वतःसाठी जगायला काय हरकत आहे?
पंख फुटल्यानंतर आपल्या आईला आपली किती गरज आहे, याची जाणीव किती मुलांना असते?
आई आजारी असताना कितीजण स्वतःची कामं बाजूला ठेवून तिच्यासाठी वेळ काढतात?
कितीजण एखाद्या वेळी बायकोला नाराज करून, अगदी थोड्या वेळासाठी का होईना, फक्त आईसाठी जगतात?
कितीजण आईला विचारतात,
“आई, तुला काय हवंय?”
आणि त्याहून महत्त्वाचं…
“आई, तुला कसं जगायचं आहे?”
प्रत्येक मुलाने हा प्रश्न स्वतःला एकदा तरी विचारायला हवा.
आणि उत्तर प्रामाणिकपणे द्यायला हवं.
कारण आईने आपल्याला मोठं करताना स्वतःला किती वेळा बाजूला ठेवलं, याचा हिशेब तिने कधीच मागितला नाही.
म्हणून आजच्या आईंनीही कदाचित थोडंसं स्वतःचं आईपण बाजूला ठेवून स्वतःसाठी जगायला शिकायला हवं.
मुलं मोठी झाली म्हणजे आईचं आयुष्य संपत नाही.
उलट…
तिथून तिच्या स्वतःच्या आयुष्याची एक नवी सुरुवात होऊ शकते.
आणि शेवटी एक गोष्ट अगदी मनापासून…
ज्या परिस्थितीत एखाद्या मुलाला स्वतःच्या आईची लाज वाटते, तिथे दोनपैकी एक गोष्ट नक्की असते, त्या आईला मुलांना माणूस म्हणून घडवताना कुठेतरी चूक झाली असेल…
किंवा त्या मुलाला आईकडे आई म्हणून नव्हे, तर स्वतःच्या प्रतिमेचा एक भाग म्हणून पाहण्याची सवय लागली असेल.
आई ही तुमच्या आयुष्यातली एक व्यक्ती आहे.
तिच्यावर तुमचा हक्क आहे, पण तिच्या आयुष्यावर मालकी नाही.
तिने तुम्हाला जन्म दिला म्हणून ती आयुष्यभर तुमच्यासाठी जगत राहील, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा…
एकदा तिचा हात हातात घ्या आणि म्हणा,
“आई, आता तू तुझ्यासाठी जग.
मी आहे तुझ्यासोबत.”
कदाचित…
या चार शब्दांपेक्षा मोठी परतफेड तिच्या आयुष्यात दुसरी कोणतीच नसेल.
डॉ मधुरिमा कुलकर्णी
4 Responses
खरं आहे 👌👌👍
आईच्या कष्टाची, त्यागाची जाणीव असलेली मुलं सुद्धा भरपूर आहेतच की……
छान लिहिले आहे आईच्या मनातले…
..
थोडे आईनेही मुलाला समजून घ्यायला हवे ना? त्याच्या आयुष्यात नवीन माणूस आल्यावर, त्याच्या priorities बदलणाऱ्या ना? आणि इथेच प्रॉब्लेम होतो आईला आपल्या मुलावरचा हक्क सोडता येत नाही म्हणून प्रॉब्लेम्स निर्माण होतात. जर सुनेलाही आपले मानले तर खुपसे प्रॉब्लेम्स कमी होतील. पण तसे होताना दिसत नाही…त्यामुळे तुम्ही लिहिलेले बायकोला नाराज करून…हे अजिबात पटले नाही. याउलट बायकोसाठी काही केले तर आई नाराज होते हे मात्र खूप ठिकाणी बघितले आहे. त्यामुळे नात्यांचा balance साधायला यायला हवा….तो पण सगळ्यांना… एका कडूनच अपेक्षा करणे मात्र चूक !!