पूर्वी आपल्याकडे पूर्णतः एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबं मोठी असायची. सख्खे, चुलत भाऊ-बहिणी, दोन-तीन तरी वयस्क व्यक्ती, एखादी आत्या, मावशी, काही कारणाने माहेरीच राहिलेली व्यक्ती… आणि आठ-दहा किंवा त्याहूनही अधिक मुलांचा सतत चालणारा गोंधळ!
म्हणजे प्रत्येक घरात किमान १५-२० लोकांचा गोतावळा असायचा. शिवाय येणारे-जाणारे वेगळेच.
पण या सगळ्या गर्दीतही प्रत्येकाची एक जागा आणि एक जबाबदारी ठरलेली असायची.
एखादा काका शेतीकडे लक्ष द्यायचा, एखादा दुकान सांभाळायचा, तर एखादा शहरात नोकरी करायचा. घरातील वयस्क मंडळी सगळ्यांवर लक्ष ठेवायची. स्वयंपाकघराचा ताबा एखाद्या खमक्या स्त्रीकडे असायचा. ती घरातील प्रत्येक स्त्रीच्या कुवतीप्रमाणे कामं वाटून द्यायची.
मुलांकडे लक्ष देण्यासाठी “special person” कोणी नसायची. जिथे गरज वाटेल तिथे कोणीही मुलांना रागवायचं, समजावायचं, कौतुक करायचं… आणि गरज पडली तर एखादी छोटी-मोठी शिक्षा देखील द्यायची.
अशा पद्धतीने घरचा पूर्ण गाडा चालायचा.
कुरबुरी असायच्या. मतमतांतरे असायची. कधी मोठी भांडणंही व्हायची. पण “भांड्याला भांडं लागणारच” या सहज स्वीकारलेल्या भावनेतून ती भांडणं फार काळ मनात ठेवली जायची नाहीत. राग यायचा, व्यक्त व्हायचा आणि शेवटी कुठेतरी विरून जायचा.
कारण कदाचित एक गोष्ट सगळ्यांना माहीत होती,
आपण वेगळे नाही. आपण एकाच घराचे आहोत.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात निर्णय घेण्याची मुभा होती. घरातील इतर व्यक्ती त्या निर्णयावर विश्वास ठेवायच्या. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याची गरज कोणाला वाटत नसे.
विश्वास होता… म्हणून स्वातंत्र्य होतं.
आणि स्वातंत्र्य होतं… म्हणून जबाबदारीची जाणीवही होती.
घरातील एखाद्याची अडचण ही फक्त त्याची अडचण नसायची. ती सगळ्यांची असायची. त्यामुळे छोट्या-मोठ्या समस्या कधी चुटकीसरशी सुटायच्या, तर कधी अनेक हात मिळून त्यांचा भार उचलायचे.
मुलांचंही तसंच.
मुलांवर वेगळे संस्कार करण्यासाठी स्वतंत्र parenting strategy ची गरज नसायची. घरातली प्रत्येक मोठी व्यक्ती त्यांच्यासाठी एक संस्कारशाळाच असायची.
शाळेत गेल्यावर शिक्षकांचा ताबा.
शिक्षकांचा आदरयुक्त दबदबा होता. शिक्षक शिकवायचे, शिस्त लावायचे आणि पालकांचा त्यांच्यावर विश्वास असायचा.
मुलं फक्त वाढत नव्हती… ती एका संपूर्ण पिढीच्या सान्निध्यात घडत होती.
एकाच छताखाली अनेक वयांची, अनेक स्वभावांची, अनेक अनुभवांची माणसं राहत होती. त्यामुळे मुलांना जग समजून घेण्यासाठी स्वतंत्र पुस्तकांची गरज नव्हती. घरच त्यांचं पहिलं विद्यापीठ होतं.
पुढे समाज बदलला. समाजरचना बदलली.
कुटुंबं विभक्त झाली. घरातली माणसं कमी झाली. घरं छोटी झाली. सुविधा वाढल्या. व्यक्तिस्वातंत्र्य वाढलं. प्रत्येकाला स्वतःची खोली, स्वतःचे निर्णय, स्वतःचे पैसे, स्वतःचं आयुष्य मिळालं.
प्रगती निश्चित झाली.
पण या सगळ्या प्रगतीच्या प्रवासात एक प्रश्न मात्र मनात येतो,
आपण माणसं स्वतंत्र झालो की एकटी?
पूर्वी जबाबदाऱ्या अनेकांमध्ये विभागल्या जात होत्या. आज अनेक जबाबदाऱ्या एका व्यक्तीच्या खांद्यावर येऊन पडतात.
पूर्वी एखाद्याला निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्या आजूबाजूला अनेक अनुभवी माणसं असायची. आज निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे… पण त्या निर्णयाचा भारही अनेकदा पूर्णपणे आपलाच असतो.
पूर्वी मुलांना वाढवणारे अनेक हात होते. आज पालकांकडे मुलांसाठी सर्व सुविधा आहेत… पण वेळ कमी आहे, आधारव्यवस्था कमी आहे आणि प्रत्येक गोष्ट “आपलीच जबाबदारी” बनली आहे.
पूर्वी घरात मतभेद होते, पण माणसं जवळ होती.
आज माणसांना एकमेकांच्या मतांचा आदर करायला शिकवलं जातं… पण कधी कधी माणसंच एकमेकांपासून दूर गेली आहेत.
म्हणूनच कधी कधी वाटतं,
आपण घरं मोठी करण्याऐवजी छोटी केली,
कुटुंबं छोटी केली,
जबाबदाऱ्या कमी करण्याचा प्रयत्न केला…
पण त्याच वेळी मनावरचा भार मात्र वाढवत गेलो.
आज आपल्याकडे अनेक प्रकारचं स्वातंत्र्य आहे.
पण मानसिक स्वातंत्र्य?
मन मोकळं करून कोणाशी बोलण्याचं स्वातंत्र्य…
आपली अडचण कोणासमोर मांडण्याचं स्वातंत्र्य…
चुकलो तर कोणीतरी समजून घेईल, याचा विश्वास…
आपण थकलो तर कोणीतरी आपला भार उचलेल, याची खात्री…
कुठेतरी या सगळ्याची कमतरता जाणवते.
कदाचित पूर्वीच्या संयुक्त कुटुंबपद्धतीत स्वातंत्र्य कमी नव्हतं…
ते फक्त वेगळ्या स्वरूपाचं होतं.
ते स्वातंत्र्य होतं,
“मी माझं करतो, कारण माझ्यावर विश्वास आहे.”
आणि त्याच वेळी आश्वासनही होतं,
“पण मी कुठे अडकलो, तर माझी माणसं माझ्या पाठीशी आहेत.”
आज आपल्याला पुन्हा संयुक्त कुटुंबपद्धतीत जावं लागेलच असं नाही.
पण त्या काळातील एक गोष्ट नक्की परत आणता येईल,
एकमेकांवरचा विश्वास.
कारण कदाचित खरं स्वातंत्र्य म्हणजे
सगळं स्वतः करण्याची ताकद नव्हे;
तर गरज पडल्यावर कोणीतरी आपल्यासाठी उभं राहील,
या विश्वासाने स्वतःचं आयुष्य जगण्याची मोकळीक.
आणि कदाचित…
हीच आपल्या काळात हरवलेली “एका वेगळ्या अर्थाची स्वातंत्र्याची” व्याख्या आहे.
डॉ मधुरिमा कुलकर्णी
15 Responses
अगदी खरय..
मला माझी space हवी.. या अट्टाहासमुळे वैयक्तिक स्वातंत्र्य तर मिळाले पण कौटुंबिक आनंद कुठेतरी हरवत चालला आहे.. मग त्यातून बरेचसे प्रश्न निर्माण होत चालले आहेत. ते सोडविण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज भासत आहे.
CHANGE is the only CONSTANT in life !!
Khoop sundar विचार
असू शकते…
थोडे जुने थोडे नवीन स्वीकारून पुढे जाणारी अशी अगदी मोजकी एकत्र कुटुंब अजून दिसतात…
मर्यादित स्वतंत्र योग्य अस वाटतं…
खूप सुंदर आणि गरजेचे विचार,,खूप छान लिहिले
खूप सुंदर आणि गरजेचे विचार,,खूप छान लिहिले आहे.
आज कोणाला एकमेकांची गरज वाटत नाही हॆ दुर्दैव aahe
खूप च छान अगदी खरे आहे…..
अनेक विषयांवर खूप छान लिहीतेस
एकत्र कुटुंब पद्धती ही पद्धत ही अत्यंत ऊपयुक्त होती ती दुर्दैवाने या धावपळीच्या जीवनात लुप्त होत चालली आहे. आपण छान पद्धतीने याची मांडणी केलीत. अभिनंदन आपले 🍁🍁
100% True……
अगदी वास्तव आणि समर्पक वर्णन बहुतांश कुटुंबाचे कधी कधी टोकाचे भांडण पण होते करणं हस्तक्षेप करायला पण कोणी नाही आणि “व्यक्ती स्वातंत्र्य”
खूप छान आहे लेख, आणि विचार पण बरोबर आहेत.
“आज आपल्याला पुन्हा संयुक्त कुटुंबपद्धतीत जावं लागेलच असं नाही.
पण त्या काळातील एक गोष्ट नक्की परत आणता येईल,
एकमेकांवरचा विश्वास.”
He agdi patla, parat aadhi sarkha karnyacha maage lagu naye. Karan tya madhe nakkich kahi tari problems asnar jya mule jeevanshaili ya disheni badalli
लहानपण डोळ्यसमोरून गेलं. आजकाल सगळे आत्मकेंद्री झाले आहेत. फक्त स्वतःच्या सुखाचा विचार.