न संपलेल्या प्रेमाची गोष्ट

 

मयुरी एक हुशार आणि चुणचुणीत मुलगी होती. कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करत होती. वय असेल 28 च्या आसपास. स्वभावाने मृदू शांत पण आतून खूप स्वाभिमानी. मुलांना शिकवण्यात तिला मनस्वी आनंद मिळायचा. वर्गामध्ये उभी राहिली की ती पूर्णपणे त्यांच्यात मिसळून जायची. अगदी संयमाने हळुवारपणे ती सगळ्या शंकांचं निरसन करायची त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये फारच प्रिय होती

. तिचे स्वप्नीलवर जिवापाड प्रेम होते, अगदी कॉलेजच्या दिवसांपासूनच . कोवळ्या वयातलं प्रेम आता परिपक्वतेकडे झुकलं होत. स्वप्नील म्हणजे एक आकर्षक व्यक्तिमत्व . कुणीही एका नजरेत त्याच्या प्रेमात पडेल. खूप मुली त्याच्या मागे होत्या पण तो मात्र शांत आणि mature असलेल्या मयुरीच्या प्रेमात पडला. कॉलेज मध्ये मयुरी हुशार असली तरी तिचे जग खूप सिमित होते. दोन चार मैत्रिणी ,आपला अभ्यास, नियमित कॉलेजला जाणे, थोडावेळ लायब्ररी आणि मग घर. एवढेच काय तिचे कॉलेज लाईफ. ती कधी कुठल्या activity मधे नसायची. आणि स्वप्नीलचे सगळच वेगळे होते. त्याने अख्खं कॉलेज दणाणून सोडलं होतं. स्पोर्ट्स, डिबेट, नाटक सगळीकडे तो असायचाच. शिवाय तो खूप हुशार आणि महत्त्वाकांक्षी होता. आपल्या कमालीच्या अस्तित्वाची स्वप्नीलला पूर्ण जाणीव होती. इतक्या मुली आजूबाजूला असताना त्याचे लक्ष वेधून घेतले ते काहीशा अबोल आणि नाजूक मयुरीने.

आधी ओळख, मग मैत्री आणि त्याचे रूपांतर प्रेमात कधी झाले ते दोघांनाही कळले नाही. कॉलेजच्या त्या रंगीबेरंगी दिवसांमध्ये त्याचे प्रेम फुलत गेले. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका झाल्या. यथावकाश कॉलेज संपले. झंझावतासारखा असणारा स्वप्नील आता थोडा शांत झाला होता. आयुष्याकडे बघण्याची त्याची नजर बदलली होती. एका मोठ्या कंपनीमध्ये आधी इंटर्नशिप करून तो तिथेच कायम झाला होता. त्याची हुशारी , हजारबाबीपणा, कामाचा उरक सर्व पाहून कंपनीने त्याला ऑफर लेटर दिले.

मयुरी सुद्धा त्यांच्याच कॉलेजवर असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाली. त्यांच्या नात्याला सुरुवात होऊन आता जवळ जवळ चार वर्षे झाली होती. प्रेमाचे रूपांतर लग्नात व्हावे असे दोघांनाही वाटत होते पण थोडा फरक होता. मयुरी स्वभावाप्रमाणे थोडक्यात समाधान मानणारी होती. पण स्वप्नीलला जणुकाही जग जिंकायचे होते. तिच्या दृष्टीने दोघेही आता बऱ्यापैकी स्थिर झाले होते. तिने मनातले त्याला सांगितले. आधी तो खो खो हसला आणि म्हणाला

” अगं वेडे, तुला खुळ लागलंय का? इतक्या लहान वयात लग्न आणि जबाबदाऱ्या?? नाही ग राणी..मला अजून खूप पुढे जायचे आहे. जगातली सगळी सुख तुला द्यायची आहेत. अर्थात लग्न करून तूच माझी पट्टराणी बनणार पण मला थोडा वेळ हवा”

त्याच्या स्वभावाला ती जाणून होती. अर्थात तिने त्याला हवा तेवढा वेळ द्यायचे ठरवले. होतीच ती खूप संयमी. हळूहळू वेळ जात होता. मयुरी होती तिथेच होती. तीन वर्षांचा काळ लोटला. स्वप्नीलचे पॅकेज भरपूर वाढले होते. पण तो अर्थात तेवढ्यावर समाधानी नव्हता. आता त्याला परदेशाचे वेध लागले होते. आवश्यक सगळी तयारी करून त्याने एका परदेशी कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि त्याचे सिलेक्शनही झाले. त्या दिवशी तो खूप खुश होता. त्याने मयुरीला नेहमीच्या ठिकाणी भेटायला बोलावले. तिच्या आवडीचा गजरा घ्यायला तो विसरला नाही.

तिच्या डोळ्यात खोल खोल बघत त्याने तिचा हात हातात घेतला
” मयू , वेळ आली आहे..आपण लग्न करतोय”

मयुरीचा तिच्या कानांवर विश्वास बसेना.गेली अनेक वर्षे तिने ज्या क्षणाची वाट पाहिली होती तो असा अनपेक्षितपणे समोर येईल याची तिला काडीमात्र कल्पना नव्हती. माहित होत पण तरीसुद्धा ती तिच्या भावनांना आवर घालू शकली नाही. तिचे डोळे पाण्याने तुडुंब भरले..

” काय झालं मयू?” स्वप्नीलने अतीव मृदूपणाने विचारले

” काही नाही रे..पण विश्वास बसत नाहीये ”

” अहो राणीसरकार मी खरच बोलतोय..”We are getting married.” अस म्हणून त्याने खिशातून एक डायमंड रिंग काढली आणि तिच्यासमोर धरली आणि त्यांच्या नात्यावर शिक्कमोतर्ब केले.

” हे बघ मयू, आता वेळ खुप कमी आहे. अगदी आठ दिवसात आपल्याला कोर्ट मॅरेज करावे लागेल त्याशिवाय तुझ्या व्हिसाची procedure होणार नाही. साधारण महिन्याने आपण लंडन मध्ये असू…कुठे आहात मॅडम? हनिमून डायरेक्ट लंडन” खूप जास्त उत्साहात बोलल्यामुळे त्याला दम लागला होता. त्याने घटघट पाणी प्याले .

” अरे थांब, जरा सावकाश” ती थोडी काळजीने बोलली ” आणि काय बोलतो आहेस? व्हिसा काय.. लंडन काय? मला काहीही कळलेलं नाहीये. जरा नीट सांग बरं”

” बर ऐक, मला UK मध्ये एक मोठ्या कंपनी मधे जॉब लागला आहे. महिन्याभरातच joining आहे. त्यामुळे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे ताबडतोप लग्न एवढाच पर्याय आहे.”

” काय? अरे कॉलेजच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्यात आणि त्यात एका महिन्यात लग्न…थोड अवघड वाटतंय ”

” त्यात काय अवघड? तू उद्याच कॉलेजमध्ये राजीनाम्याची नोटीस देऊन टाक”

” राजीनामा? अस कसं करता येईल? माझी काही जबाबदारी नाही का?”
ती थोड्या चिंतेच्या स्वरात बोलली

” हम्म ..जबाबदारी? तू नसशील तर काय परीक्षा होणार नाहीत का?”

त्याच्या स्वरात थोडी बेफिकिरी होती
मयुरी थोडी दुखावलीच. तसंही लग्नाला धरून तिची खूप स्वप्ने होती. लग्नाचा प्रत्येक सोहळा तिला जगून घ्यायचा होता.

” स्वप्नील ऐक ना, तू आधी जॉइन हो. थोडी वाट पाहून मग लग्न करू. तोपर्यंत परीक्षा उरकतील.” तिने खूप आशेने त्याच्याकडे पाहिले

” वेडी आहेस का मयू? फक्त लग्नासाठी परत यायचं? कस शक्य आहे? एवढ सोप वाटल का तुला? ” आता त्याला जरा राग यायला लागला होता

” अरे पण असं काय करतोस? एक तर तू आधी मला कसलीही कल्पना दिली नाहीस. आणि अचानक सगळे निर्णय घेऊन मोकळा झालास…मला ठरवायला काही शिल्लकच ठेवले नाहीस.”

” हे बघ, तू आता उगाच फाटे फोडू नकोस. तुला काय मी कोणालाच आधी सांगितले नव्हते. आता ठरलाय ना सगळ मग काय प्रोब्लेम आहे तुझा?”

त्याच्या आवाजाची पट्टी वाढली आहे हे तिला जाणवलं. त्याचे शब्द तिच्या प्रचंड जिव्हारी लागले. त्याच्या दृष्टीने आपले अस्तित्व काहीच नाही या जाणिवेने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. तिचे डोळे भराभरा पाण्याने भरून आले. तिने मान फिरवली आणि रुमालाने डोळे टिपले .

” स्वप्नील , आपण उद्या बोलू. मला एक काम आठवलं आहे” एवढ बोलून तीन तिची पर्स उचलली आणि झपाट्याने तिथून बाहेर पडली. चालता चालता ती विचार करत होती आणि त्या विचारांमध्ये कधी घरी आली तिलाच कळले नाही. ती थेट तिच्या रूमकडे गेली आणि बेडवर पडून राहिली. तिला काहीही सुचत नव्हते. खर ज्या क्षणाची कितीतरी वर्षे वाट पाहिली तो क्षण आल्यावर आपली प्रतिक्रिया अशी व्हावी याचे तिला आश्चर्य वाटत होते. ? डोक्यात सगळा गोंधळ उडाला होता. तेवढ्यात तिच्या डोक्यावर मायेने एक हात फिरला..

” काय झालं ग? एकदम खोलीकडे आलीस? बर वाटत नाहीये का?” तिची आई तिला विचारत होती.
मयुरीने डोळे उघडले.

” आई ” एवढच बोलून ती ढसाढसा रडायला लागली.

एरवी अतिशय शांत आणि संयमी असणाऱ्या मयुरीला असे रडताना बघून तिच्या आईला धक्काच बसला . पण ती काही बोलली नाही. तिने मयुरीला रडू दिले. आता मयुरी बरीच शांत झाली होती.

” आता बोल, काय झालंय?” तिच्या आईने थोडे काळजीने विचारले
मयुरीने तिला सगळ्या गोष्टी इत्यंभूत सांगितल्या.

” मग , काय म्हणणे आहे तुझे?” आईने विचारले

” काय असणार? मला काहीच कळत नाहीये..” ती जरा हताश स्वरात उत्तरली

” अगं पण सगळ तुझ्या मनाप्रमाणेच होतंय ना? मग प्रोब्लेम काय आहे?”

” आई, स्वप्नील फक्त त्याचाच विचार करतोय अस नाही वाटत तुला? एवढा मोठा निर्णय इतक्या तडकाफडकी?मला हे पटतच नाहीये”

” काय पटत नाहीये? तीन वर्षांपूर्वीच तुला लग्न करायचं होत ना? मग आता काय झालं?”

” काय म्हणजे?” न उमजून तिने आईकडे पाहिले

” जे तुझ्या मनात आहे ते स्पष्टपणे बोल”

” आई आज ज्या पद्धतीने स्वप्नील बोलत होता ना त्या सगळ्यात मी कुठेच नव्हते ग. त्याचे विचार, त्याचे भविष्य सगळच, अगदी त्याच अस्तित्व सुद्धा फक्त त्याच्यापुरत होत अस वाटलं मला. त्याच माझ्यावर प्रेम आहे, पण त्याच स्वतःवर जास्त प्रेम आहे .मी आयुष्यभर त्याची बनून राहायला तयार आहे पण मला फक्त त्याची सावली बनून नाही रहायचे. माझे स्वतंत्र असणारे अस्तित्व मला अबाधित ठेवायचे आहे.”

ती आता खूप त्वेषाने बोलत होती. डोळ्यातून पाणी वाहत होते पण तिला आतून कमकुवत वाटत नव्हते.

तिने तिचे म्हणणे स्वप्नीलला सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याच्या निर्णयात काही बदल झाला नाही.
एका भेटीत तो मयुरीला म्हणाला
” Are you jealous of me?म्हणजे मी खूप पुढे निघून गेलोय असं तर वाटत नाहीये ना तुला?”

” मी आणि तुझ्यावर जळते? काय बोलतो आहेस तुला तरी कळतंय का? जाऊ दे तुला कितीही समजावले तरी नाही कळणार. मला माफ कर पण मी तुझ्या प्रेमाच्या चौकटीत बसत नाही. खूप पुढे जाऊन नंतर मागे फिरणे अशक्य होण्यापेक्षा आपण इथेच थांबू”

ती खूप हतबल झाली होती. एकीकडे कितीतरी वर्ष मनात जपलेलं प्रेम आणि एकीकडे तिचे अस्तित्व यांचा संघर्ष सुरू होता आणि यात तिचे अस्तित्व जिंकले. तिने स्वप्नीलला मुक्त केले. खूप त्रास झाला तिला पण इलाज नव्हता.

स्वप्नील वाईट कधीच नव्हता त्याचेही तिच्यावर प्रेम होतेच. पण त्याची स्वतःची मते होती. तो खूपच प्रॅक्टिकल होता. त्यामुळे त्यानेही तिचा निर्णय मान्य केला.

दोघे वेगळे झाले. स्वप्नीलच्या घरच्यांनी निवडलेल्या श्वेताबरोबर लग्न करून तो लंडनला निघून गेला.

त्यानंतरचे काही दिवस ती खूप अस्वस्थ होती. पण तिने नेटाने तिचे काम चालू ठेवले होते. कॉलेजच्या परीक्षा पार पडल्या. वेळ जात राहिला. तिची भळभळ वाहणारी जखम थोडी भरून येऊ लागली.

या गोष्टीला जवळ जवळ 2 वर्षे गेली. मयुरीचे एकसुरी आयुष्य सुरूच होते. या प्रसंगानंतर तर ती जास्तच गंभीर झाली. कधीही लग्न न करण्याचा तिचा निर्णय होता. सुरवातीला आईने समजावण्याचा प्रयत्न केला आणि नंतर निर्णय तिच्यावर सोडला.आयुष्य कोणासाठीच थांबत नाही. कालांतराने मयुरीच्या आयुष्यात प्रशांत आला. तिचेही लग्न झाले. लग्नाआधी तिने प्रशांतला सर्व कल्पना दिली होती. त्याची काहीच हरकत नव्हती. तिच्या संसारवेलीवर दोन कळ्या उमलल्या. एक ओवी आणि दुसरी पूजा.

स्वप्नीलबाबतीत काही गोष्टी उडतउडत कानावर पडायच्या. पण तो कप्पा तिने केंव्हाच बंद करून टाकला होता.

परदेशात स्वप्नीलला त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही मिळाले. आता तर तो कंपनीच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांपैकी एक होता. लंडनमध्ये मोठे घर, भरपूर पैसा , जगभर भ्रमंती सगळ त्याला हवं होत तसंच सुरू होत.

सगळ कस आपापल्या जागेवर फिट होत. दोघांच्याही आयुष्यात त्यांच्या पूर्व आयुष्याची सावली सुद्धा पडली नाही.

पंचवीस वर्ष लोटली होती. कॉलेजच्या एका मोठ्या कार्यक्रमासाठी चिफगेस्ट म्हणून स्वप्नील आला होता. तिथेच मयुरी आता हेड ऑफ डिपार्टमेंट या पदावर होती. कार्यक्रम छान पार पडला. स्वप्नीलची ओळख करून देण्याचे काम मयुरीकडे होते. तिने त्याची थोडक्यात पण छान ओळख करून दिली. स्वप्नीलचे औद्योगिक क्षेत्रातल्या विषयांवरचे भाषण उत्कृष्ठ झाले.

दुसऱ्या दिवशी तो लंडनला परत जाणार होता. त्याने मयुरीला फोन केला.

” मयुरी, स्वप्नील बोलतोय. ”

पलीकडून आवाज आला. क्षणभर ती स्तब्ध झाली.

” बोल” तिचा आवाज कापरा झाला.

” मी उद्या परत चाललोय. आज रात्री माझ्याबरोबर डिनर करशील?” त्याने विचारले. थोडावेळ पलीकडून काहीच रिप्लाय आला नाही. स्वप्नीलने फोन ठेऊन दिला.

इकडे मयुरीच्या मनात कितीतरी वादळे उठली. कितीतरी वर्ष बंद करून ठेवलेला कप्पा अचानकपणे उघडला होत. ती काही बोलूच शकली नाही आणि फोन कट झाला. तिची अस्वस्थता प्रशांतच्या लक्षात आली.

” काय झालं ग? बरी आहेस ना?”
त्याच्या एवढ्या शब्दांनी ती कोसळली. त्याच्या कुशीत शिरून ती हमासहमाशी रडू लागली. थोडी शांत झाल्यावर तिने काय झाले ते प्रशांतला सांगितले.

” अगं मग जा की…त्यात काय एवढे? मयुरी प्रेम ही खूप उदात्त भावना आहे. ती कधीच संपत नाही. पण कुठल्याही नात्यासाठी ” विश्वास ” हा पुरेसा असतो. आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ”

रात्री दोघांनी एकत्र डिनर घेतले.

” कशी आहेस?” त्याने विचारले.

त्याच्या शब्दांमध्ये पूर्वीचा आवेश नव्हता. डोळ्यात मात्र प्रेम होते

” खूप आनंदात आहे” मयुरी समाधानाने बोलली

त्यानंतर एकमेकांच्या आयुष्यात काय चालू आहे या व्यतिरिक्त त्यांनी फारशा गप्पा मारल्या नाहीत. पण त्यांचे पहिले प्रेम अजूनही त्यांच्या मनात तसेच चिरंतन होते हे न बोलताही त्यांना कळले.

दुसऱ्या दिवशी स्वप्नील लंडनला निघून गेला आणि मयुरीचे आयुष्य एखाद्या शांत डोहाप्रमाणे तसेच चालू राहिले.

4 Responses

Leave a Reply to Dr Madhurima Kulkarni Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Related Posts

Screenshot_20250810_230832_WhatsApp
Screenshot_20250810_191852_ChatGPT

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you