जरा वेगळं वाटतंय ना नाव लेखाचं?? मराठी लेख आणि नाव मात्र इंग्रजी मधे..
पण काय आहे ना काही शब्द इंग्रजी असले तरी ते इतर भाषांमध्ये अगदी चपखल बसतात. आता respect बद्दल बोलू. respect म्हणजे मान देणे पण ” तु मला मान द्यायला हवा होतास” पेक्षा ” तु मला respect द्यायला हवा होतास ” हे कानांना थोडं गोड वाटतं शिवाय ” मान ” अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या वयाला, वेगवेगळ्या व्यक्तींना देण्याची गोष्ट आहे. “मानाबरोबर” “अपमानही” येतो जसे ” मानापमान”. सगळे शब्दांचे खेळ हो…पण या मान आणि अपमानाच्या खेळात मुद्दा भरकटतो आणि संभाषण वेगळं वळण घेतं म्हणून थोडा mild पण त्याच अर्थाचा “respect” हा शब्द असो…
तर झालं असं की परवा शेजारची प्रमिला आली होती. अगदी सहज गप्पा मारायला.
” काकु , जरा आमच्या आईंना सांगा हो… सारखं घालून पाडून बोलत असतात. अपमान होतो माझा पण यांना कोण सांगणार? ”
आता माझ्याच वयाची हीची सासु . आणि वयाने वडील म्हंटल्यावर खर हिने तिला मान द्यायला हवा पण इथे सुनच तक्रार करते की तिचा सासुकडून अपमान होतो आहे. अर्थात होतो सुद्धा. कारण हे नातच खूप वेगळं आहे. आता वयाने मोठी म्हणून सुनेने सासूला मान द्यावा आणि वयाने लहान म्हणून सासूने सुनेला थोड समजून घ्यावं ..नाही का? प्रश्न आपोआपच सुटतील. थोडक्यात दोघींनी एकमेकींना ” respect” द्यावा.
प्रभाकर थोडा विचित्र फेज मधे होता म्हणजे ” वयात आलेला मुलगा ” आणि ” वय झालेले वडील ” यांच्या कात्रीत तो सध्या सापडला होता.
निलेश त्याचा मुलगा इंजिनिअरिंग करतं होता. अडनिड्या वयातल्या नीलेशला वडिलांच्या अनेक गोष्टी पटायच्या नाहीत तर प्रभाकरला वाटायचं कस handle करावं या मुलाला? अशावेळी चिडचिड, त्रागा, राग दोनही बाजूंनी ठरलेलं. आता कोणी कोणाला मान द्यायचा?
याच्या विपरीत परिस्थिती प्रभाकर आणि त्याच्या वाडीलांमध्ये. गणपतराव आता अगदी वार्धक्याच्या उंबरठ्यावर…वय जवळपास ऐंशी. वागण्यात कमालीचा हट्टीपणा . लहान मुलचं म्हणा ना. त्यांच्या लहरी सांभाळणे प्रभकराला खरंच खूप अवघड जात होते. पण वडील असल्याने तो निमूटपणे त्यांचं सगळं करत होता. वेळ प्रसंगी त्यांनी केलेला अपमानही सहन करत होता.
आता इथे पुन्हा आला तो मान. पण त्यापेक्षा तीनही पिढ्यांनी एकमेकांचा थोडा ” respect” केला तर परिस्थिती फार चिघळणार नाही.
चित्रा आणि गायत्री दोघीजणी खरंतर विहिणी. स्वभावाने दोघीही कमालीच्या चांगल्या होत्या. पण इथे स्पर्धा थोडी वेगळीच होती. “माझा मुलगा तुझा जावई” आणि ” माझी मुलगी तुझी सून” अशी परिस्थिती. बघा हं…खूप चांगल्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा काहीतरी गोम असतेच. जास्त चांगली सासू कोण अशी ही स्पर्धा आणि यातून दोघींमध्ये शितयुद्ध. तसं सगळच छान होत. पण दोघींच्याही मुलांना ( अजय आणि शिल्पा) कळायचं नाही की वेळप्रसंगी कोणाला महत्व द्यावं? थोड पारडं इकडचं तिकड झालं की संपला कारभार. पोरं गोंधळात पडायची. माझ्या आईचा मान मोठा का तुझ्या? या प्रश्नाच्या भोवऱ्यात दोघं गरगर फिरत राहायची. त्यापेक्षा चित्रा आणि गायत्रिने समजूतदारपणे एकमेकींना ” respect” दिला तर किती सुंदर नात निर्माण होईल.
अशी कितीतरी उदाहरणे या ” respect” च्या संदर्भात देता येतील.
मान आणि अपमान ही आपण माणसांनी निर्माण केलेली गुंतागुंत आहे. त्यापेक्षा चूक आणि बरोबर यावर गोष्टी अवलंबून ठेवल्या तर अनेक समस्या निर्माणच होणार नाहीत.
तर असा हा ” respect” म्हणजे दोन व्यक्तींना एकमेकांच्या प्रती जो “आदरभाव” असतो तो होय. इथे नात्याचा, वयाचा, पदाचा काहीच संबंध नाही. फक्त respect द्या आणि घ्या एवढंच. आणि मान द्यायचा आहे तो फक्त देवाला, निसर्गाला आणि अशा व्यक्ती ज्यांनी या जगात काही महान कार्य केलेले आहे. यांच्यापुढे नतमस्तक होऊन फक्त आणि फक्त त्यांना मान द्यायचा आहे.
तर अशी ही ” respect” शब्दाची थोडी गम्मत तुमच्यापुढे मांडली. आवडेल अशी आशा करते. काही राहून गेले असेल तर समजून घ्या आणि थोडासा
” respect ” माझ्या लिखाणाला द्या 😀.
धन्यवाद 🙏🏻
डॉ मधुरिमा कुलकर्णी.