काय आणि किती लिहाव स्ट्रेसबद्दल….खूप मोठा, खूप खोल, खूप गहन आणि खूप जास्त व्याप्ती असलेला विषय आहे. त्यामुळे आज चर्चा करणार आहे ते सध्याच्या पिढीमध्ये असलेल्या स्ट्रेसची…
त्या दिवशी संध्याकाळी क्लिनिक मधे विशेष patients नव्हतेच. जे काही किरकोळ होते ते आटोपून मी आज लौकर घरी जावे या विचारात असतानाच अमितने माझ्या consulting room मधे प्रवेश केला. वय साधारणपणे 25/26 असेल. बराच लहान असल्यापासून त्याला मी ओळखत होते. तसा हसतमुख आणि छान मुलगा …पण त्या दिवशी त्याच्याकडे मला पाहवेना. विस्कटलेले केस, दमलेला चेहरा, पडलेले खांदे, लालसर डोळे…
” काय झालं रे?” मी थोड्या काळजीच्या स्वरात विचारलं. समोरच्या खुर्चीवर त्यानं स्वतःला जवळजवळ ढकलून दिलं आणि चक्क ढसाढसा रडायला लागला तो. फार करूण दृश्य होतं. मलाही थोडावेळ काय करावं ते कळेना. तेवढ्यात मी चटकन सावरले. अनुला पाणी आणायला सांगून त्याच्या पाठीवर थोडा हात फिरवला. आता तो जरा शांत झाला होता.
” अमित, नक्की काय झालंय?” मी माझा प्रश्न पुन्हा रिपीट केला.
” mam मी खुप प्रोब्लेम मधून जातो आहे सध्या. आता सहन होत नाहीये. काय करू तेच कळत नाहीये. ”
आता पुन्हा त्याचा श्वास फुलायला लागला, डोळे भरून यायला लागले.
मी examination table वर घेऊन त्याचे BP चेक केले. BP machine चा पंप मी पुन्हा पुन्हा खाली वर करत राहिले कारण अमितचे BP प्रमाणापेक्षा खूप जास्त वाढले होते.
त्याची एकंदरीत अवस्था आणि BP ने गाठलेली धोक्याची पातळी बघून तो कुठल्यातरी प्रचंड तणावाखाली असणार याची मला खात्री झाली.
” अमित , आईला कॉल करुया का? ”
माझं वाक्य पूर्ण होण्याच्या आता तो जवळ जवळ ओरडलाच
” अजिबात नको, त्यापेक्षा मला एखादी झोपेची गोळी द्या, बर वाटेल…कितीतरी दिवस झालेत mam मी proper झोपलेलो नाहीये”
” ठीक आहे, थोडा शांत हो , मग पाहू ” अस म्हणून मी त्याला रेस्ट रूम मधे बसायला सांगितलं.
ताबडतोप त्याच्या आईला मी फोन करून बोलावून घेतलं आणि थोडक्यात परिस्थितीची कल्पना दिली.
त्याच रात्री अमितला mild heart attack आला.
इतका कसला स्ट्रेस असेल त्याला? थोडक्यात समजलेली माहिती अशी की एकुलत्या एक असलेल्या अमितने चांगला जॉब सोडून मित्रांच्या मदतीने नवा business चालू केला होता आणि त्यात तो फसला. केवळ झटपट मिळणारा पैसा आणि ओव्हर कॉन्फिडन्स त्याला नडला.
सीताची गोष्ट थोडी वेगळी आहे. 30/35 मधली सीता IT कंपनीमध्ये जॉब करते. 3 वर्षांचा मुलगा , नवरा आणि ती एवढेच छोटे कुटुंब. तिची आणि माझी अलीकडचीच ओळख. छोटे छोटे प्रॉब्लेम घेऊन ती महिन्यातून किमान दोन वेळा तरी माझ्याकडे यायची.
” मॅडम , मी सगळ व्यवस्थित खाते, भरपूर friends आहेत मला, तसा काही प्रोब्लेम नाहीये मग मी वारंवार का आजारी पडते?”
खरतर कोड्यात टाकणारा प्रश्न तिनं मला विचारला होता . कारण खरच तसा फार highlight होईल असा काहीच आजार तिला नव्हता.
मग मी तिची थोडी history घेतली. त्यातून हे लक्षात आलं की तिचा स्वभाव बऱ्यापैकी डॉमिनंट होता. घरात आणि कामाच्या ठिकाणी म्हणेल तसं झालं पाहिजे असा तिचा आग्रह असायचा. तसं झालं नाही की ती दिवस दिवस डिस्टर्ब असायची. त्यात भरपूर पगाराच्या नोकरीमुळे आयुष्याकडून अवास्तव अपेक्षा. त्यामुळे तिची स्ट्रेस लेव्हल नेहमी वाढलेली असायची. त्यातूनच आपल्याला काहीतरी होते आहे या कल्पनेने जन्म घेतला होता.
12 वर्षाचा अनुराग आजकाल फार झोपतो अशी तक्रार घेऊन मीरा आली होती.
” मॅडम त्याच्या काही टेस्ट वगैरे करायच्या असतील तर करून घ्या ”
मी काही बोलण्याआधीच मला समोरून सूचना आली.
” आता परीक्षांचे दिवस आहेत. खुप शाळा बुडवतोय. चांगले मार्क्स नाही आले तर काय करायचं हो ” मीरान एका दमात सगळ सांगून टाकलं.
मी अवाक झाले. बारा वर्षाच्या मुलाकडून किती अपेक्षा आहेत आजकालच्या पालकांच्या? मुलाला नक्की काय प्रोब्लेम आहे? त्याची गंभीरता, त्याची खोली हे सर्व समजून घेण्याआधी प्रॉब्लेमचे सोल्युशन हवं आहे यांना. कदाचित मुलगा वयात येत असेल, शाळेत किंवा इतर ठिकाणी त्याला कोणी त्रास देत असेल? काहीही असो मुलाचे अचानक बदललेले वर्तन त्याची स्ट्रेस लेव्हल दाखवते.
अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. ताण तणाव नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. थोड्या प्रमाणात ताण हा असायलाच हवा. नाहीतर आपले वागणे एकदम बेछूट होऊन जाईल. पण जेंव्हा हा ताण जीवघेणा होऊ पाहतो तेंव्हा मात्र थोडं, थांबा विचार करा. आयुष्य एकदाच मिळतं त्यापेक्षा मोठ काहीच नाही.
प्रचंड स्पर्धात्मक लाईफस्टाईल, मारुतीच्या शेपटीसारख्या वाढलेल्या गरजा, प्रत्येक गोष्टीकडे शंकेने बघण्याचा दृष्टीकोन, मनात भरलेली नकारात्मकता ,बाहेरचे खाण्याचे वाढलेले प्रमाण, मोबाईल आणि लॅपटॉप यांचा अनिवार्य असलेला पण न झेपणारा वापर आणि हरवत चाललेली शांत झोप हे सगळ कुठे घेऊन जाणारे यांना? विचार करायला हवा. पूर्वी BP, शुगर सारखे आजार वयाच्या साठीनंतर लागायचे. पण आज चित्र खूप वेगळ आहे. avarage काढले तर 40% तरुण आज या आजारांचा बळी आहे आणि हे प्रमाण खूप झपाट्यानं वाढतंय. बरोबरीने मानसिक समस्यांचा रोज नव्याने जन्म होतोय. कितीतरी आयुष्य सुरू होण्याआधी कोमेजून जातं आहेत नाहीतर संपून जात आहेत.
स्ट्रेस ही जागतिक समस्या बनली आहे. याला जितक्या लौकर होईल तेवढा लौकर अटकाव करणे गरजेचे आहे. अन्यथा याचे परिणाम दूरगामी आणि अती भयंकर असण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही.
डॉ मधुरिमा कुलकर्णी