वेळ

नीता आळस झटकून उठली. तीनं भिंतीवरच्या घड्याळाकडे एक नजर टाकली. फक्त चार वाजले होते. दुपारभर फक्त लोळून ती अगदी कंटाळून गेली होती. दूध तापवून चहा घ्यावा म्हणून ती उठली खरी पण पुन्हा तशीच आळसवून सोफ्यावर तीनं अंग टाकून दिलं.

‘ काय फरक पडतो अजून एखाद्या तासानी चहा घेतला किंवा नाहीच घेतला तरी?’
तिच्या मनात विचार आला. ‘कोणासाठी एवढं धाऊन धाऊन करायचं आहे? एकटा जीव सदाशिव आपण ‘ तिच्या विचारांची आवर्तन काही थांबत नव्हती.

तेवढ्यात दार वाजलं. कोण असेल? असा भाव चेहऱ्यावर ठेऊन तीनं दार उघडलं. तर शेजारची पाच वर्षांची सई दारात होती.

” आजी , मी येऊ? ”
” ये रे बाळा…ये ”
सईन घरात एन्ट्री घेतली आणि थोड्या वेळासाठी का होईना घरात चैतन्य पसरलं.
मग मात्र नीता उठली. एकीकडे सईच्या प्रश्नांना उत्तरे देत तीनं दूध तापवून स्वतःसाठी कपभर चहा केला. डब्यातून मारीची चार बिस्किट्स काढून त्यातली दोन सईच्या हातावर ठेवली आणि राहिलेली दोन तीनं चहात बुडवून संपवून टाकली.

“आजी आजोबा कुठे गेले?” सईच्या या प्रश्नावर तिला एकदम भडभडून आलं. डोळ्यातल्या पाण्याला तीनं आडवल नाही. ते मुक्तपणे वाहू दिलं. तेवढ्यात सईच लक्ष तिच्याकडे गेलं.

” आजी तु रडू नको. मला आईनं सांगितलं आहे की आजोबा देवाघरी गेले आहेत आणि अजून ती काय म्हणाली माहितीये?”
” काय ग?”
ती म्हणाली ” आजीला सारखं आजोबांबद्दल विचारायचं नाही, sorry आजी ”
” असू दे रे बाळा ” अस म्हणून नीतानं सईची एक पापी घेतली.
थोड्या वेळानं सईची आई तिला घ्यायला आली.

” काकू कशा आहात?” तीनं मृदुपणे चौकशी केली
” बरी आहे…आता काय आला दिवस ढकलायचा” थोड कातर होऊन नितानं उत्तर दिलं

अगदी 6 महिन्यांपूर्वी तीच आयुष्य छान चालू होत. महेश तिचा नवरा दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाला होता. नीताची बँकेची नोकरी व्यवस्थित चालू होती. भक्कम बँक balance , गाडी, एका चांगल्या सोसायटी मधे 3 bhk flat अशी सुखवस्तू पार्श्वभूमी त्या कुटुंबाला होती. कशालाही ददात नव्हती. एकुलत्या एका मुलाचे लग्न होऊन चार वर्ष झाली होती. सुनही नोकरी करणारी. सुरवातीला सगळं अगदी दृष्ट लागण्यासारख होत. सगळेच पूर्ण दिवस बिझी असल्याने कोणाचा कोणाशी फारसा संबंध येत नव्हता. सून बरीच स्वतंत्र विचारांची होती. “आपल, आपलं” असा तिचा थोडा खाक्या होता. नीतालाही सुरवातीला त्यात फार काही प्रोब्लेम नव्हता.

स्वतः निता सुद्धा मुडी आणि बऱ्यापैकी आपलच खरं करणाऱ्यांपैकी होती. वाईट होती अशातला भाग नव्हता पण स्वभावातला या मोठ्या दोषाला तीनं फारस कधी महत्व दिलच नाही. त्यामुळे तिच्या नकळत का होईना पण तिच्या बोलण्याने कोणीतरी दुखावले जायचे. नंतर नीताला त्याची जाणीव व्हायची पण वेळ निघून गेलेली असायची.

“नीता तु खूप चांगली आहेस. किती मदत करतेस सगळ्यांना पण थोडा तोंडावर ताबा ठेव ग , एके दिवशी हाच स्वभाव तुझा घात करेल” महेश नेहमी तिची समजूत काढायचा.

सासुसूना दोघीही थोड्या जिद्दी असल्याने फार दिवस एकत्र रहाणे शक्य झाले नाही आणि वर्षभरापूर्वी लेकाने स्वतःचा वेगळा संसार थाटला. नीताने सुनेला अगदी हौसेने सगळा संसार सजवायला मदत केली. शिवाय नवीन आहे गरज लागू शकते म्हणून तिच्या नावाने पाच लाखाची fd सुद्धा करून दिली.

आता ती आणि महेशही स्वतःच्या कर्तव्यातून मुक्त झाल्याच्या समाधानात होते.

” नीता , मला वाटतं तूही आता VRS घे, काय कमी आहे आपल्याला? मस्त भटकंती करू आणि लाईफ एन्जॉय करू, काय म्हणतेस?”

खर तर निताचं आता promotion due होत. बँकेत सतत मॅडम मॅडम केल्याने तिच्या स्वभावाप्रमाणे ती अगदी सुखावून जात असे. त्यात हे प्रमोशन..नाही म्हटलं तरी तिचा इगो कुठेतरी सुखावत होता. त्यामुळे महेशच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून तीनं तिचा जॉब चालूच ठेवला होता.
यथावकाश तीचं promotion झालं. अर्थात कामाबरोबर पगारही वाढला. ती आता जास्तच बिझी झाली.

महेश स्वच्छंदी होता. त्यानं त्याचा मस्त ग्रूप जमावाला होता . पण तरीही त्याला वाटायचं की आताचा मोकळा वेळ निताबतोबर घालवावा. आणि निता त्याला फार वेळ देऊ शकत नव्हती.

” नीता , मला घरी अलीकडे खूप कंटाळा येतो ग. तु दिवसभर ऑफिस मधे. हे एवढं मोठ घर मला खायला उठतं. तु पण हो ना आता यातून मोकळी. आता ही सेकंड इनिंग आपण मनसोक्त जगू. ”

” हो रे, मलाही तुझ्याबरोबर जग फिरायच आहे, आता थोडेच दिवस मग बघ , तु राजा आणि मी राणी” लाडिकपणे त्याच्या गळ्यात हात घालुन त्याच्या डोळ्यात बघत ती उत्तरली.

असेच दिवस जात राहिले आणि एके सकाळी महेश झोपेतून जागा झालाच नाही.
“cardiac arrest “डॉक्टरांनी निदान केले. सून मुलगा पंधरा दिवस येऊन राहिले. पाहुणे, ओळखीचे भेटून गेले. खूप वाईट झालं एवढाच सगळ्यांचा सुर होता.

पंधरा दिवसांनी मुलगा नीताला म्हणाला ” आई थोडे दिवस चल माझ्याकडे , बर वाटेल तुला नाहीतर इथे सतत बाबांच्या आठवणीने अगदी वेडीपिशी होशील” एवढं बोलून त्यानं एक आवंढा गिळला.
सुनेने विरोध केला नाही पण फारसा आग्रह सुद्धा केला नाही.
” नको बेटा, मला थोड एकटं राहू दे . वाटलं की मी फोन करेन तुला ”

मुलगा सून गेल्यावर मग खरं नीताला ब्रह्मांड आठवलं. तिला ठायी ठायी महेश दिसू लागला.

त्याच आर्जवी बोलणं, तिला चहा करून देणं, कधीतरी लाडात येणं आणि त्याहीपेक्षा तिला जास्त बोचात राहिले ते त्याचे शब्द.
‘ निता चल ग, राहिलेल्या आयुष्याचे क्षण एकत्र गोळा करू ‘.
नीताच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. अवरित वाहणारे अश्रू पुसण्यासाठी तिच्याजवळ कोणीच नव्हते. कामातही तिचे लक्ष लागेना. अनेक चुका होत होत्या. स्वतःला कंट्रोल करणं तिला जमत नव्हते. शेवटी तिने VRS घेण्याचा निर्णय घेतला . घेतला असं म्हणण्यापेक्षा तिला वरिष्ठांनी तो घ्यायला लावला.
आता निता घरी होती. एवढ्या मोठ्या घरात अगदी एकटी.

तिला ऐकू येत होते महेशचे शब्द “निता मला फार एकटं वाटतं ग, उरलेलं आयुष्य आपण एकत्र घालवू”
पण हवेतले शब्द हवेत विरून जात होते. विषण्ण निता महेशच्या आठवणीत एकेक दिवस काढत होती.

अशातच शेजारच्या सईच्या रूपाने तिला छोटी मैत्रीण मिळाली. नीता सईला खाऊ पिऊ घाली, तिला गाणी शिकवे, गोष्टी सांगे. तिच्यासाठी हा एक छान विरंगुळा होता. जो पर्यंत सई तिच्याजवळ असे तोपर्यंत तिला सगळ्या जगाचा विसर पडायचा. मोठ्या घरात सईचा अगदी धुडगूस चाले.त्यातून नीताला आपल्या जगण्यासाठी एक आशेचा किरण दिसला.

आपण पाळणाघर सुरू केलं तर? आपला वेळही जाईल आणि आजूबाजूच्या अनेक पालकांना मदतही होईल.
तीनं तिचा विचार मुलाला बोलून दाखवला. सुरवातीला त्याला हे अजिबात पटले नाही. पण निता तिच्या निर्णयावर ठाम होती.
” अरे मी हे पैशासाठी नाही करणार..पण माझ्या उरलेल्या आयुष्यात ही मुले पुन्हा चैतन्य निर्माण करतील याची खात्री आहे मला ”

आणि ” बालभवन पळणाघराची ” स्थापना झाली. एक दोन करत करत गेल्या पाच वर्षात तीच्याकडच्या मुलांची संख्या वाढली.
आता निता खूप शांत झाली होती. या बालगोपळांमधे तिचा इगो केंव्हा तिच्याकडून निसटून गेला हे तिलाही कळले नाही.
आता ती निता आजी म्हणून सर्वश्रुत झाली होती. बालभवनचा आज पाचवा वाढदिवस होता. सगळीकडे अगदी धूम चालू होती. फुगे, केक, चॉकलेट्स, आइस्क्रीम … मुले चंगळ करत होती. आणि निता महेशच्या फोटोसमोर उभी राहून गेलेल्या वेळेबद्दल त्याची माफी मागत होती.

डॉ मधुरिमा कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Related Posts

WhatsApp Image 2026-01-25 at 5.36
Screenshot_20250810_230832_WhatsApp

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you