म्हणजे काय? तर तेच “रोज एक कोपरा साफ करा. ” मग तो घरातला एखादा कोपरा असेल, तुमच्या कामाच्या ठिकाणचा असेल, तुमचा वार्डरोब असेल आणि या सगळ्यापलीकडे जाऊन तो कोपरा तुमच्या मनाचा पण असेल. ”
आता उदाहरणं द्यायचं झालं तर गेले कित्येक दिवस मी माझ्या बेडचा side table साफ करण्याच्या विचारात होते. नुसते विचार बर का…आणि साफसफाई म्हटलं तर तिथल्या वस्तू उचलायच्या , झटकून स्वच्छ करून पुन्हा तिथेच ठेऊन द्यायच्या. नाही अशी साफसफाई काही उपयोगाची नाही.
कुठेतरी वाचलं होत किंवा कोणी सांगितलं असेल त्या पद्धतीनं आज ते side table साफ करायला घेतलं. सगळ्या वस्तू अगदी ड्रॉवर्स पण रिकामे केले. एक एक वस्तू हातात घेऊन बघितली. काय काय नव्हते त्यामध्ये? जुन्या चष्म्याच्या फ्रेम्स, तुटलेले किंवा रंग उडालेले क्लचर्स, अर्धवट संपलेले दौऱ्याच रीळ, असू दे म्हणून ठेवलेली जुनी औषधे, वाळलेल्या कलर बॉटल्स, खराब झालेले ब्रश, न उठणारे पेन्स, कधीतरी लागतील म्हणून ठेवलेली कुठली कुठली बिले, काय आणि काय…..याचबरोबर लागणाऱ्या पण बऱ्याच गोष्टी होत्या. आता इतक्या अडगळमधे नेमकी लागणारी गोष्ट कधीच सापडत नाही. का सापडेल बरं?
मग सावकाश बसून न लागणारी अडगळ उचलून बाजूला ठेवली. धूळ पुसून लागणाऱ्या सगळ्या गोष्टी नीट ठेवल्या. भरपूर जागा झाल्यामुळे सगळ्या गोष्टींना पण योग्य स्थान मिळाले. आता तो side table इतका सुंदर दिसायला लागला की मी खुदकन स्वतःशीच हसले…
एका समाधानात दुपारचा चहाचा कप घेऊन बसले तेंव्हा विचार आला की किती छान आहे हि कल्पना …एक कोपरा साफ करून इतक समाधान , शांतता मिळते आहे तर रोज असंच केलं तर घरही किती स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न राहील.
अगदी असंच आपल्या मनाच आहे हो. या मनात तर इतके कप्पे आहेत आणि एकही कप्पा रिकामा नाही. कुणाबद्दालचा जुना राग, असूया, द्वेष, मत्सर आहेच शिवाय आयुष्यात भोगलेल्या अनेक बऱ्या वाईट विचारांची, गोष्टींची, आठवणींची जळमटे जिथे तिथे लटकत असतात. करून राहायच्या गेलेल्या इतक्या गोष्टी इथे पडलेल्या असतात की नुसत्या विचारांनी थरकाप उडेल. मग हे मानाचे कोपरे सुद्धा वेळोवेळी घासून पुसून चकाचक करायला हवेत ना?
जर मनाचा आरसा साफ असेल तर तुमचा रोजचा दिवस हा फक्त सुंदर असेल. रात्री झोपताना एक समाधान असेल.
असंच शरीरही साफ ठेवायला हवं. मला माहित आहे तुमच्यापैकी ९९.९९% लोकं रोज आंघोळ करून शरीर निर्मळ ठेवत असतात.कडक इस्त्रीचे कपडे, एखादा perfume रोज असतोच की. हे सगळं गरजेचे आहेच पण याचबरोबर शरीराची अंतर्गत स्वच्छताही तेवढीच महत्वाची आहे. योग्य आणि समतोल आहार, भरपूर झोप, आवश्यक तेवढे काम, व्यायाम या सर्व गोष्टी पण शारीरिक स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय गरजेच्या आहेत. अजून एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जर काही शारीरिक आजार असेल तर वेळोवेळी डॉक्टरांना भेटणे, औषध, पथ्य पाणी सांभाळणे याकडेही दुर्लक्ष होत उपयोगी नाही.
तर आज आपण समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे तो म्हणजे ” स्वच्छतेचा कोपरा” मग तो सामाजिक असेल, मानसिक असेल नाहीतर शारीरिक असेल…नित्यनेमाने साफ होणे गरजेचे आहे.
डॉ मधुरिमा कुलकर्णी