मी — एक डॉक्टर, एक मुलगी, एक बायको, एक सून, एक आई, एक सासू… आणि त्यासोबतच ती असंख्य नाती जी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याशी घट्ट जोडलेली असतात. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत, माझ्याही मनात तक्रारींचा मोठा ढीग साचला होता. जसं मला हवं तसं स्वातंत्र्य मिळत नव्हतं. घरासाठी कितीही केलं तरी “अजून कमीच” असं भासायचं. कुटुंबात मला हवा तसा मान-सन्मान मिळत नाही असं वाटायचं. आणि अशा तक्रारींची यादी संपायचं नाव घेत नव्हती.
मी डॉक्टर असल्यामुळे कदाचित इतर महिलांना वाटत असेल — “अहो, या डॉक्टर! म्हणजे सगळं वेगळं, एकदम सुंदर आणि सुखी आयुष्य!” पण खरं सांगायचं तर, घरात जी कुचंबणा, मनाला बोचणारी उपेक्षा आणि स्वतःला हरवून बसण्याचा अनुभव अनेक महिलांना येतो, तो माझ्याही वाट्याला तसाच आला होता. मी नशिबाला दोष देत, दिवस ढकलत जगत होते.
मग आला कोविड — आणि जग अक्षरशः थांबून गेलं. आम्हा डॉक्टरांसाठी मात्र तो काळ अतोनात कामाचा आणि ताणाचा होता. रोज मृत्यूचं सावट, भीती, असंख्य वेदना पाहणं… पण या काळानं मला एक अनमोल शिकवण दिली — मनाशी नातं जोडण्याची ताकद. रुग्णांच्या मनातील मृत्यूची भीती कमी करताना मी नकळत माझ्याही छोट्या-छोट्या समस्यांशी लढायला शिकले. तिथूनच मानसशास्त्राकडे वळायची प्रेरणा मिळाली.
साधारण वर्षभरापूर्वी मी Psychology Counselling चा कोर्स पूर्ण केला आणि माझ्या क्लिनिकसोबतच समुपदेशन केंद्र सुरू केलं. तिथं अनेक स्त्रियांच्या समस्या ऐकताना, त्यांना सावरताना, मी स्वतःलाच नव्याने ओळखू लागले. त्यांचं counselling करताना माझ्याही मनाचं counselling होत होतं. आणि अशा प्रकारे माझ्या मनाची ताकद, माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत गेला.
आपण बायका किती हरहुन्नरी असतो! आपल्यात कितीतरी कला, कौशल्यं दडलेली असतात — पण त्याची आपल्यालाच जाणीव नसते. खरं तर अनेक महिलांना पन्नाशीनंतरच स्वतःशी खरी ओळख होते. एकदा तुमच्या सामर्थ्याशी तुमची गट्टी जमली की, तुमचं स्वातंत्र्य, तुमची ओळख आणि तुमचं अस्तित्व तुम्हालाच तुमच्यात सापडतं.
आज मला आनंदाने सांगावंसं वाटतं माझी सर्वात जवळची मैत्रीण मीच आहे. मी स्वतःवर प्रेम करायला शिकले. मी स्वतःचा आदर करायला शिकले. आणि जसेच मी स्वतःला मान दिला, तसेच माझ्या प्रियजनांनी, मित्रपरिवाराने आणि समाजानेही मला सन्मान द्यायला सुरुवात केली.
शेवटी इतकंच सांगायचं आहे कोणीच परिपूर्ण नसतं. परफेक्ट तर अजिबातच नाही. पण स्वतःची ओळख निर्माण करायची असेल, तर त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील. कारण खरा प्रवास हा नेहमी… स्वतःकडे जाणारा असतो.
डॉ मधुरिमा कुलकर्णी