या गोष्टीला साधारणपणे तीन साडेतीन वर्ष झाली असतील. Covid संपून बऱ्यापैकी व्यवहार चालू झाले होते. मात्र बरीच मंदिरे, मठ अजूनही पूर्णपणे चालू झाले नव्हते. दर्शनासाठी खूप restrictions होते. आता तो काळच तसा होता की पूर्ण जगात एकही व्यक्ती अशी नसेल ज्याच्या तोंडचे पाणी पळाले नसेल.
आम्ही डॉक्टर लोकांनी तर भरपूर struggle केला होता. stress, tension खूप होते. patients बरोबर स्वतःच्या family ची पण जबाबदारी होती. तर असा तो काळ होता.
मीही त्यातलीच एक. अगदी कुठेतरी पळून जावं इतपत अवस्था झालीच होती पण कर्तव्यापुढे काय चालणार? त्या दिवशी माझ्या पेशंट सौ. राणी शेटे माझ्याकडे आल्या होत्या . बऱ्याच जुन्या पेशंट असल्याने घरगुती गप्पा वगैरे चालायच्या. त्या वेळी मुख्यत्वे करून बोललं जायचं ते फक्त आणि फक्त ” करोना ” याच विषयावर. मग आलेला ताण घालवण्यासाठी त्यांनी मला श्री गोंदावले स्थानी महाराजांच्या चरणी लीन होण्याबद्दल सांगितले. आता मी काही फार देवभोळी किंवा फार श्रध्दाळू वगैरे नाही. त्यांनी सांगितले आणि मी विसरूनही गेले. त्याच दरम्यान माझी बालमैत्रीण शैलू ( ती पण महाराजांची प्रचंड भक्ती करणारी) हिने असाच काहीसा सल्ला दिला.
या नंतर बरोबर दोन दिवसांनी माझ्या विहिणबाई + मैत्रीण अर्चना देशपांडे यांचा नगरहून फोन आला होता. गप्पांचा विषय तोच…बघा मानवी स्वभाव कसा असतो ज्या गोष्टींनी टेन्शन वाढणार आहे त्याच गोष्टींची आपण चवीने चर्चा करतो. असो..तर आमच्या देशपांडे वहिनी पण नेमक्या महाराजांच्या परम भक्त आणि तोच सल्ला..
आता मी थोडा विचार करू लागले की काहीतरी असावं त्यामुळेच एकाचं वेळी भिन्न व्यक्तींकडून तोच सल्ला मिळतो आणि सर्वजण महाराजांचे परम भक्त.
म्हटलं ठीक आहे जाऊन तर येऊ गोंदावल्याला. मग लगेच जवळचा शनिवार, रविवार बघून मी माझ्या आई समवेत कोरेगाव , जिल्हा सातारा या ठिकाणी माझी आत्या सौ. सुनंदा क्षीरसागर हिच्याकडे मुक्कामी गेले. विलक्षण योगायोग की ही सुद्धा इतर तीन जणांच्या पंथामधली.
दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा कोरेगाव ते गोंदावले हा प्रवास सुरू झाला. अशी आख्यायिका आहे म्हणतात की महाराजांचे तुम्हाला बोलावणे येते आणि तुम्ही त्या ठिकाणी जाण्यासाठी स्वतःला थांबवू शकत नाही. मी मात्र फारच निर्विकार होते. देवाच्या परम भेटीची ओढ असा काहीच भाव माझ्या मनात येईना. मी खूपच प्रयत्न करत होते की मला थोडेतरी तसे feeling यावे म्हणून पण नाहीच…
साधारण दीड तासाचा प्रवास करून आम्ही श्री क्षेत्र गोंदावले याठिकाणी पोचलो. मी अजूनही सांशक होते की मी या ठिकाणी का आले आहे?
श्री गोंदावलेकर महाराजांचा मठ करोना मुळे बंदच होता. फक्त महाराजांच्या समाधीचे दर्शन घेता येत होते. आम्ही गेट एक मधून एन्ट्री घेतली. आत जाताना बाहेरून एक जपमाळ विकत घेतली. जपमाळ महाराजांच्या समाधी स्थानाला दाखवून मग रामनामाचा जप करण्याची प्रथा आहे. सर्व सोपस्कार पार पाडून आम्ही बाहेर आलो. माझे मन पूर्ण कोरडेच होते. कुठलीही पुसटशी सुद्धा श्रद्धेची भावना माझ्या मनाला शिवलेली नव्हती.
पण ठीक आहे अस मनाला बजावून आम्ही थोरल्या राम मंदिरात दर्शनासाठी गेलो. प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊन मातोश्रींचे शेजघर ( महाराजांच्या पत्नी) आणि महाराजांच्या शेजघराचे दर्शन घेऊन आम्ही घटकाभर मंदिरात विसावलो. मी जिथे बसले होते तिथे अगदी समोर महाराजांचा भव्य फोटो होता. माझ्या हातात जपमाळ होती. मी डोळे मिटून अगदी सहज जप करायला सुरुवात केली. ” श्री राम जय राम जय जय राम “…. हा जप माझे आजोबा करत असतं. त्यामुळे पाहिले काही मणी ओढताना मला त्यांची आठवण आली. हे खूपच साहजिक होते. कारण माझे वडील माझ्या वयाच्या 15 व्या वर्षी देवाघरी गेल्याने आजोबांचा प्रदीर्घ सहवास मला लाभला होता. आपल्याला वडील नाहीत याची खंत आज अजूनही 33 वर्षानंतर जाणवते. किती कठीण प्रसंग आले आणि गेले त्या प्रत्येक वेळी बाबांची कमी तीव्रतेने जाणवायची. कित्येक वेळेला तर आपण बाबांकडे जावे असा विचारही मनात यायचा. तर माळ ओढताना आजोबांची आठवण येत असताना माझ्या डोळ्यासमोर अचानक माझे प्रेमळ बाबा उभे राहिले. मधे इतका काळ गेला होता की मला बाबांचा आवाजही आठवत नाही पण तेंव्हा “तो क्षण” आला होता आणि कुठूनतरी अगदी खोलातून मला बाबांचा आवाज ऐकू आला ” बाळ अजून तुझी वेळ नाही आली माझ्याकडे येण्याची” ….बस एवढंच अगदी एका निमिषाचा काळ आणि माझ्या बाबांची मूर्ती अंतर्धान पावली. त्या नंतर किती काळ गेला मला आठवत नाही. माझी आत्या मला हलवत होती आणि माझ्या डोळ्यातून अवरीतपणे अश्रू वहात होते. ” मला महाराजांनी दर्शन दिले होते , आणि तेही माझ्या बाबांच्या प्रेमळ रुपात” अगदी स्तब्ध करणारा क्षण होता तो. कितीही वर्णन केले तरी ती अनुभूती पुन्हा येऊ शकतं नाही. अगदी मंत्रमुग्ध व्हावे असे काहीतरी. आपल्या कल्पनेच्या पलीकडचे.
माझे काम झाले होते. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. अगदी ठामपणे मी काही सांगू शकत नाही कारण आपण अगदी पामर असे क्षुद्र जीव आहोत पण महाराजांपर्यंत मी येण्याआधीच माझी हाक पोचली होती. तो साक्षात्कार होता एका अभंग शांतीचा, एका निस्सीम श्रद्धेचा.
आज तुमच्या सर्वांच्या पुढे माझा अनुभव कथन करताना मला अगळा वेगळा आनंद होतो आहे. अंगावर शहारा येणारा असा अनुभव प्रत्येक भक्ताला यावा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना.
” श्री राम जय राम जय जय राम”🙏
डॉ मधुरिमा कुलकर्णी