परीपुर्ण

सुमती तशी शहाणी होती. आयुष्यात खूप जास्त अपेक्षा वगैरे अस काही नव्हतं पण आपल्याला योग्य असा नवरा असावा एवढी माफक अपेक्षा तिची होती.

तो काळ होता नव्वदच्या दशकातला. त्या काळात मुलींना पदवीधर करण्या मागचं महत्वाचं कारण होत छान सुशिक्षित नवरा मिळावा. बाकी आजच्यासारखं नोकरी, करिअर ही अपेक्षा मुलिकडच्या किंवा मुलाकडच्या लोकांची नव्हतीच. त्यातूनही काही मुली शिकून नोकरी करायच्या. त्यांचं विशेष कौतुक व्हायचं पण घरकाम आणि घरातल्या इतर जबाबदाऱ्या सांभाळूनच त्यांना सर्व करावे लागे.

आज सुमतीच्या लग्नाचा 30 वां वाढदिवस होता. वयाच्या पन्नाशीत असलेली सुमती खूप स्मार्ट दिसत होती. तीन स्वतःला तसं maintain केलंच होत. घरात खूप गडबड चालू होती. जो तो प्रत्येक गोष्टीत सुमतीचा सल्ला घेत होता. तिलाही छान वाटत होत. विनय सुमातीचा नवरा तिला साजेसा होताच शिवाय दोघांचं एकमेकांवर खूप प्रेमही होत.

” सुमती खुश आहेस ना तु? ” विनयने तिचा हात हातात घेऊन विचारलं..
” हो , खूप ” सुमतीन डोळे मिटून घेतले होते.
” मग डोळ्यातून एवढे पाणी का?” विनयने थोड्या काळजीने पण संभ्रमित होऊन विचारले.
” तीस वर्ष झाली हो…जे हवं होत ते मिळायला…खूप मोठा काळ गेला , नाही?” तीनं विनयच्या डोळ्यात बघत विचारलं.
यावर विनयने तिला मूकपणे फक्त जवळ घेतलं. सुमती त्याच्या मिठीमध्ये अगदी विरघळून गेली. याच आश्वासक स्पर्शासाठी तीन कित्येक वर्ष संघर्ष केला होता.

तिचं लग्न अगदी चारचौघींसारख झालं होत. आणि संसार पण तसाच. बाहेरून बघणाऱ्याला त्यात विशेष वेगळं अस काही वाटण्यासारखं नव्हतं. पण जे सुमतीला हवं होत ते फक्त तिलाच माहित होत.

ती खुप स्वाभिमानी होती. विनयच्या तुटपुंज्या पगारात संसार फार टुकिन केला होता तीनं. संसार वेलीवर उगवलेली दोन गोजिरवाणी फुलंही छान संस्कारात वाढली होती. सासू सासरे, येणारे जाणारे, सणवार सगळं सगळं मनापासून केलं तीन. शिवाय छोटीशी नोकरी करून संसाराला हातभारही लावला.

तीनं एकाच गोष्टीला नकार दिला तो म्हणजे लग्नानंतर विनयच्या गावी तीनं रहावे या गोष्टीला.

” विनय, मला वाटतंय तू इतक्यात शहरात तुझ वेगळं बिऱ्हाड करू नकोस , उगाच जास्तीचा खर्च. अजून तुझ्या दोघी बहिणी लग्नाच्या आहेत…तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते?”

नवी नवरी असलेली सुमती आतल्या खोलीतून विनय आणि सासऱ्यांचा संवाद ऐकत होती.

” मलाही तसंच वाटतंय” सासूबाईंनी दिलेला दुजोरा तिच्या कानावर पडला. यावर आपला नवरा काय मत व्यक्त करतो हे ती कानात प्राण आणून ऐकण्याचा प्रयत्न करत होती.

” ठीक आहे, बघु ” एवढंच विनय बोलला पण त्याच्या आवाजात अजिबात जीव नव्हता.

त्या नंतर विनय नोकरीच्या शहरात निघून गेला आणि सुमतीच वेगळच आयुष्य सुरु झालं. सकाळपासून रात्रीपर्यंत तिला कामातून अजिबात उसंत मिळत नव्हती. पण रात्र तिला खायला उठायची. विनयच्या आठवणीनं तिची उशी रोज भिजून ओली व्हायची आणि सकाळपर्यंत भिजलेल्या उशीचा मागमूसही रहायचा नाही.

महिन्यातून दोन तीन वेळा जेमतेम विनय गावाकडे यायचा. नवी नोकरी, काय करणार? त्यातून तो तिच्या वाट्याला फार कमी यायचा. तरी ती प्रत्येकवेळी आवर्जून त्याला सोबत नेण्याबद्दल विचारायची आणि हसून तो तिच्या प्रश्नाचं उत्तर टाळायचा.

त्या दिवशी विनय चार दिवसांची सुट्टी घेऊन आला होता. बातमीच तशी होती. तब्बल दोन वर्षांनी सुमतीला दिवस गेले होते. सगळं घर आनंदात न्हाऊन निघालं होत. सासूला तर सुमतीला कुठं ठेऊ आणि कुठं नको असं झालं होतं.
सुमती पण खुश होती. पण या वेळेस तीनं काहीतरी निश्चय केला होता. चार दिवसांची सुट्टी संपली होती. दुसऱ्या दिवशी विनय शहरात परत जाणार होता. जेवण करून सगळे गप्पा मारत बसले होते.

” दादा , मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे ” सुमती सासऱ्यांना म्हणाली

” बोल बेटा, काय हवंय तुला? मी फार खुश आहे ” सुपारीच खांड कातरत सासरे म्हणाले

” स्वातंत्र्य ”

या शब्दाने सगळेच अचंबित झाले आणि एकच वेळी चमत्कारिक नजरेने सुमतिकडे बघू लागले.

” म्हणजे काय ग? तुला काय जेलात ठेवलंय आम्ही?” सासू थोडी रागात बोलली ” उगाच काहीतरी खुसपट काढायचं…”

” अजिबात नाही , तुम्ही सगळे माझ्यावर खूप माया करता, माझी काळजी घेता …हे घर माझच आहे” सुमती धीटपणे बोलली

” मग काय म्हणणं आहे तुझ?” सासऱ्यांनी जरा त्राग्याने विचारलं

” मला यांच्यासोबत राहायचं आहे इथून पुढे , म्हणजे मी येणारच नाही असं काही नाही…सणाला ,तुम्हाला अधून मधून भेटायला मी येईनच…” सुमती मृदुपणे म्हणाली

” पण आत्ता काय एकदम हे सगळं? आता हे बाळंतपण होऊ दे मग बघू” सासरे संभाषणाला पूर्णविराम देण्याच्या उद्देशाने बोलले.

” नाही , मला यांच्याबरोबर जायचे आहे” सुमती दृढ निश्चयाने म्हणाली. कुठून इतकं बळ आलं तिच्यात कोणजाणे?

त्यानंतर रडणे, ओरडणे, मुकाटपणा असे सगळे होऊन सुमती विनय बरोबर शहरात आली. त्यांचा चिऊ काऊचा संसार सुरू झाला.

सगळंच आपापल्या जागेवर अगदी परफेक्ट होत. पण सासऱ्यांनी तेंव्हापासून सुमतीशी बोलणं टाकलं ते टाकलच.
तीनं , विनयन , अगदी तिच्यावर नाराज असलेल्या सासूने सुद्धा खूप प्रयत्न केले पण काहीच उपयोग झाला नाही.

तीन वर्षांपूर्वी सासऱ्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि ते एकाच जागेवर जायबंदी झाले. सासूबाईंच वय झालेलं. सगळं घर शोकात बुडून गेलेलं…पण कुठल्या आत्मविश्वासानं सुमती सासऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली देव जाणे. पण त्यांची अवरीत सेवा करून तीनं पुन्हा त्यांना स्वतःच्या पायावर उभ केलं.

काय काय नाही केलं तीनं? त्यांचं खाणं, पिणं, आंघोळ, औषधपाणी, व्यायाम सगळं न कंटाळता ती करत राहिली… मागचं मनात काहीही न ठेवता..
आणि ज्या दिवशी म्हणजे 2 महिन्यांपूर्वी सासरे पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि त्यांनी अतिशय ममतेने सुमातीला जवळ घेऊन तिच्या गालाची पापी घेतली. त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रू वहात होते. त्यांनी हात जोडून तिची माफी मागितली. आणि सुमती धाडकन बेशुध्द पडली. ज्या दिवसाची तीन जवळ जवळ पंचवीस वर्ष वाट पाहिली होती तो क्षण आल्यावर मात्र तिला तो आनंद सहन झाला नव्हता.

आणि आज लग्नाच्या 30 व्या वाढदिवसाला तिला तिचं घर परिपूर्ण असलेलं प्रथमच जाणवलं….

डॉ मधुरिमा कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Related Posts

WhatsApp Image 2026-01-25 at 5.36
Screenshot_20250810_230832_WhatsApp

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you