विनायकराव मोठा उमदा माणूस. वय असेल 80 किंवा त्याहूनही जास्त. जुन्या हाडापेराचा माणूस ….शरीरयष्टी मजबूत, नावाला सुद्धा औषधाची गोळी चालू नव्हती त्यांना.
रूटीनही अगदी fix… गेले कित्येक वर्ष…पहाटे 4 वाजता उठायचे.मग प्रातर्विधी आटोपून फक्कड असा भरपूर गोड चहा पिऊन परसदार झाडून काढायचे. बरोबर पाच वाजता गावाच्या मध्यवर्ती असलेल्या महादेवाच्या मंदिरात अभंग सुरू व्ह्यायचे आणि त्याचवेळी विनायकराव शेताची वाट धरायचे. मग दोन अडीच तास शेतातली चक्कर…अगदी बारकाईने आणि सरवलेल्या नजरेने ते सगळा परिसर न्याहाळायचे. कुठल्या बांधावर गवात उगवलय का ? कालच्या दिवसभराच खुरपणीच काम कुठवर आलय? एखाया पिकावर काही रोग पडलाय का? लिंबाच्या बागेवर फवारणी करावी लागेल का? एक ना अनेक गोष्टी…
हाडाचे शेतकरी होते ते. वयाच्या 15 व्या वर्षांपासून काळ्या मातीची ते सेवा करत होते. जणू दुसरी आईच ती. किती उन्हाळे पावसाळे गेले असतील याची काही गणिती नाही. किती संकट आली असतील याची तर मोजदाद सुद्धा करू नये कोणी. कधी नशिबाचा फेरा चुकेल, तर कधी बाजारभावची हमी नाही, तर कधी सलग पडणारा ओला नाहीतर कोरडा दुष्काळ..पण विनायकरावांच्या मनात कधी एक गुंठा इतकी जमीन सुद्धा विकण्याचा विचार आला नाही.
त्यांनी त्यांच्या दोनही मुलांना उच्चशिक्षित केले होते. नोकरी करून बक्कळ पैसा कमवा असे ते नेहमी त्यांना सांगायचे. पण त्यांनी आजपर्यंत स्वतः मात्र कधी गाव सोडले नव्हते. यमुना काकुंनीही त्यांना आयुष्यभर छान साथ केली होती.
असे विनायकराव आजकाल थोडा विचार करायचे की आता माझे वय झालंय तर काय होणार माझ्या काळ्या आईच? शहरात गेलेली मुल नातवंडं गावाकडे पुन्हा परतून येतील का? माझ्या मागे माझ्या आईची काळजी कोण घेईल? अशा विचारांनी अलीकडे त्यांच्या डोळ्यात पाणी सुद्धा यायचं. एक मुलगा तर देशाबाहेर कधीच गेला होता. दुसरा मोठ्या शहरात मोठ्या कंपनी मधे भरपूर पगारावर नोकरी करत होता. त्याच्या मुलांना तर गावाचा वाराही कधी शिवला नव्हता मग इकडे येऊन राहणे तर दूरच.
त्या दिवशी विनायकरावांचा 24 वर्षाचा नातू अभी गावाकडे आला होता. विनायकराव वाटेकर्यांबरोबर शेतीच्या कामाबद्दल काहीबाही चर्चा करत होते. अभी मोबाईलमध्ये काहीतरी बघत असावा आणि तो एकदम म्हणाला “आजोबा हे बघा काय आहे”
” काय रे तुझ ते फोनमधल …जरा थांब बर…आमचा हिशोब चाललाय ना” विनायकराव थोडे काताऊनच बोलले.
अभी गप्प बसला पण त्याच्या डोक्यात काहीतरी चालू होते नक्की. दुपारी जेवण झाल्यावर तो पुन्हा त्याच्या आजोबांकडे गेला. त्यांचे पाय चेपत म्हणाला “आजोबा तुम्ही किती काम करता हो, बघा पायाला कशा भेगा पडल्यात”
हळूच हसत विनायकराव बोलले ” चालायचंच बाबा…हे मातीतले पाय ” पण हे बोलताना त्यांचा आवाज कातर झाला होता.
” आजोबा आज आपण त्या बोरीच्या शेतात जाऊयात? म्हणजे तिथे विहीर आहे बघा “
” कशाला रे? काय आहे त्या विहिरीत? काय बघायचं आहे तुला?”
” अहो आजोबा सध्या पाणी आहे ना विहिरीला …मग ते शेततळ्यात साठवता येईल का ते बघायचं होत. मगाशी नाही का मी तुम्हाला मोबाईल मधे तेच तर दाखवत होतो”
तेवढ्यात अभिला त्याच्या आजीनं हाक मारली. ” आजोबा आलोच मी, तुम्ही ready व्हा ” अस म्हणून अभी तिथून उठून गेला
विनायकरावांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली होती. त्यांचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते. आता त्यांना त्यांच्या काळ्या आईची अजिबात काळजी वाटत नव्हती कारण नवीन अंकुर फुटला होता.
डॉ मधुरिमा कुलकर्णी