मी स्वतः जरी डॉक्टर असले तरी आजचे लिखाण सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून करावे असा मानस आहे…पण तरीही शेवटी गेली अनेक वर्ष जो व्यवसाय मी करते आहे त्यातले बरेच खाच खळगे या लेखात येणं अगदीच अपरिहार्य आहे.
आपल्या भारतीय परंपरेनुसार डॉक्टर म्हणजे “वैद्य.” आयुर्वेदाची अतिप्राचीन परंपरा आपल्या वैद्यक शास्त्राला आहे. नंतर मॉडर्न मेडिसिन आले आणि मग ” डॉक्टर” हा शब्द रूढ झाला.
प्रथम फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट होती. गावातल्या, तालुका पातळीवर किंवा अगदी जिल्ह्याचा ठिकाणी सुद्धा डॉक्टरांची संख्या आजच्या तुलनेत कमीच होती. एकच डॉक्टर अनेक प्रकारचे रुग्ण तपासत असे. औषधांचे प्रमाणही खूप कमी होते. आणि तरीही रुग्ण मात्र 4/8 दिवसात खडखडीत बरा होऊन ” डागदर साहेब , मी बरा झालो बर का” एवढा निरोप डॉक्टरकडे पोचवल्याशिवाय रहात नसे. मग कुठे एखादी पपई, मिरच्यांचा जुडगा, एखादी पालेभाजी अशी काहीतरी पुरचुंडी त्या निरोपासोबत असेच. त्या काळी फार पैशाचा खेळ नव्हता. पण जबरदस्त “विश्वास” मात्र डॉक्टरवर होता. बरेच डॉक्टर रुग्णांच्या शारीरिक व्याधींबरोबर कौटुंबिक कलह सुद्धा सोडवत असतं. आता हे जरा विनोदी वाटेल पण असं होतं खरं.
खोकला झाला असेल तर आपल्याच जवळच्या बाटलीतून एक लाल रंगाचं औषध मिळे…सर्वांना एकच ..अगदी वर्षाच्या पोरापासून ते शंभरी गाठलेल्या म्हाताऱ्यापर्यंत…आणि या एकाच प्रकारच्या औषधाचा गुण मात्र 100% यायचा.
आज विचार करताना वाटत की कस काय शक्य होत असेल? एकाच औषधावर सगळ चालायचं? कस??? कस???
आजच्या काळात मात्र खोकल्याचे प्रकारही वाढले आहेत आणि तेवढीच औषधे सुद्धा ..भरपूर महाग पण म्हणावा तसा गुण येत नाही. अगदी specialist गाठला तरी रुग्णाच्या मनाचे समाधान होतच नाही. मग एक सोडून दुसरा आणि दुसरा सोडून तिसरा डॉक्टर….का होतंय असं?
मानवी शरीर तेच आहे. अगदी अनादी काळापासून या शरीराची Anatomy आणि physiology मुळीच बदललेली नाही. तरीही रोगांची संख्या मात्र भरमसाठ वाढली आहे. रोज नव्या नव्या रोगांचे शोध लागतच आहेत.
आणि तेवढ्या प्रमाणात या बेसिक डॉक्टर वरून प्रथम specialist आणि आता superspecialist असे प्राणी या डॉक्टर जमातीमध्ये जन्माला आले.
या गोष्टींना पर्याय नाहीये. हा special किंवा super special चा अभ्यास म्हणजे खरच कोणत्या जन्माचे पाप हे फेडत असावेत? कारण दिवसाचे 24 नाही 36 नाही 48 तास जरी केले तरी कमी पडतील असा हा अभ्यास ही लोक सतत वर्षानुवर्षे करत असतात. डोक्याचा भुगा वगैरे हे शब्दही कमी पडावेत यासाठी. पुन्हा स्वतःचे personal life अभ्यासाच्या काळातच यांनी स्वाहा करून टाकलेलं असत याची सामान्य जनमानसाला अजिबात जाणीव नाहीये.
बरं तर बरं हा इतका अभ्यास करणे, रिसर्च करणे त्यासाठी आयुष्यातली 10/12 वर्ष घालवणे आणि नंतर एखाद्या हॉस्पिटल मध्ये सामान्य माणसाप्रमाणे कामावर रुजू होणे हेच यांच्या रूटीन मधे आहे. एकवेळ डॉक्टर होणं सोप आहे पण नंतर डॉक्टर म्हणून निभावणं खूप कठीण…
असा दोन परिस्थितीमध्ये एवढा फरक का आला असावा? पूर्वीचा देव असलेला डॉक्टर आज खरच दानव झालाय? विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
या जगात अजूनही भरपूर माणुसकी शिल्लक आहे. या शिल्लक माणुसकीचा मोठा भाग आजही डॉक्टर आहे. आजही बहुतांश डॉक्टर हे केवळ रुग्णाच्या चांगल्यासाठीच लढत असतात. दिवसातले 18/20 तास काम करतात. कदाचित घरी स्वतःचे छोटे आजारी बाळ किंवा म्हातारा बाप तसेच ठेऊन रुग्णांसाठी जिवाचे रान करत असतात.
बदल झाला आहे तो सामान्य माणसाच्या दृष्टिकोनामध्ये. आज सगळ्यांना सगळं instant पाहिजे. ताबडतोप, लगेच.. एक चुटकी वाजवली की मी बरा झालो पाहिजे. ही मानसिकता घेऊन तुम्ही डॉक्टरकडे जाता …बऱ्याचदा तर गुगल वाचून अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अनेक रुग्ण मी रोज बघते. यांच्या ज्ञानाचे अमृत इतके पाजळत असते की यांना सांगावे वाटते तुम्ही माझ्या खुर्चीवर बसा…
आता यातला विनोदाचा भाग सोडला तर सध्या प्रत्येकाची स्ट्रेस लेव्हल वेगवेगळ्या कारणांनी इतकी वाढली आहे की सारासार विचार ही वृत्तीच नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. लोकांचे anger issue इतक्या वरच्या पातळीला जाऊन पोचले आहेत की एखाद्या सज्जन माणसाच्या हातूनही न शोभणारे कृत्य होते. आणि हीच अस्थिरता आज डॉक्टर पेशंट या नात्यातही दिसते आहे.
जिथे “विश्वास” असायला हवा तिथे शंकेने जागा घेतली आहे. सकारात्मकता फारशी कुठे दिसत नाही. ” मला काहीतरी झाले आहे” एवढी तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेल्यावर त्या “काहीतरीच” रुपांतर डॉक्टरांशी बोलण्याआधी अगदी हार्ट अटॅक पर्यंत गेलेले असते.
लक्षात घ्या डॉक्टरही माणूस आहे. तुमच्यासारखे अनेक रुग्ण त्याला बघायचे आहेत. प्रत्येकाच्या शंकेचे निरसन त्या त्या व्यक्तीच्या स्वभावाप्रमाणे करणे हे महामुष्किल काम आहे.
गंभीर आणि क्लिष्ट केसेस सोडवताना डॉक्टरांच्या मानसस्थितीचा सुद्धा विचार सामान्य व्यक्तीने करावयास हवा.
डॉक्टरांवर मनापासून ठेवलेला “विश्वास ” इथेच तुमच अर्ध काम होत. किमान तुमच्या बाजूने कमीत कमी मानसिक ताण डॉक्टरांवर येईल एवढी जरी काळजी तुम्ही घेतली तरी डॉक्टर त्यांचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील.
शेवटी पैसा तर सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे पण एक डॉक्टर म्हणून एवढं निश्चित सांगेन की एखादा रुग्ण बरा होऊन घरी जातो तेंव्हा त्या डॉक्टरांच्या मनातला आनंद तो डॉक्टरच जाणे.
पोस्ट खूप मोठी झाली. पण अनेक लोकांच्या गैरसमजुतीमुळे, अनेक लोकांच्या विनाकारण मध्यस्थ व्यवहारामुळे डॉक्टर पेशंट हे नातं बिघडत चाललं आहे. वेळीच यावर आपल्या विचारांचा बांध घातला नाही तर भविष्यातील चित्र फार विदारक असेल.
डॉ मधुरिमा कुलकर्णी