एक उनाड दिवस….

आमच्या लहानपणी “उनाड” असा नुसता शब्द जरी तोंडातून बाहेर पडला तर पाठीत १००% आई बाबांचे धपाटे पडले असते. तसे ते काहीना काही कारणाने मिळतच होते…पण यातला जो ” उनाड” शब्द आहे त्याची व्याख्याच त्या काळात वेगळी होती. तुमचा मुलगा उनाड आहे म्हणजे अभ्यास न करणारा, उगाचच लोकांच्या खोड्या काढणारा, शाळा बुडवणारा अशा टाईपचा मुलगा डोळ्यासमोर येईल. त्याच्या पुढे जाऊन मुलगा उनाडक्या करतो. हा शब्द साधारण जो मुलगा पंधरा सोळा किंवा त्याहून थोडा मोठा असेल त्याच्या बाबतीत वापरला जात असे. अर्थात वाईट अर्थानेच. या वयातला उनाडपणा थोडा वेगळा असायचा.

आता मला निश्चित वर्ष नाही आठवत…पण अशोक सराफ हे त्यावेळी मराठी फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार होते. त्यांच्या एका सिनेमामध्ये असं दाखवलं होतं की “अशोक सराफ हे एक मोठा उद्योगपती असतात. काही कारणाने त्यांना अतिसामान्य माणसाचे आयुष्य जगण्याचा चान्स मिळतो. आणि सामान्य जगण्यातला आनंद पैशापेक्षाही खूप मोठा असतो असं त्यांच्या लक्षात येतं आणि या सिनेमाच नाव होत एक उनाड दिवस”
त्यावेळी या विषयात काही वेगळेपण असेल आणि पुढे जाऊन हाच विषय आपल्या आयुष्यात मोठा आनंद आणेल असं जाणवलं सुद्धा नाही.

पुढे काही वर्षांनी म्हणजे माझा मुलगा तेंव्हा बहुतेक दहावीमध्ये असेल. सर्व पालकांना असत ते “टेन्शन”अर्थातच आम्हालाही होत. असेच एका शनिवारी दुपारी आम्ही ( मी आणि नवरा) TV बघत बसलो होतो आणि वरचा सिनेमा लागला होता. माझ्याही न कळत मी त्या सिनेमामध्ये कधी गुंतून गेले ते कळलंच नाही. आणि ही ” उनाड दिवसाची” संकल्पना माझ्या डोक्यात अगदी फिट बसली.

आठवड्यातले सहा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्णपणे बिझी राहिल्यानंतर येणाऱ्या रविवारचे अप्रूप अजूनही कमी झालेले नाही. किती वेळ तो रविवार जगावा याला काही मर्यादाच नसते. काय करू आणि काय नको आणि कितीही केलं तरी वेळ कमी पडणारा असा रविवार संपल्यावर मात्र मनात असतो तो उद्याच्या सोमवारचा राग आणि पुढच्या रविवारची वाट….

मग एखाद्या working day ला असा रविवार समजलं तर? माझ्या डोक्यात विचार आला. तशी सहजपणे घडेल अशी ही गोष्ट नाही. आधी मनाला हे पटण्यासारखच नाही. कामांची लिस्ट इतकी मोठी असते आणि…शेवटी रविवार तो रविवारच नाही का?

पण माझ्या डोक्यातून या उनाड दिवसाची कल्पना काही केल्या जाईना….किती थ्रिलिंग वाटलं मला ते. नवरा कामाच्या बाबतीत एकदम panctual त्यामुळे weekdays मधे उनाड दिवसाची कल्पना त्याच्या डोक्यात उतरवणे हे महाअवघड काम होते. जेव्हा मी अशा दिवसाबद्दल विचार करायला लागले तेव्हा खरं तरं मलाही खूप अपराधी वाटत होतं. म्हणजे आपण एक डॉक्टर आणि patients ना वाऱ्यावर सोडून जायचं… छे…शक्यच नाही. पण तरीही तो उनाडपणा मला मधून मधून खुणावत राहिला.

शेवटी एके दिवशी नवऱ्याचा जरा बरा मुड बघून मी त्याला माझ्या उनाड दिवसाच्या कल्पनेबद्दल सांगितलं. त्यानं वरपासून खालीपर्यंत माझ्याकडे अस पाहिलं जसं काही मी नुकतीच मेंटल असायलम मधून आले असावे.

” काहीही काय बोलते आहेस? अगं रोजचा दिवस पुरत नाहीये कामाला..रविवारी सुद्धा काम करावे लागतंय…आणि काय म्हणालीस उनाडपणा? अशक्य आहेस तू अगदी”

शब्दांची चपराक जोरदार माझ्या कानशिलात बसली. पुढे काही बोलण्याची सोयच नव्हती.

दिवस आपल्या आपल्या गतीने पुढे जातच होते. मुलाची दहावी संपली आणि त्याचं कॉलेज लाईफ सुरू झालं. त्याबद्दल किती सांगू आणि किती नको असं त्याला व्हायचं आणि त्या बरोबर माझ्यातला उनाडपणा पुन्हा डोकं वर काढायला लागला.

आता तर मी इरेलाच पेटले. काहीही झालं तरी उनाड दिवस साजरा करायचाच. कोणी सोबत नसेल तर एकटीने….मी मनातल्या मनात एक दिवस ठरवला. आणि मनोमन खूपच खुश झाले. खूप मोठ्या प्रयत्नांनंतर आपण फार मोठी गोष्ट achieve केली आहे असं काहीसं मला वाटत होत. सकाळी नवरा नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला आणि माझा उनाड दिवस सुरू झाला. पण उनाड दिवस म्हणजे नेमकं काय करायचं हेंच मला कळेना. बराच वेळ डोकं खाजवल्यावर माझ्या उनाड दिवसाच्या कल्पनेवर पुन्हा एकदा पाणी पडले आणि मी नेहमीप्रमाणे सगळं आवरून क्लिनिकचा रस्ता पकडला. खूपच हिरमुसली झाले होते मी.

पण म्हणतात ना एखादी इच्छा खूप तीव्र असेल तर ती पूर्ण होतेच.

आम्हाला दोघांना कुठल्याशा कार्यक्रमाला बोलावले होते. दिवस आधलामधला असल्याने जावे का नाही याच विचारात आम्ही होतो पण जाणंही तेवढेच आवश्यक असल्याने कार्यक्रमानंतर नवरा परस्पर ऑफिसला जाईल आणि मी रिक्षा करून घरी येईन असं ठरलं.
आमचं जेवण होईपर्यंत साधारण दीड वाजून गेले होते. आम्ही होतो कोथरूड मधे. नवऱ्याच ऑफिस चिंचवड मधे आणि राहायला आम्ही कात्रज मधे. अचानक नवरा म्हणाला ” आता ऑफिसला पोचेपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तर संपतोच आहे. त्यात किती वेळ ट्रॅफिक मधे जाईल नाही सांगता यायचं त्यापेक्षा आज सुट्टीच टाकावी ” आणि अचानक माझ्यातला उनाड दिवस टुणकन उडी मारून वर आला.

” बर ठीक आहे” एवढंच रिप्लाय मी दिला आणि गप्प बसले.

उगाच त्याचा विचार बदलायचा नाहीतर x ray सारखा माझ्या मनातला विचार यानं वाचला तर? सगळंच मुसळ केरात….

गाडी घरच्या दिशेन निघाली. मी हळूच म्हणाले ” आईसक्रीम खाऊयात?”

डिसेंबर महिना होता. हवेत नाही म्हटलं तरी गारवा होता. पण तो दिवस माझाच होता. एका क्षणाचाही विलंब न लावता नवऱ्यानं गाडी आईसक्रीम पार्लर कडे वळवली. आईसक्रीम झाल्यावर सिनेमाचा मूड ठरला. कुठलातरी अत्यंत टुकार सिनेमा बघून आम्ही सहा वाजता थिएटर बाहेर पडलो. समोरच एक बुटीक होत. अतिशय सुंदर ड्रेस तिथे आकर्षक पद्धतीने लावले होते. त्यातला दोन तीन ड्रेस माझ्याजवळ कधी आले कळलं सुद्धा नाही. शॉपिंग बॅग्स सांभाळत आम्ही पाणीपुरीच्या गाडीजवळ आलो. तोंडाला सुटलेल्या पाण्यानं आपलं काम केलं आणि भरपूर पुऱ्या रिचवून साधारण साडेआठ नऊच्या सुमारास आम्ही घरी पोचलो.

विशेष म्हणजे पूर्णवेळ आम्ही बऱ्यापैकी फालतू गप्पा मारत होतो . काहीही हसण्यासारखे घडत नसताना आमच्या तोंडातून हास्याचे फवारे उडत होते. लोकं अत्यंत चमत्कारिकपणे आमच्याकडे बघत होते. पण आम्हाला त्याची पर्वा नव्हती म्हणण्यापेक्षा ते काही आमच्या गावीच नव्हते असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. कारण जेव्हा सगळ जग कामात मग्न होत तेव्हा आम्ही मात्र ” वर्किंगचा” अमूल्य वेळ उनाडपणात घालवत होतो.
त्या दिवसान काय नाही दिलं आम्हाला? “बालपणातला मुक्त आनंद “… जो पुन्हा फिरून परतून आपल्या आयुष्यात येणे केवळ अशक्य आहे. आपल्यातल्या हरवत चाललेल्या निरागसपणाची जाणीव झाली याचं उनाड दिवसामुळे. नवरा बायको म्हणून नात्यात येत असलेला यांत्रिकीपणा याचं उनाड दिवसाने दूर केला. अजून किती आणि काय सांगू????

आता या गोष्टीला जवळ जवळ पंधरा वर्ष उलटली आहेत. आम्ही अजूनही असाच उनाड दिवस साजरा करतो…मात्र ठरवून.तरीही त्यातली गंमत अजिबात कमी झालेली नाही.
आजच्या काळात तर प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रचंड स्ट्रेसमध्ये आहे. रात्री झोप नाही, खूप competition च्या ओझ्याने जो तो वाकून गेलाय. depression blood pressure सारखे आजार लहान वयातच पाठी लागत आहेत..अशा वेळी हा ” उनाड दिवस” एखाद्या देवदूताप्रमाणे तुमचे आयुष्य नक्की बदलून टाकेल याची मी खात्री देते…..

डॉ मधुरिमा कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Related Posts

Screenshot_20250810_233854_Facebook
Screenshot_20250810_233408_Facebook

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Posts

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

I am a Doctor and a phycology counselor by profession with a passion of reading. After having read a lot of books, magazines and online posts, I realized that I also posses a knack to write. My written work started getting some recognition.
So, this is my attempt to share whatever little work with YOU… Read, subscribe and comment your suggestions and feedback too.

Thank you